वार्षिक क्रीडा संमेलन जल्लोषात साजरे
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
वार्षिक क्रीडा संमेलन जल्लोषात साजरे
व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलचा कल्ला
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे-दि.3 जाने(प्रतिनिधी) महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वडगाव शेरी येथील व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमधील प्राथमिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वार्षिक क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास पुणे मनपा, प्राथमिक विभागाचे क्रीडा प्रमुख श्री. विनायक तुम्मा सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयुर्वेदाचार्य डॉ. प्रितेश शहा यांची विशेष उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हवेमध्ये फुगे सोडून तसेच, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ममता जैन यांनी प्रास्ताविकात, “साऱ्या जगतात विराजमान, असे क्रीडाक्षेत्र करूया विशाल, आरंभ करुनी जागवूया चेतना, पेटवुनी तेजोमय ही क्रीडा मशाल”, अशा काव्यमय शब्दात क्रीडा संमेलनाची भूमिका मांडली. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.रेश्मा कारळे यांनी पाहुण्यांचा स्वागतपर सत्कार करून वार्षिक अहवालाचे वाचन केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना खेळामुळे आरोग्य सुदृढ राहत असल्याचे सांगून व्यक्तीमत्वं विकासात कला व क्रीडा यांचा मोठा वाटा असल्याने क्रीडा संमेलनात नेहमी सहभागी होण्याविषयी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले. क्रीडा संमेलनात सुरुवातीला ई. ४थी व ५ वीच्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिडचे प्रात्यक्षिक सादर केले. ई. ५ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताच्या पार्श्वभूमीवर नृत्याविष्कार घडवला. ई.३री व ४च्या विद्यार्थिनींनी गाण्यांच्या तालावर योगासनांची नयनमनोहर प्रात्यक्षिके सादर केली. चौथी व पाचवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले तालबध्द लेझीम प्रात्यक्षिक लक्षवेधक ठरले. संमेलनात विविध गुणदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा
घेण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या समारोप समारंभात स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालक प्रतिनिधींचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेच्या माजी विद्यार्थिनी योगिता लोहार आणि संस्कृती डेरंगे यांनी कार्यक्रम संयोजनात महत्वाची भूमिका निभावली.शिक्षिका सौ. रुपाली वारे यांनी सर्वांचे आभार मानले.