“लढाई जिंकण्यासाठी शस्त्रांची नव्हे, तर जागृत विवेकाची, प्रामाणिक कृतीची आणि जिवंत माणुसकीची”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“लढाई जिंकण्यासाठी शस्त्रांची नव्हे, तर जागृत विवेकाची, प्रामाणिक कृतीची आणि जिवंत माणुसकीची”; प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“वेडात मराठे वीर दौडले सात…” ही ओळ केवळ तलवारींच्या रणांगणातील शौर्याची नाही; तर ती प्रत्येक काळातील संघर्षाची घोषणा आहे. कारण युद्धांची रूपे बदलतात, शत्रू बदलतात, पण लढाई कधीच संपत नाही. आजही सामान्य माणूस एका अदृश्य रणभूमीवर उभा आहे. फरक एवढाच हातात तलवार नाही, तर जबाबदाऱ्यांचे ओझे आहे. आजचा माणूस महागाईच्या ज्वाळांतून चालतो, निसर्गाच्या आसमानी, सुलतानी संकटाचा सामना करतो, बेरोजगारीच्या वाळवंटातून वाट काढतो आणि असुरक्षिततेच्या वादळातही आपल्या कुटुंबासाठी आशेचा दिवा जिवंत ठेवतो. विकासाचे झगमगते दिवे शहरांना उजळवत आहेत; पण त्या प्रकाशामागे सामान्य माणसाच्या कपाळावरील घामाचे थेंब कोण मोजणार? उंच इमारती आकाशाला भिडत आहेत, पण अनेकांच्या स्वप्नांचे छप्पर अजूनही गळत आहे.
आजची सर्वात मोठी शोकांतिका गरिबी नाही, तर संवेदनांचा दुष्काळ आहे. माहितीचा महासागर वाढला, पण विवेकाचे झरे आटू लागले. संवादाची साधने वाढली, पण मनामनांतील अंतर अधिक गहिरे झाले. माणूस यंत्रांशी जोडला गेला पण माणसांपासून दूर जाऊ लागला. हीच आपल्या काळाची खरी शोकांतिका आहे. लोकशाहीचा अर्थ केवळ निवडणुका नसतो तर सामान्य माणसाच्या आयुष्याला सन्मान मिळणे हा तिचा खरा आत्मा असतो. राष्ट्राची ताकद राजधानीच्या उंच इमारतींमध्ये नसते तर ती शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर उमटलेल्या विश्वासात असते. जेव्हा कष्टाला योग्य मान मिळतो, न्याय वेळेवर मिळतो आणि माणुसकी जिवंत राहते, तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होतो.
मात्र अजून आशेचा सूर्य मावळलेला नाही. प्रत्येक वादळानंतर झाड पुन्हा पालवी धरते, प्रत्येक राखेतून नवजीवन उभे राहते आणि प्रत्येक अंधाराच्या पोटात एका नव्या पहाटेचा जन्म होत असतो. म्हणूनच निराशेने नव्हे, तर जागृतीने पुढे जाण्याची वेळ आली आहे. लढाई अजून संपलेली नाही, कारण अजूनही सामान्य माणसाच्या हातांवर कष्टाचे घट्टे आहेत, डोळ्यांत उद्याच्या चांगल्या दिवसांचे स्वप्न आहे आणि अंतःकरणात न्यायाची आस आहे. ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही ती अन्याय, असंवेदनशीलता, स्वार्थ आणि नैतिक अधःपतनाविरुद्ध आहे. ती जिंकण्यासाठी शस्त्रांची नव्हे, तर जागृत विवेकाची, प्रामाणिक कृतीची आणि जिवंत माणुसकीची आवश्यकता आहे.
इतिहास साक्षी आहे जेव्हा सामान्य माणूस आपल्या अधिकारांसाठी सजग होतो, तेव्हा काळालाही दिशा बदलावी लागते. म्हणूनच……लढाई अजून संपलेली नाही तर ती आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात अजूनही सुरू आहे. खरं तर या आठवड्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार होता, पण घाबरतो तो माणूस कसला?? सर्वांनी आपापल्या परीने संकटावर मात केली कारण निसर्गाशी असलेल्या नात्याला संपून चालणारच नाही. आपण मानव आहोत आपली लढाई अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कधीच संपणार नाही. आज शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी “लढाई अजून संपली नाही” हा विषय दिला. सर्वांनी विषयाला न्याय देताना आपली लेखणी खऱ्या अर्थाने पाजाळली. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन…!!
शेवटी काही मोलाचे बोल…. सामाजिक कविता ही समाजाचे वास्तव, वेदना, संघर्ष आणि परिवर्तनाची आशा यांचे संवेदनशील चित्रण करणारी असावी. तिची भाषा साधी पण प्रभावी, विचार आशयपूर्ण, भावना प्रामाणिक आणि मांडणी रूपक-प्रतीकांनी समृद्ध असावी. कविता केवळ समस्या मांडणारी नव्हे, तर माणुसकी, न्याय आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारी असली, तर ती खऱ्या अर्थाने प्रभावी सामाजिक कविता ठरते. तूर्तास एवढेच…!!
प्रशांत ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक व लेखक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



