‘नवरा मेल्यावर घरातला पुरुषही बनणारी खरी सौदामिनी’: सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
‘नवरा मेल्यावर घरातला पुरुषही बनणारी खरी सौदामिनी’: सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
होय, होय मीच केला तो खून. निर्भीडपणे न्यायाधीशांच्या समोर तिने आपला गुन्हा कबूल केला. एवढंच नाही, तर तिला ना तिच्या या कृत्याचा पश्चाताप होता ना चेहऱ्यावरती कुठलीही भीती. तिच्या नजरेत जणू अंगार पेटलेला होता. न्यायाधीशांनी तिला म्हटले, ‘आपण गुन्हा तर कबूल केलाय,शिक्षेबाबत जरा तरी कल्पना आहे का आपणास’? सूर्य आग ओकतो तशी शब्दांची आग ती ओकू लागली. मी मारलं त्याला. त्याने माझ्या अंगावर हात घातला, माझे सर्वस्व लुटण्याचा प्रयत्न केला. स्वतःचे रक्षण करता करता घातला दगड त्याच्या डोक्यात. ‘होऊ दे जे व्हायचं ते, मी सौदामिनी आहे’.तळपणारी सौदामिनी..! माझ्यासाठी माझे चारित्र्य खूप महत्त्वाचे आहे. तिच्या या रुद्रावताराकडे सर्वजण पाहतच राहिले, अगदी न्यायाधीश सुद्धा.
सौदामीनी अर्थातच वीज, बिजली, दामिनी,चपला, विद्युल्लता, असे कितीतरी अर्थ आहेत या शब्दाचे. पण त्याही पलीकडे तळपणारी, झळकणारी, ‘भारतीय स्त्री ती खरी सौदामिनी आहे’. स्री म्हणजे त्यागाची मूर्ती, परमेश्वराचेच रूप, सहनशीलतेचा कळस.रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचा डोलारा सांभाळणारी ही सौदामिनी राब राब राबते. घर, कुटुंब, ऑफिस कोणत्याही कामात स्वतःला झोकून देते. कधी तळपते तर कधी झळकते. कधी रडते तर कधी रडवते. संकटात निडर बनते तर आनंदात थिरकते. नवरा मेल्यावर घरातला पुरुषही बनते. कुटुंब सावरते तर, कधी शहीद जवानांची पत्नी म्हणून अभिमानाने जगते. कधी संघर्षाची ढाल बनते तर कधी मंजुळ आवाजाने साऱ्या जगाचं गीतही गाते.
किती…? किती कौतुक करावं तिचे? कधीतरी ती कुणाच्या भाव विश्वात स्वतःची जागाही निर्माण करते. म्हणून तर या ओळी मनाचा ठाव घेतात.
चंद्र तू नभातला प्रियतमा…
तुझीच यामिनी मी….
तुझे शितल चांदणे….
तेजस्विनी सौदामिनी मी….
गा तू सप्तसुरांची सुमधुर…
मंजुळ रम्य रागिनी…
चंचल अप्सरा उन्मादक…
रसिक मनमोहिनी मी….
अशा या बहुरंगी सौदामिनीला आज खऱ्या अर्थाने आमंत्रण दिले ते ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी. ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने हा नवा विषय त्यांनी छेडला. आणि काव्य रसिकांच्या लेखणीतून विविध अंगी सौदामिनी आज सगळीकडे पहावयास मिळाली. तेव्हा तुम्हा सर्व रसिकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह