Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनगोंदियादेश-विदेशनवी दिल्लीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

‘संगीताची आशा मावळली’… नव्हे..अमर झाली..!!!

'स्वरस्वामिनी' ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

0 5 3 6 2 7

‘संगीताची आशा मावळली’… नव्हे..अमर झाली..!!!

‘स्वरस्वामिनी’ ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

मागील आठ दशकांच्या कारकिर्दीत विविध स्वरांत फुलणारं नंदनवन आज अचानक कोमेजलं नि अख्ख संगीत व कलाविश्व शोकसागरात बुडालं. एका मधुरम स्वर्णकलायुगाचा अंत झाला असं वाटलं. लाखो मनांचं स्पंदन क्षणभर थांबलं ते बाॅलीवूडच्या स्वरसम्राज्ञी स्वरस्वामिनी ज्येष्ठ पार्श्वगायिका आशाताई भोसले यांच्या प्राणज्योत मालवण्याच्या बातमीनं. शनिवारी संध्याकाळी त्यांना, प्रकृती अस्वस्थेमुळे ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना छातीचा संसर्ग झाल्यामुळे अतिदक्षता विभागात त्यांना हलविण्यात आले. रात्रभर उपचार सुरू असताना मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे ९३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी येताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. ‘क्षणभर वारा व सृष्टीचा श्वास थांबण्याचा भास झाला’.

संगीत परंपरेचा वारसा लाभलेल्या मंगेशकर कुटुंबात पिता शास्त्रीय संगीत गायक दिनानाथ मंगेशकर यांच्या तालमीत संगीत प्रवासाची सुरुवात लहानपणी झालेली. फक्त नऊ वर्षाच्या असतानाच वडिलांचे निधन झाले, तरी त्या संगीत साधना करतच राहिल्या. १९४३ ला म्हणजे बालपणीच ‘चला चला नव बाला’ हे पहिले मराठी गीत त्या गायल्या. संगीत ठुमरी, गझल, लावणी, पाॅप संगीत, शास्त्रीय संगीत असे कित्येक प्रकार त्यांनी आपल्या खास शैलीत त्यांनी जिवंत केलेत.

‘चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले.. ‘
‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली’
‘दो लब्जो की है दिल की कहानी’
‘हसना ही तो है जिंदगी..रो रो के जिवन ए खोना ना..जीना है तो हसके जिओ’

असे वीसाहून अधिक भाषांमध्ये १२,५०० हून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम ह्या सूरसम्राज्ञीने केला. अगदी ब्रिटिशांनी बंदी घातलेले ‘संगीत रणदुदुंभी’ या नाटकांतील ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’ हे पद त्यांनी अजरामर केले. संगीतात एक नवे युग सुरू केले. त्यांच्या गळ्यातील माधुर्य सर्वदूर पोहोचले होते. कॅबरेपासून ते शास्त्रीय संगीतापर्यंतचा विविध शैलीतील त्यांच्या बहुआयामीतेसाठी त्या प्रत्येक सूरप्रेमीच्या मनावर अधिराज्य करू लागल्या.

अलिकडे वयाच्या ९१ व्या वर्षी म्हणजे १३ डिसेंबर २०२४ ला त्यांचं शेवटचं गाणं.. ‘सैंया बिना’ हे रिलीज झालेलं. पण हा सर्व प्रवास सोपा नव्हताच मुळात. त्यांच्या जीवनात संघर्षही तेवढाच वाट्याला आलेला. १६ व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी प्रेमविवाह झाला. दोन अपत्यानंतर कुटुंबीयांकडून मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या अपत्याच्या वेळी गणपतराव यांची साथ सोडली व ‘सिंगल मदर’ म्हणून प्रत्येक अडचणींवर मात करत आपल्या आयुष्यात त्यांनी यश संपादन केले. नंतर १९८० मध्ये सुप्रसिद्ध संगीतकार आर.डी.बर्मन यांच्याशी विवाह करून दोघांनी अनेक अजरामर संगीत एकत्रित कलासृष्टीला दिले. आशा भोसले यांची सुपुत्री स्तंभलेखिका वर्षा भोसले हिचा मृत्यू व लगेच तीन वर्षांनी पुत्र हेमंत भोसलेचा कर्करोगाने निधन झाले. एवढे आघात सहन करूनही त्यांनी संगीताची साथ सोडली नाही.

वऱ्हाड व विदर्भाशी त्यांचं खास नातं होतं.अमरावती विद्यापीठाने त्यांना डी.लिट पदवीने सन्मानित केले. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषणने त्यांना गौरवांकीत करण्यात आलं. “दु:खाला कवटाळून लोकांना आनंद देणं ही त्यांची खासियत होती’. आशाताईचं असणं वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देणं होतं, त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारे आहे. कृष्ण बासुरीची साद, अप्सरेच्या पैंजणाची रूणझूण व सरस्वतीच्या विणेची झंकार या तिहींचा मिलाफ म्हणजे आशाताईचा कंठस्वर. हा कंठस्वर आमच्या जीवनाचा स्वरसुगंध झालेला आहे. आशाताईचा देह अनंतात विलीन झालेला. पण स्वरसुगंध कधीही अनंतात विलीन होणारा नाहीच, तो चिरतरुण स्वर प्रत्येक मनात व सृष्टीच्या कणाकणात अनंत काळापर्यंत निनादत झंकारत राहील. ‘आशा दीप बनून सदैव सुखदुःखात आनंद देत राहील’. आज अमर झाले स्वर, तरीही भरून येते मन….!! ह्या असीम स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रा. तारका रूखमोडे
ता. अर्जुनी/मोर, जि. गोंदिया
=======

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 2 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे