मुंबईची भूक क्षमविणारा…’मुंबईचा डबेवाला’ स्वाती मराडे
मुंबईची भूक क्षमविणारा…’मुंबईचा डबेवाला’ स्वाती मराडे
गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे परीक्षण
एक आटपाट नगर… मुंबई त्याचं नाव. दिवस असो की रात्र या नगरीची अखंड चालू धाव. सहा छत्तीस, सात एकेचाळीस, आठ तेवीस.. अशीही लोकलची वेळ असते हे तुम्हाला इथेच समजेल. कधीही न झोपणारं शहर असा उल्लेख केला तरी तो वावगा ठरणार नाही. अनेक व्यवसाय इथे पाय रोवून उभे आहेत. त्यामुळेच ही नगरी आहे देशाची आर्थिक राजधानी.
कामावर श्रद्धा असणारे येथील लोक वेळेवर कामावर पोहचतात. त्यासाठी कधी पहाटे तर कधी रात्री त्यांना घराबाहेर पडावे लागते. पण त्याला कधीच भुकेची चिंता वाटली नाही. कारण १८९० पासून वेळेवर डबा पोहचवायला.. तोही ताजा व घरचा डबा.. त्याच्यामागे खंबीरपणे उभा आहे तो मुंबईचा डबेवाला. मुंबईची भूक क्षमविणारा हा डबेवाला.. डोक्यावर गांधी टोपी व पांढरा पोशाख घालून यांची पलटण सज्ज होते. पलटण यासाठी की आर्मीप्रमाणे शिस्तबद्ध चालणारे यांचे काम.. कुठेही कागदाचा वापर न करता केवळ डब्यावर विविध रंगात टाकलेले नंबर व कोड यांच्या वापराच्या आधाराने अगदी अचूकपणे ज्याचा त्याचा डबा बरोबर पोहोच होतो. चूक होण्याचे प्रमाण अगदी नगण्य म्हणजे दीड कोटी डब्यांमागे एखादे. सर्व डबे पोहोच झाल्याशिवाय कोणताही डबेवाला जेवत नाही हेही विशेषच. केवळ कामावरची श्रद्धाच नव्हे तर ग्राहकांना दैवत मानून केलेली ही प्रामाणिकपणाची सेवाच. त्यांच्या या शिस्तबद्धेतेने, अचूकतेने, कौशल्याने अनेकजण प्रभावित न झाले तरच नवल. त्यामुळेच चित्रपट क्षेत्रालाही याची मोहिनी पडली. हिंदी सिनेमा ‘लंच बाॅक्स’ व मराठीमध्ये ‘मुंबईचा डबेवाला’ यात अनेकांनी याची झलक पाहिली असेलच. एवढ्या मोठ्या मुंबईत, सतत धावणाऱ्या शहरात.. गर्दीने फुललेले रस्ते असतानाही कानाकोपऱ्यात वेळेवर डबे कसे पोहचतात याची उत्सुकता मॅनेजमेंट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ते परदेशी कार्पोरेट संस्थांनाही लागते. त्यामुळे फोर्ब्जसारखे मासिकही यांची दखल घेत मुंबईच्या डबेवाल्यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर करून देते. मग महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिका तरी यामध्ये मागे कशी राहील? यातूनच वांद्रे येथे ‘डबेवाला संग्रहालय’ तर मीरा रोड बसस्थानकाची सजावट डबेवाल्यावरून प्रेरित होऊन करण्यात आली. अनेकांना ती भावली व आनंद देणारीही ठरली. त्यामुळे हे बसस्थानक शिल्प पाहताच ओठांवर शब्द उमटतात.. तुमच्या काटेकोर, अचूक, प्रामाणिक कार्यास.. हीच खरी मानवंदना..!
अखंड धावत राहता तुम्ही.. पहात नाही रात्रंदिना
मुंबईची भूक भागविण्या, झिजविता देहचंदना
डबेवाले रूपात साकारले बसस्थानक शिल्प
तुमच्या कार्यास हृदयापासून..हीच मानवंदना..!
मग आमचा मराठीचे शिलेदार समूह तरी यात मागे कसा राहील. चित्र चारोळी स्पर्धेचे औचित्य साधून मीरा रोडवरील डबेवाला थीमचे बसस्थानक असणारे चित्र स्पर्धेसाठी आले. खरेतर मुंबईचा डबेवाला माहीत नाही असा महाराष्ट्रीयन विरळाच असेल. पण त्यावर आधारित असे एखादे बसस्थानक असेल याची कल्पना अनेकांना नाही. त्यामुळे हे नक्की काय असावे? हा प्रश्न अनेकांना पडला असावा. नेहमीपेक्षा सहभाग कमी जाणवला. ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांनीच खूप छान अशी चारोळीरूपी मानवंदना दिली. त्यांचे अभिनंदनच.
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे, इंदापूर जि. पुणे
मुख्य परीक्षक, कवयित्री, लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह.



