पालकांचा धाक, आत्मविश्वासास बाधक अन् भीती…मी ‘ढ’ झालो तर..!
मंगळवारीय "आम्ही बालकवी" स्पर्धेचे काव्यपरीक्षण

पालकांचा धाक, आत्मविश्वासास बाधक अन् भीती…मी ‘ढ’ झालो तर..!
मंगळवारीय “आम्ही बालकवी” स्पर्धेचे काव्यपरीक्षण
दिली देणगी निसर्गाने सर्वांना
बनवले वेगळे प्रत्येक सजीवांना
रूप ,गुण सगळेच निरनिराळे
समजत नाही का माणसा?
सर्वांना एकाच तराजूत तोलतांना…!
आज शेजारीपाजारी, आसपास, नातेवाईकात, मित्रमंडळीत कोणाच्या मुलाचे यश पाहिले की पालक पहिले आपल्या मुलाकडे पाहतात. बघ हा, बघ तो, असा तो, तसा तो आणि तू कसा? ही तुलना का? सगळे सारखेच असतात का? थोडा स्वतःचा काळ आठवा, तुम्ही कसे होता ?तुमच्या काळात असतीलच ना तुमच्यापेक्षा जास्त गुण घेणारे? आणि सांखिक गुणावरून तुमचे व्यक्तिमत्व, तुमचे यश ठरते का? निसर्गाच्या विविधतेलाच जणू या पालकांनी तळ हाताने झाकून, सर्वांना एकाच तराजूत तोलण्याचे काम सुरू केले आहे. सर्वजण सारखे कसे असतील? वैविध्यता ही निसर्गाचीच देण ना? मग तुमचा हा अट्टहास का? आणि हाच अट्टाहास मुलांच्या आत्मविश्वासास घातक बनत चालला आहे. सतत होणारी तुलना मुलांना विद्रोहाकडे घेऊन जाते तर कधी विनाशाकडे. परीक्षेच्या आधीच आत्महत्या करणारे, निकालाच्या आधी मरणाला कवटाळणारे, कमी गुण आले म्हणून स्वतःला संपवणारे विद्यार्थी. काय आहे हे? आपल्या अपत्यातील गुण, कलागुण, आवड ओळखा. आवडीचे काम करण्यात आनंद मिळतो मग तेच काम ‘काम’ न राहता छंद बनतो आणि जीवनाचा आनंद घ्यायला ते लेकरू शिकते.
घेऊ द्या त्याला भरारी फक्त पंखात बळ भरा, जा कुठेही म्हणा ठामपणे पाठीशी उभे रहा. संस्काराची शिदोरी द्या, वाईट चांगल्या ची जाणीव सोबत देऊन त्याला मोकळे आकाश द्या. कमाईचे काय हो? असेल कमी जास्त, पैसा म्हणजे सर्वस्व आणि आनंद नव्हेच. त्याच्या कुवतीनुसार कमवेलच तो, फक्त समाज विघातक कृत्यांपासून तो दूर कसा राहील, एक भारताचा आदर्श नागरिक कसा बनेल? इतकेच मार्गदर्शन केलेत ना, तरी बस्स! कधी अडल्या-नडल्यानंतर त्याची साथ द्या, चुकल्या ठिकाणी वाट बना,त्याचे पालक नाही मित्र बना. पालकांची सावली ही न पडू देणारी पिढी आज आपण पाहतोय. मोकळा संवाद करा, आईने मध्यस्थी न करता मुलगा व वडील कसे मोकळे बोलतील यासाठीची भूमिका घ्या. आजकालचे पालकच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास घालवण्याचे दुष्कृत्य करताना आढळतात. मग ते मुलेही स्वतःला ‘ढ’ समजायला लागून मला अपयश आले तर.. मी ‘ढ’ झालो तर.. असा नकारार्थी विचार करून जीवनाच्या विनाशाकडे वाटचाल करायला लागतात.
अमेरिकेतील थॉमस अल्वा एडिसन ला शाळेतून काढून टाकले हातात एक पत्र देऊन. पत्र पाहून आईच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी विचारले, आई काय झाले? आई अश्रू लपवत हसतच म्हणाली, शिक्षकांनी सांगितले आहे की त्यांच्यात तुला शिकवण्याची क्षमता नाही कारण तू खूप हुशार आहेस, तुला घरीच शिकवा. हाच मतिमंद थॉमस प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ, जगाला प्रकाशमान करणारा, विजेचा शोध लावणारा, थॉमस अल्वा एडिसन. आयुष्याच्या शेवटी आईच्या मृत्यूनंतर तेच पत्र त्यांच्या हाती आले, डोळ्यातील पाणी थांबत नव्हते कारण मतिमंद म्हणून त्याला शाळेतून हाकलून दिले होते. थॉमसची आई बना, नाही बनता आले तरी आपल्या मुलांच्या पंखात बळ देऊन स्वावलंबनाचे धडे द्या. यापेक्षा मी काय सांगणार?
आज मंगळवारीय “आम्ही बालकवी” समूहातील स्पर्धेचा विषय आदरणीय राहुल दादांनी “मी ‘ढ’झालो तर ..असा निकालाच्या पार्श्वभूमीवर दिला असावा.आजचे आत्महत्या करणारे विद्यार्थी नजरेसमोर आले. सर्वांच्या रचनेत मी ‘ढ’ झालो तर काय होईल? पालकांच्या अपेक्षांची ओझे दिसले. विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न दिसला.असो.. बाल शिलेदारांनी स्वतःला लहान समजून, त्या वयात जाऊन लिहिण्याचा प्रयास करावा. सर्वजण सुंदर प्रयत्न करत आहेत थोड्याशा त्रुटी कमी करण्याचा अल्पसा प्रयत्न करावा.उदा.थोडेसे शुद्धलेखन ,कविता लेखनाचे नियम इ.राहुल दादांनी मला परीक्षण लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तूर्तास थांबते..!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
परीक्षक /सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





