Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगसंपादकीयसाहित्यगंध

द्वेष, तिरस्कार, अहंकार सोडून.. प्रेम,आपुलकी, उत्साहाच्या रंगात रंगू या ना..!; स्वाती मराडे

'गुरूवारीय चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 8 2

द्वेष, तिरस्कार, अहंकार सोडून.. प्रेम,आपुलकी, उत्साहाच्या रंगात रंगू या ना..!; स्वाती मराडे

‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

शिशिराची चाहूल लागली अन् आता लवकरच उन्हाळा येणार, म्हणून झाडांनी पर्णपसारा आवरायला घेतला. धरणीच्या कुशीत पहुडण्यासाठी, तर कुणी वाऱ्यावर विहरण्यासाठी पानांची लगबग सुरू झाली. त्यांनी सोडलं ते त्यांचं हिरवेपण अन् सोनेरी रंगाचा साज सुरू केला ल्यायला. जायचं तर आहेच, रंग बदलणार आहेच तर मग का बरे या नव्या रंगात रंगून जाऊन नये? ‘आपलं जाणंही एखाद्याचं जगणं समृद्ध करणारं असावं ते खरंच या निसर्गाकडून शिकावं’. जाता जाताही ही पाने नवपल्लवाची आशा फांदीवर पेरून जातात नि रोमांचित होऊन ती फांदीही अलवार फुलू लागते‌. आग ओकणा-या उन्हालाही लालबुंद होऊन वाकुल्या दाखवत कुठे पांगारा फुलतो तर कुठे गुलमोहर बहरतो.

‘पिवळाधमक बहावा फुलून सोनेरी रंगाशी माझेही नाते असे सांगतो’. उगवणं असो की, मावळणं केशरी सडा टाकणारं आकाश जणू घेतलंय कवेत अशाच दिमाखात फांदीफांदीवर दिप पेटवल्याप्रमाणे पळसफुले मिरवू लागतात. तर कुठे प्रितअनुराग जागवत तो गुलाब गुलाबी छटेने जणू लज्जित होतो. सावळेपण पांघरून बकुळ मोहरतो. तर जाईजुई, मोगरा, सायली.. धवल रंगाने मनाला शांतवतात. कशासाठी ही रंगांची उधळण.. वसंतोत्सवासाठी..!

विविध रंग एकत्र येऊन निसर्गात सुरू होतो वसंत..! मग मानवा तूही कर असंच समृद्ध जगणं पसंत. द्वेष, तिरस्कार, अहंकार सोडून देऊ या.. प्रेम,आपुलकी, उत्साहाच्या चला रंगात रंगू या..! फाल्गुन पौर्णिमेला केशरी रंगाने फुललेले पळसमन मोहून घेतात. त्याग, शौर्याची आठवण करून देतात. अनेक सण उत्सवांनी समृद्ध असणारी आपली संस्कृती निसर्गाशी नेहमीच एकरूप होण्याचा प्रयत्न करते. वसंत आगमनासाठी निसर्गासोबतच आपणही मग साजरी करतो होळी. ‘होळी ते रंगपंचमी पाच दिवस सुरू होतो रंगोत्सव’. मनातील नकारात्मकतेला होळीत जाळून नवचैतन्य आणणाऱ्या रंगांत रंगण्यासाठी सगळेच जणू आतुर होतात आणि एकमेकांना म्हणतात ‘चला रंगात रंगू या..’

होळीच्या पार्श्वभूमीवर आलेले ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठीचे चित्र. ‘चला रंगात रंगू या’ हा संदेश देत निसर्गाशी एकरूप व्हा असेही सांगणारे. काळाच्या ओघात अनेक बदल होतात. रंगोत्सवातही असेच बदल झाले. नैसर्गिक रंगापासून सुरू झालेली होळी, आज कृत्रिम रंगांच्या विळख्यात अडकत कधी ओंगळपणाचेही दर्शन घडवू लागली. पिचकारीने नैसर्गिक रंग उडवणे ते अंडी फेकून मारून रंगपंचमी खेळणे इतका बदल त्यात होताना दिसत आहे. हे असे बदल वा असे रंग नकोतच. म्हणूनच शाळाशाळांमधून मुलांमध्येही संस्कार पेरण्याचे काम सुरू असते.

नैसर्गिक रंगांचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्बोधित करणारे आजचे चित्र त्यामुळेच खूप बोलके. आज आपणा सर्वांच्या लेखणीतूनही बोधपर, निसर्गपर रचनांची सप्तरंगी उधळण झाली. लेखणीतून जागृतीचा हा बहर असाच फुलत राहो. रंग नवनवे लेखणीतून ओसंडून वाहो. या शुभेच्छांसह सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय ‘राहुल दादांनी’ मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार. ‘सर्व साहित्यप्रेमी व काव्यरसिकांना रंगपंचमीच्या रंगारंग शुभेच्छा..!!!

सौ स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/लेखिका/कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

1.5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे