‘क्षणभंगूर’ मानवी आयुष्य आनंदाने जगायला शिका; सविता पाटील ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

‘क्षणभंगूर’ मानवी आयुष्य आनंदाने जगायला शिका; सविता पाटील ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
दिनांक १२ जून २०२५ दुपारी १:३८ मिनिटांनी अनेकांच्या स्वप्नांना उंच भरारी देणारं विमान गुजरातच्या अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आकाशी झेपावले. अवघ्या काही मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं. एक मोठा आवाज, आगीच्या ज्वाला, आणि एका क्षणात सारं काही संपल. बॅग, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळ, पैसा अडका, दागदागिने साऱ्यांच्या सोबत माणसं…अक्षरशः कोळसा झाली. उरली फक्त राख,धूर आणि माणसांची वाट पाहणारी नजर.
कुठे रडणारी आई, कुठे क्षीण झालेला म्हातारा बाप, कुठे गोंधळलेली मुलं तर कुठे सर्वच्या सर्व कुटुंब संपल्याने आक्रोश करणारे नातेवाईक. कसं आहे ना मानवी आयुष्य? एकाच शब्दात बोलायचं तर क्षणभंगूर…होय क्षणभंगूरच… कुणाला वाटलंही नसेल की हा माझा शेवटचा टेक्स्ट मेसेज असेल, ही माझी शेवटची मिठी असेल, हा माझ्या शेवटचा शब्द असेल. जे गेलेत त्यांच्या हसण्याचा प्रतिध्वनी अजूनही कुणाच्या तरी आठवणीत जीवंत आहे.त्यांनी मागे ठेवलेली स्वप्न, त्यांचा आवाज, जोपासलेली माणुसकी हे सगळे आपल्याला एकच सांगत आहे….आयुष्य क्षणभंगूर आहे, त्यामुळे प्रत्येक क्षण जगा… आनंदाने जगा.. कुणाविषयी मनात किल्मीष, राग, द्वेष ठेवू नका. फक्त पुढे चला.. तेही प्रेमाने, दुसऱ्याला समजून घ्या, वेळप्रसंगी माफ करा कधी स्वतःही लहान व्हा. कारण कुणालाही माहित नाही पुढे काय वाढून ठेवलं आहे?
या भयानक प्रसंगात २८० कुटुंब नव्हे तर २८० जिवंत कहाण्या पूर्णतः संपल्या आहेत. मला मान्य आहे की, ‘मृत्यू हे मानवी जीवनाचं शाश्वत सत्य आहे’. तो सरळ आहे पण तो येईपर्यंत मृत्यूशिवाय जगणं हेच खरं आयुष्य आहे. तमाम मराठी सारस्वत…. एक गोष्ट तर तुम्हीही मान्य कराल की, मानवी जीवनातल्या भौतिक सुखाच्या आनंदात आयुष्याचं गणित खूप वेगवान झालंय. केव्हा काय होईल हे सांगू शकत नाही, तेव्हा या क्षणभंगूर आयुष्याला खऱ्या अर्थाने जगा, त्याचा आनंद घ्या. पाण्यातला बुडबुडा..कितीही प्रयत्न करू दे पण, त्याचं अस्तित्व अधिक क्षणभंगूर आहे अगदी असंच मानवी जीवन झालं आहे.
‘क्षणभंगूर’ हा आगळावेगळा शब्द आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांना प्रसंगावधान राखत मनात आला आणि त्यांनी गेल्या दोन-तीन दिवसापासून कवी मनाची होणारी घालमेल, तळमळ शब्दात व्यक्त करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. प्रसंगोचित आणि विचारांचा प्रगल्भ वारसा लाभलेल्या कवी कवियत्रींनी विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला. एकापेक्षा एक सुंदर रचना सर्व समूहात आल्यात. तेव्हा मनापासून अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन. पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा..!!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह





