‘पिछेहाट झाली,पराभव नव्हे’!; डॅा अनिल पावशेकर
अगं बाई अरेच्चा...!
‘पिछेहाट झाली,पराभव नव्हे’!; डॅा अनिल पावशेकर
अगं बाई अरेच्चा…!
गेले दोन तिन महिने गाजत असलेल्या लोकसभेचे निकाल नुकतेच हाती आले असून एनडीए आणि इंडी आघाडीत कभी खुशी कभी गम ची स्थिती निर्माण झाली आहे. अब की बार चारसौ पार चा नारा देत मैदानात उतरलेल्या एनडीएला धापा टाकूनही तिनशेचा टप्पा गाठता आला नाही तर देशभरात संधी करूनही विपक्ष अडीचशेच्या आत गुंडाळला गेला. भाजपने डबल सेंच्युरी ठोकूनही ते २७२ च्या जादुई आकड्यापर्यंत पोहचू शकले नाही तर कॅांग्रेसची सेंच्युरी अवघ्या एका जागेने हुकली आहे. निश्चितच एनडीए २९२ जागांसह सत्तास्थापनेत आघाडीवर असला तरी इंडी आघाडीला सुद्धा सत्तेचे डोहाळे लागलेले आहेत. याकरीता त्यांनी नितीशकुमार आणि चंद्राबाबूंवर जाळे फेकणे सुरू केले आहे कारण सध्यातरी हे दोघे इम्पॅक्ट प्लेअर असून या दोघांच्या मिळून २८ जागा सत्तेसाठी निर्णायक ठरणार आहेत.
झाले काय तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र ही एनडीएची आघाडीची फळी, इथूनच सत्तेचा राजमार्ग निघतो आणि नेमके इथेच दगाफटका झाला. युपीत सपा, कॅांग्रेसने मतांचे जबरदस्त ध्रुवीकरण घडवत भाजपला बॅकफूटवर ढकलले तर महाराष्ट्रात भाजपने असंगाशी संग केल्याने प्राणाशी गाठ पडली. डॅमेज कंट्रोल साठी भाजप प.बंगाल, राजस्थान आणि दक्षिणेत आस लावून बसला होता मात्र अपेक्षित जागांची दक्षिणा त्यांना मिळालीच नाही. भलेही गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि दिल्लीने मुक्तहस्ताने भाजपवर जागांची उधळण केली परंतु महाकाय देशात केंद्रात एकहाती सत्ता स्थापनेसाठी ते पुरेसं नव्हतं, दात कोरून पोट भरत नसतं.
वास्तविकतः गेली दहा वर्षे मोदी सरकारने देशाच्या विकास, प्रगतीसाठी प्रचंड मेहनत घेतली, काही अविश्वसनीय, कमालीचे निर्णय घेतले. मग ते करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले राममंदीर उभारणे असो की काश्मिरात ३७० कलम रद्द करणे असो. याशिवाय तिहेरी तलाक रद्द करणे, ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्याचा पुरवठा करणे, शेतकर्यांना अर्थसहाय्य करणे असो, प्रधानमंत्री आवास योजना राबवणे असो की आयुषमान भारत, स्वच्छ भारत सारख्या जनकल्याणकारी योजना असो. विकासाभिमुख धोरणाने सेनेचे आधुनिकीकरण, सिमावर्ती क्षेत्रात मार्गांचे जाळे, चंद्रयान, मंगलयान, रेल्वेचे आधुनिकीकरण, विद्युतीकरण, नवनवीन एअरपोर्ट निर्माण करणे असो अथवा मेक इन इंडिया, स्टार्ट अप, आत्मनिर्भर भारत योजना असोत.
मग इतकं सगळं केल्यावर घोड्याने नक्की कुठे पेंड खाल्लं तर प्रचारात आणि जातपात धर्माच्या चिखलात. तुम्ही कितीही चांगले काम केले असले तरी ते जनतेला भिडले पाहिजे, जनमानसाचा ठाव घेणारे असले पाहिजे. शिवाय विरोधकांचे दावे, घोषणा, क्लुप्त्या तेवढ्याच ताकदीने परतवायला पाहिजे. विरोधकांनी संविधान खतरेमें है आणि आरक्षणाचा कळीचा मुद्दा काढून भाजपाची नाकेबंदी करून टाकली. आरक्षण हा मुद्दा तर धरलं तर चावते, सोडलं तर पळते असा आहे. जातपात धर्माला प्रादेशिकतेचा तडका बसताच विरोधकांच्या प्रचाराला धार चढली, त्याचा फटका भाजप उमेदवारांना बसला. यासोबतच प्रादेशिक पक्षांनी अचानक उचल खाल्याने, कॅांग्रेससोबत आघाडी केल्याने एनडीएची कोंडी झाली.
मुख्य म्हणजे इंडी आघाडीने अल्पसंख्यांकांची एकगठ्ठा मते घेतल्याने त्यांना भरपूर जागांची लॅाटरी लागली. शिवाय काही जागी योग्य उमेदवार नसणे तर कुठे उशिरा उमेदवार घोषीत करण्याने पचका झाला. उरलीसुरली कसर अॅंटी इन्कंबसीने भरून काढली. तसेही कुंपनावरील मतदार बदला साठी नेहमीच तत्पर असतो. प्रचारात जो फायनल पंच असतो, इम्पॅक्ट असतो, तो दिसलाच नाही. याऊलट मंगळसुत्र, जादा बच्चेवाले, गॅरंटी, भटकती आत्मा या शब्दांनी फायद्याऐवजी नुकसानच केले. संविधान आणि आरक्षण हे शब्द विरोधकांसाठी तारणहार ठरले. राजकारणात काही व्यक्तिंचे उपद्रवमूल्य भयानक असते, त्यांना उगाच छेडायचे नसते, महाराष्ट्रात ही चूक भाजपा वारंवार करते आणि आपले नुकसान करून बसते.
महाराष्ट्राबाबत आणखी बोलायचे झाले तर इथे मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए अशी परिस्थिती आहे. भाजपने इतर पक्षातील बागी दागी घेऊन दाग अच्छे है भासवण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेला तो फारसा रूचलेला नाही. कॅांग्रेसमुक्त भारत करता करता भाजप केंव्हा कॅांग्रेसयुक्त झाला हे कळलेच नाही. रामनाम जपणार्यांऐवजी आयाराम गयाराम संस्क्रुती बळावल्याने भाजपची प्रतिमा काळवंडली. ना मते मिळाली ना प्रतिष्ठा, थोडक्यात काय तर गाढवही गेले, ब्रह्मचर्यही गेले. पार्टी विथ डिफरंटची, पार्टी विथ डिफॅाल्टर्स झाली. इतर पक्षातील कचर्यातून कलाक्रुती निर्माण नाही झाली, उलट जनक्षोभ आंदण म्हणून मिळाला. वाल्याचा वाल्मिकी योजना जनतेने हाणून पाडली. शेवटी काय तर राम तेरी गंगा मैली हो गई पापीयोंके पाप धोते धोते. राज्यात भाजपला ‘फटे पुराने नोट लिए जाते है’ ही पॅालिसी बदलावी लागेल अन्यथा येत्या विधानसभेत आमची माती आमची माणसं नक्कीच होईल.
अर्थातच काळ्या ढगांना रूपेरी चंदेरी किनार असतेच. एनडीए सत्तास्थापन करेल यात वादच नाही. मात्र हा काठावरचा विजय थोडा धाकधूक वाढवणारा नक्कीच आहे. त्यातही अॅाल आईज अॅान बाबूज असणार. (चंद्राबाबू आणि नितीशबाबू) त्यातही चंद्राबाबूंनी एकदा तर नितीशबाबूंनी अनेकदा एनडीएला सोडचिठ्ठी दिलेली आहे. नितीश सब के है हे माहीत असल्याने ते कुठेही, कधीही, कोणा सोबतही लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहू शकतात. अथवा मन भरल्यास अर्ध्या रात्री घरवापसी करू शकतात. शेवटी काय तर दुभत्या गाईच्या लाता गोड असतात. दोन्ही बाबूंचा जीव कधी केंद्रात तर कधी राज्यात घुटमळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे यांच्या नाकदुर्या काढता काढता येत्या सरकारची पाच वर्षे वाया जायला नको म्हणजे कमावलं.
या निवडणुकीत भाजपाच्या द्रुष्टीने काही प्लस प्वाईंट्स जरूर बघायला मिळाले. पूर्वेत जनाधार वाढून अरूणाचल प्रदेशात भाजपाचा अरूणोदय झाला आहे. ओरीसा विधानसभेत भाजपची सरशी झालेली आहे तर आंध्रात चंद्राबाबूंसोबत ते सत्ताधारी झालेले आहेत. केरळ, तामिळनाडूत लोकसभेची बोहणी झाली आहे तर दिल्ली, प.बंगाल, कर्नाटक, तेलंगाणा इथे विरोधकांचे सरकार असूनही कमीजास्त प्रमाणात जागा खेचण्यात आल्या आहेत. इंडी आघाडीच्या सर्व घटकपक्ष मिळून जेवढ्या जागा नाही त्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपच्या आहेत ही जमेची बाजू आहे.
इंडी आघाडीने मुसंडी जरूर मांडली आहे पण ते सहजासहजी सत्तेला गवसणी घालतील अशी स्थिती नाही. त्यांच्यासाठी तरी सध्या रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात अशी अवस्था आहे. तर भाजपला यापुढे विकासा सोबतच जातीपातीचे गणित सोडवावेच लागेल, उमेदवारी देतांना या निवडणुकींचा अनुभव कामी आणावा लागेल. झाले गेले विसरून आगामी विधानसभांची मोर्चेबांधणी करावी लागेल आणि सोबतच ऊतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका हे ध्यानात ठेवावे लागेल. मुख्य म्हणजे जनतेला ग्रुहीत धरणे सोडा, आयाराम गयारामांना उरावर बसवून घेऊ नका नाही तर भविष्यात अनेक नितीशबाबू, चंद्राबाबूंचे पाय धरावे लागतील. तुर्तास भाजपची पिछेहाट झाली, पराभव नव्हे हे मान्य करावे लागेल.
डॉ. अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com





