“आजोबा आजीची माया म्हणजे वड पिंपळाची छाया”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू काव्य' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“आजोबा आजीची माया म्हणजे वड पिंपळाची छाया”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
आम्हाला नेहमीच सवय झालेली चांदण्यांच्या छताखाली अंथरूण टाकून त्यावर लोळत आजी आजोबांच्या गोड गोष्टी ऐकत झोपी जायचे. पण गेले कित्येक दिवस पावसाने हैराण केले नि ढगांच्या चादरीने चांदण्यांना पांघरूण घातले. मग काय चांदण्याही दिसेनात आणि पावसाची रिपरिप चालूच. त्यामुळे आकाशाच्या छताखाली झोपताही येईना. गोष्टही ऐकायला मिळेना. मग मात्र आम्ही गाल फुगवून बसलो. काहीतरी चुकल्यासारखे वाटायचे. काय ते कळेना पण चिडचिड मात्र वाढली. आमची आजी मात्र जादूगार हां. तिने बरोबर ओळखले काय ते. मग म्हणते कशी चला बाळांनो आज मी तुमच्यासाठी छान छान खाऊ बनवणार आहे. मी खाऊ तयार करणार आणि आजोबा गोष्ट सांगणार. मग आम्ही अगदी कान टवकारून बसलो.आम्हीच काय आमचा बोकाही कान पाडून गोष्ट ऐकत बसला. पावसामुळे त्याला तरी कुठे फिरायला जायला येतेय.?
आजीची खोपडी म्हणजे जादूची पोतडी. आणि आजोबांचा भेजा म्हणजे आयडीयाची मज्जा.! जुनेच पत्रावजा छताचे घर. मातीच्या चुलीचे सैपाकघर आणि त्या चुलीवर शिजायचे आजीच्या हातचे अनेक चविष्ट पदार्थ. कधी जोंधळ्याच्या गरमागरम लाह्या, कधी मक्याच्या लाह्या, कधी कुळीथ,वाटाणे, हरभरे भाजून मिळायचे, कधी भूईमूग तुरीच्या उकडलेल्या शेंगा. कधी उकडीचे मोदक. कधी कधी नुकत्याच व्यालेल्या म्हशीच्या ताज्या चिकाचा खरवस म्हणजे तर पर्वणीच, पुन्हा दही दूध लोण्याची लयलूट, वेगवेगळ्या भाज्या, चुलीतल्या अंगारावर शेकलेली आणि पूर्ण पापुडा आलेली गरम भाकरी त्यावर लोणी किंवा दही ठेचा किंवा झुणका. ही सर्व जीभेची हौस तसेच त्या तांब्याच्या घंगाळात चुलीवर तापवलेल्या पाण्याने परड्यात दगडावर बसून, घासून पुसून आजी आंघोळ घालणार वरून गालावर ओघळ येईपर्यंत डोक्याला खोबरेल आणि वरून एरंडाच पान झाकणार. अनुभवलय का कुणी?
दुसरीकडे आजोबांच्या राजा इंद्राच्या गोष्टी, सूर्यचंद्राच्या सफरी, भूता खेताची कहाणी म्हणजे कानाचीही तृप्ती, अंथरूणावर आजीनेच शिवलेल्या जाड उबदार गोधडीत आजोबांना चिपकून भुताच्या गोष्टी ऐकण्यात एक वेगळीच मजा.. ऐकता ऐकता कधी डोळा लागायचा कळायचे पण नाही. काळ बदलतोय, ‘हम दो हमारे दो’ वरून ‘हम दो हमारा एक, शिवाय तीस पस्तीस वयापर्यंत लग्नच नाही. घरातले वृद्ध वृद्धाश्रमात, मुले पाळणाघरात, आणि आईवडील आयटी कंपनीत, एक दोन बीएचकेच्या स्वप्नपूर्ती साठी हप्त्यांच्या तजवीजीत व्यस्त. घरातले गोकुळ कधीच हरवलं. कधीकाळी आजी आजोबा म्हणजे घरातले वड पिंपळ होते. तेच हद्दपार झालेत आणि गॅलरीतल्या छोट्या कुंडीत बोन्साय होवून बसलेत. नात्या गोत्यातली ओढ जिव्हाळा केवळ औपचारिकता ठरलीय.
या बदलत्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारीय हायकू स्पर्धेकरीता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र जुन्या काळातील आठवणींना उजाळा देते. झोपडीतच खरा स्वर्ग होता याची प्रचिती देते. चित्रात दिसणारी चूल आणि त्यावर ठेवलेले तांब्याचे भांडे म्हणजे उकडीचे पदार्थ बनवणारे त्या काळातील पात्र आहे. याचा संदर्भ घेत अनेकांनी अर्थपूर्ण हायकू पेश केलेत.. या माध्यमातून आपण जुन्या गोष्टींना पुन्हा चर्चेच्या ऐरणीवर आणतोय ही लाख मोलाची गोष्ट आहे. काव्य प्रकार कोणताही असो त्या माध्यमातून पुढच्या पिढीकडे लिखित वारसा सुपूर्द करण्याची जबाबदारी आता या पिढीची आहे.. या दृष्टीने सर्वांनी वास्तववादी लेखन करावे याच शुभेच्छा..!!! मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



