‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत सारळ माध्यमिक शाळेत पोषण आहाराबाबत मार्गदर्शन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत सारळ माध्यमिक शाळेत पोषण आहाराबाबत मार्गदर्शन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग (दि ४ रायगड): स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत जे. एस. एम. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दत्तक गाव सारळ येथील सारळ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनीसाठी किशोरवयीन मुलींच्या समस्या व पोषण आहाराचे महत्व याविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून श्रीमती अपर्णा करंदीकर, किशोरवयीन समुपदेशन केंद्र समन्वयक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग व श्रीमती सुजाता तुळपुळे, लॅब टेक्निशियन जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उप -प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. पंकज घरत, सारळ माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती पाटील, इतर शिक्षक व विदयार्थीनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात स्वस्थ नारी व सशक्त परिवार अभियान याविषयी माहिती दिली व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. श्रीमती अपर्णा करंदीकर यांनी आपल्या व्याख्यानात किशोरवयीन मुलिंच्या समस्यांची माहिती दिली व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींनी मासिक पाळीच्या काळात काय काळजी घेतली पाहिजे तसेच स्वच्छतेचे व पोषण आहाराचे महत्व अपर्णा करंदीकर यांनी विशद केले.
श्रीमती तुळपुळे यांनी विदयार्थीनींना पोषक आहार व योगाभ्यासाचे महत्व सांगितले व विद्यार्थिनींनी आपल्या निरोगी जीवनासाठी जंक फूड व शीत पेय यांचे सेवन करु नये असे आवाहन श्रीमती तुळपुळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. पंकज घरत यांनी केले. सदर कार्यक्रम जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. Adv. गौतमभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.



