‘गडकरींनी नागपूरचा गड राखला: डॅा अनिल पावशेकर
अगं बाई अरेच्चा...!!!
‘गडकरींनी नागपूरचा गड राखला: डॅा अनिल पावशेकर
अगं बाई अरेच्चा…!!!
१८ व्या लोकसभा निकालांचे कवित्व संपले असून जय पराजयाचे पोस्टमॅार्टेम सुरू झाले आहे. अनेक विद्यमान मंत्र्यांना, दिग्गजांना, सुशिक्षितांना मतदारांनी हिसका दिला आहे तर काहींचे प्राणावर बेतले पण बोटावर निभावले अशी स्थिती झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दणदणीत कामगिरी करत तमाम राजकीय पंडितांना उघडे पाडले असून वही होता है जो मंजूर ऐ पब्लिक होता है, हे या निकालावरून दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या वावटळीत महायुतीची अनेक संस्थाने खालसा झाली असून विदर्भात तर केवळ इन मिन तिन जागांवर महायुती विजयी झाली आहे. मुख्य म्हणजे या रणधुमाळीत भाजपचे हेवीवेट नेते आणि केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांनी अनेक अडथळ्यांची शर्यत पार केली असून सव्वा लाखाच्या वर मतांनी त्यांनी विजयाची हॅटट्रीक साधली आहे.
झाले काय तर मोदी सरकारमधील सर्वाधीक कार्यक्षम आणि ग्लॅमरस मंत्री म्हणून नितीनजी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कामाचा धडाका, कार्याचा व्याप, जनसंपर्क प्रचंड आहे. आसेतुहिमालय त्यांनी महामार्गाचे जे जाळे विणले ते कल्पनातीत आहे. शिवाय आजच्या खुनशी राजकारणातही ते अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. आपल्या देशात विकास कामांसाठी पैशाची कमतरता नसून, प्रामाणिकपणे काम करणार्या नेत्यांची कमी आहे याची स्पष्टोक्ती त्यांनी नुकतीच दिली होती. १९९५ ला राज्यात प्रथमच युती सरकार आले असतांना त्यांना बहुदा शिक्षण खाते देण्यात येणार होते. पण विकासाची मनिषा आणि दूरद्रुष्टी बाळगून असलेल्या नितीनजींनी बांधकाम खात्याचे शिवधनुष्य उचलले.
स्व. बाळासाहेबांचे भक्कम पाठबळ लाभताच नितीनजींनी मिळालेल्या संधीचे अक्षरशः सोने केले. मग ते स्वप्नातला मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्ग असो की मेळघाट सारख्या दुर्गम, दुर्लक्षीत भागांत मार्गांचे जाळे विणने असो. विशेष म्हणजे नितीनजींच्या या कार्याचे राज्याचे तत्कालीन मा.राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी तोंडभरून कौतूक केले होते. बांधकामा सारख्या रूक्ष, रटाळ, उपेक्षित आणि कंटाळवाण्या खात्यात नितीनजींनी प्राण फुंकून ते नंबर वन खाते केले. रस्ते सुंदर दिसू शकतात, महामार्ग विलोभनीय असतात, उड्डाणपूल तुम्हाला मोहीत करू शकतात, शेकडो कि.मी. चा रस्ता प्रवास सुद्धा सुखकर, आरामदायी होऊ शकतो हे नितीनजींनी आपल्या कर्त्रुत्वाने दाखवून दिले.
गडकरी ते रोडकरी ही बिरूदावली कमावलेल्या नितीनजी कोरोना काळात देवदूत बनून आले. वास्तविकतः नितीनजींकडे आरोग्य खात्याचा कारभार नव्हता परंतु त्या काळात प्रचंड अफरातफरी माजली असतांना, जनता हवालदिल झाली असतांना त्यांनी पुढाकार घेत जनतेसह कोरोनाचा मुकाबला केला. पीपीई किट वितरण, रेमडेसीवीर आणि इतर औषधीं उपलब्ध करणे, व्हेंटीलेटर, अॅाक्सिजन सिलेंडर, कॅान्सन्ट्रेटर्स मिळवून देणे, अॅम्बुलन्स, कोवीड वॅक्सिनची कमतरता भासू न देणे आदी कामे जनसेवेच्या तळमळीतून केली. सोबतच खासदार हेल्थ कार्ड काढून जनतेला सवलतीच्या दरात उपचार, दिव्यांगांना क्रुत्रिम अंग वितरण, ह्रदयोपचार, कॅन्सर आदी वैद्यकीय सेवेत सदैव पुढे राहीले. तर क्रीडापटूंसाठी दरवर्षी खासदार क्रीडा महोत्सवाचे ते आयोजन करत आहेत.
राहिली बाब नागपूरची तर केंद्र आणि राज्य सरकारची याबाबत नागपूरवर मेहेरनजर आहे. मेट्रो, सिमेंट रस्ते, दहा बारा उड्डाणपूल, रामझुला, विवेकानंद स्मारकाची निर्मिती तर शैक्षणीय क्षेत्रात आयआयएम, लॅा युनिव्हर्सिटी, एम्स सोबत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी केली. याशिवाय चांदा ते बांदा व्यापार उदीम, आर्थिक आणि प्रवासासाठी राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सम्रुद्धी महामार्ग प्रत्यक्षात उतरवला. अर्थातच एवढ्या भगीरथ कार्याची पार्श्वभुमी असतांना, नितीनजींची विशाल प्रतिमा असतांना मतदारांनी नितीनजींना डोळे झाकून मतदान करायला हवे होते. किंबहुना नागपूरची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. प्रत्यक्षात उलटेच झाले.
सब घोडे बारा टके प्रमाणे इथेही जनतेला उमेदवारांत फरक ओळखता आला नाही. विकास, प्रगतीचा मुद्दा गौण ठरला. विरोधकांच्या अपप्रचाराला जनता बळी पडली. संविधान, आरक्षण, आर्थिक आमिष, जातपात यांत मतदान विस्कटले. त्यातही मतदानाचा टक्का निराशजनक होता. यापुर्वी दोनदा, दोन लाखांच्या वर निर्णायक लिड घेणारे नितीनजी यावेळी फक्त सव्वा लाखाने निवडून आले. प्रारंभी एकतर्फी वाटणारी लढत अडचणीची ठरली. तरीपण सर्वसाधारण मतदार नितीनजींशी प्रामाणिक राहिला आणि त्यांचे जहाज पैलतिरावर लागले. जवळपास ५४% मते घेत नितीनजी तरले, नागपूरचा गड त्यांनी राखला. मात्र यापेक्षा मोठा विजय नक्कीच अपेक्षित होता. शेवटी जनादेशाचा सन्मान करावाच लागेल. मग तोच विचार येतो, जर नितीनजींना जिंकण्यासाठी एवढे कष्ट पडले तर इतर जागी इतर उमेदवारांना किती पापड बेलावे लागले असतील. एक मात्र खरे, अनेक अग्निदिव्यातून, दुष्प्रचारावर मात करत आणि जातीपातीचे दुष्टचक्र भेदून नितीनजी अखेर जिंकले. निश्चितच ते नवीन सरकारची धुरा वाहतांना राज्य आणि देशाला आणखी प्रगतीपथावर नेतील ही अपेक्षा आहे.
दिनांक ०७ जून २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com