“कशीही असो परिस्थिती.. निखळ आनंदासाठी हवी सृजनशील मनस्थिती”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू काव्य' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“कशीही असो परिस्थिती.. निखळ आनंदासाठी हवी सृजनशील मनस्थिती”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“अगं ये हौशे… कुठं हायस गं.. जरा नाम्याला संभाळ बाई. नायतर माझ्यासारखी वंगाळ बाई कोण बी नाही सांगून ठेवतीया” वीटभट्टीत चिखलात माखलेल्या हौसानं गोधाचा आवाज ऐकला आणि मनात चरकली. ओठात आपसुकच पुटपुटली “आता आणि पोरानं कुणाची ब्याद आणली म्हणायची?” तसा नाम्याचा बाप पुढे झाला..
” गोदाक्का, काय झालय ते सांग तरी. कशाला तरा तरा बोलतीयास. गोधा आणखी बिथरली आणि खेकसली..” तुमच्या पोराला ताब्यात ठिवा. अंगात घालायला धडूत नाय आणि लोकाइच्या गाड्या पळिवतोय ते बी चोरून.. काय बिगाडलं तर केवड्याला पडल..? भरून देशीला काय?”
हौसा म्हणाली. “माझ्या लेकराला चोर म्हणायचं काम नाय.. हां.. अगं बगितली असल कूटर कवतिकानं.. त्येला काय कळतय त्यातलं ” तशी गोदा बोलली..” हौसे, पैसं पडत्याती कूटरला. चिखलात राबत्यासा ध्यानात ठिवा. पुन्यांदी पोरानं हात लावायचं सोडच. आमच्या कूटरीकडं बघितलं तरी बी म्या डोळं काढून हातात ठिवीन… ” दम देऊन गोधा आली तशी निघून गेली आणि भट्टीच्या मागे दडलेल्या नाम्याकडे हौसाने मोर्चा वळवला. तसा नाम्या काकुळतीने म्हणाला..
” आये… लय याड मला गाड्याईचं. तूच तर सारखी म्हंती न्हवं का.. पोटात हुता तवाबी गाडीचा आवाज आयला की वळवळ करायचास. आन् आत्ता बी गाडी पाह्यली की डोळं वटारू वटारू पायत रायतु. मला लय लय आवड हाय गाडीची.आये.. आमच्या घरी कुण्णालाच गाडी न्हाय. पर कुणाची गाडी दारात आयली की मी फुडनं मागनं पाहू पाहू घेतो. हात लावून पाह्यतो.जरा ढकलून बगतू.. बाबाला सांग की जूनी कुटर घ्यायला..”
वरील प्रसंग, संवाद कमीजास्त फरकाने सर्वांच्याच परिचयाचा आहे. कांहीना स्वतःचे बालपण आठवले असेल. एखाद्या पाहुण्याची सायकल जरी मिळाली तर गावभर ढोपरं कोपरं फुटेपर्यंत फिरवायचो आपण. तशीच गाडीची उत्सुकता.. बालमनाला नाविन्याची भुरळ नेहमीच पडत आली आहे. कागदाचे विमान करून नभ कवेत घेतले आहे. ज्वारीच्या ताटाची गाडी करून ऐटीत फिरवली आहे. आगपेटीचा फोन करून साहेबांच्या थाटात बोललो आहे. हेच छंद भविष्यात अनेक शोधांचे जनक ठरलेत.
काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र या पार्श्वभूमीवर खूप बोलके आहे. वीटांची टू व्हिलर बनवून. बाजूला तो मुलगा संशोधकाच्या अविर्भावात बसला आहे. तर पालक कौतुक भरल्या नजरेने पाहताहेत. एखादी महागडी वस्तू घेण्याची परिस्थिती असो की नसो मात्र सर्जनशील मनस्थिती असेल तर कशातही आनंद शोधता येतो. वीटांची गाडी हे एक अशाच समाधानाचे प्रतिक आहे. तर तो मुलगा सकारात्मक ऊर्जेचे प्रतिक आहे. कदाचित हीच युक्ती त्याच्यात नवचैतन्याचे स्फुल्लींग चेतवू शकते. विचार करायला प्रवृत्त करू शकते. नव्या शोधाला जन्म देऊ शकते. झाडावरून पडलेले फळ खालीच का आले? हा प्रश्न न्यूटनला पडला आणि गुरूत्वाकर्षनाचा शोध लागला…!
आजही अनेक हायकूकारांनी नेहमीप्रमाणेच रंग भरलेत. वैविध्यपूर्णता जाणवली. तरीही काही जणांनी परिपूर्णतेचा ध्यास घ्यायला हवा. हा हायकू प्रकार आहे, विशिष्ट क्षण पकडता यायला हवा.. सर्वांना मनापासून शुभेच्छा.. आणि मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे आभार…!
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/कवी/लेखक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



