“भारतीय संविधान लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती”: सविता पाटील ठाकरे
'बुधवारीय काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“भारतीय संविधान लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती”: सविता पाटील ठाकरे
‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस…. ही उद्देशिका वाचतानाही प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोम रोम उभे करणारे हे शब्द. भारतमातेच्या लोकशाहीच्या वेदिकेवर २६ नोव्हेंबर हा दिवस जणू स्वातंत्र्याचा सुवर्णदीप प्रज्वलित करणारा क्षण आहे. संविधानाचा जन्म म्हणजे केवळ एका ग्रंथाची निर्मिती नव्हे, तर जनतेच्या आशा-आकांक्षांचा अखंड श्वास कागदावर उतरलेली एक जागतिक ऐतिहासिक घटना आहे.
आपले संविधान म्हणजे…. न्यायाच्या आकाशात पसरलेला ध्रुवतारा…. स्वातंत्र्याच्या दिशादर्शकाची प्रकाशरेषा…. समतेची सजीव शपथ…. आणि बंधुतेचे उबदार वस्त्र, जे संपूर्ण राष्ट्राला कवेत घेते… या दिवशी आपण केवळ संविधान आठवत नाही, तर त्यातील प्रत्येक मूल्यामागील संघर्ष, त्याग आणि स्वप्नांची अक्षय ज्वाला पुन्हा प्रज्वलित करतो. बाबासाहेब डॉ. आंबेडकरांसह शेकडो राष्ट्रनिर्मात्यांनी प्राणपणाने रचलेला हा दस्तऐवज म्हणजे लोकशाहीच्या मंदिराची शिल्पभींत आहे, जिथे प्रत्येक नागरिक हा शिल्पाचा शिल्पकार आणि मूल्यांचा रक्षक आहे.
संविधान दिवस आपल्याला सांगतो की, ‘स्वातंत्र्य हा आपला जन्महक्क असला, तरी त्याची जबाबदारी हे आपले पवित्र ऋण आहे’. त्यातील काही कलमे कठोरतेची कणखर तलवार वाटतात, तर काही कलमे ममतेची मऊ चादर. काही ठिकाणी ते काळाच्या गतीला आव्हान देणारे अविचल खडक आहे, तर काही ठिकाणी बदलत्या युगाचा वेध घेणारी वाऱ्याची झुळूक. याच विविधतेत या संविधानाचे सौंदर्य दडले आहे. जसे इंद्रधनुष्याच्या रंगांत एकाच वेळी सातही लयबद्ध छटा झळकतात. नागरिकत्व ही केवळ ओळख नाही, ते कर्तव्याचे फुलझाड आहे. ज्याला आपण आपल्या कृतिशीलतेच्या पाण्याने वाढवायचे असते.
“संविधान दिवस म्हणजे लोकशाहीच्या हृदयाचा स्पंदनोत्सव”. एक असा दिवस जो आपल्याला आठवण करून देतो की,’राष्ट्र उभे राहते ते संविधानाच्या सामर्थ्यावर आणि नागरिकाच्या सजगतेवर.’ पाईक संविधान म्हणजे, कागदावर लिहिलेल्या शाईचा इतिहास नाही; तर समाजाच्या श्वासात दररोज नव्याने जन्म घेणारा एक जिवंत मंत्र. जो आपण जपला तर दीप बनेल, आणि विसरला तर धूर.
आज २६ नोव्हेंबर ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘पाईक संविधानाचे’ हा लोकशाही मूल्य जोपासणारा विषय ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी दिला. नेहमीप्रमाणे विषय कोणताही असो त्यास न्याय देण्याचं काम सर्व शिलेदार आपापल्या परीने करत असतात आणि यातूनच होते ती मराठीच्या साहित्याची पायाभरणी. ज्या भाषेचे साहित्य समृद्ध असेल ती भाषा दीर्घकाळ टिकते याचा प्रत्ययही या ठिकाणी येतो. अनेक कवी कवयित्रींनी विषयाला साजेसं लिखाण केलं व दर्जेदार कवितांची जणू आरासच मांडली. संविधानाचे पालकत्व स्वीकारताना नेहमीप्रमाणे आपण एकात्मता, बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करूया. आणि मराठी भाषेसाठी अहोरात्र काम करूया..!!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह



