रक्षाबंधन
डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर गुरुजी भारत विद्यालय, बेडगा ता. उमरगा, जि. धाराशिव
रक्षाबंधन!!!
रक्ताच्या नात्यापलीकडचं हे नातं!
पंचवीस वर्षे झाली…
याच प्रशालेच्या पवित्र अंगणात
मी रोज ज्ञानाची अक्षरे गिरवत आलो,
पण कधी कळलंच नाही—
विद्यार्थी शिकवता शिकवता
मी स्वतःच कितीतरी नाती कमावत गेलो…!
आज रक्षाबंधनाच्या दिवशी
माझ्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या
चिमुकल्या लेकी माझ्याभोवती जमल्या…
हातात राख्या होत्या,
डोळ्यांत माया होती,
आणि मनात एकच भावना होती—
“गुरुजी, तुम्ही आमचे आहात…”
कुण्या नातेवाईकाच्या हातावर
जितक्या राख्या बांधल्या नसतील,
त्यापेक्षाही अधिक राख्या
आज माझ्या उजव्या हातावर बांधल्या गेल्या…!
प्रत्येक राखी बांधताना
कुणीतरी माझ्या मनाला स्पर्श करून गेलं,
कुणी बहिणीचं प्रेम दिलं,
कुणी मुलीची माया दिली,
तर कुणी मनात दडलेलं
‘बाबांसारखं’ एक निःशब्द नातं दिलं…!
राखी तर क्षणभरासाठी बांधली,
पण त्या धाग्याने
माझं आणि माझ्या लेकींचं नातं
आयुष्यभरासाठी घट्ट बांधून ठेवलं…!
आज माझ्या मनात एक विचार आला—
शिक्षक म्हणून पगार घेतला असेल,
पण या लेकरांनी दिलेलं प्रेम
कुठल्याही पगारापेक्षा
अनमोल आहे…!
पंचवीस वर्षांत
कितीतरी चेहरे आले आणि गेले,
कितीतरी विद्यार्थी मोठे झाले,
आपापल्या संसारात रमले…
पण त्यांच्या आठवणींच्या वहीत
आजही माझं नाव
‘गुरुजी’ म्हणून जिवंत आहे,
हीच माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे…!
आज माझ्या हातावर
राख्यांची गर्दी होती,
पण मन मात्र भरून आलं होतं…
कारण त्या प्रत्येक धाग्यामध्ये
मला माझ्या विद्यार्थिनींचं
निष्पाप प्रेम, विश्वास आणि
आपलेपणा दिसत होता…!
देवा, एवढंच मागणं आहे
माझ्या या सर्व लेकींच्या आयुष्यात
कधीही दुःखाची सावली पडू नये,
त्यांच्या स्वप्नांना आकाश मिळावं,
त्यांच्या कष्टांना यश मिळावं
आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू
आयुष्यभर असंच फुलत राहावं…!
आज हातावर बांधलेल्या राख्या
काही दिवसांनी कदाचित निघून जातील,
पण त्या राख्यांनी बांधलेलं नातं
माझ्या हृदयातून
कधीच निघून जाणार नाही…!
कारण, “राखीचा धागा तुटेल कधीतरी,
पण मायेचं नातं तुटणार नाही…
विद्यार्थिनी कितीही मोठी झाली,
तरी तिच्या गुरुजींच्या मनात
ती सदैव ‘माझी लेक’च राहील…!”
डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर गुरुजी
भारत विद्यालय, बेडगा
ता. उमरगा, जि. धाराशिव
=========



