मिठी घट्ट होताना,भावनाविष्कारांचे दर्शन; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“मिठी घट्ट होताना,भावनाविष्कारांचे दर्शन; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘मिठी’ मारणं हे आता अगदी सामान्य झाले आहे. कार्पोरेट जगतात तर हस्तांदोलन करणं आणि मिठी मारणं अगदी सहजगत्या स्वीकारलं गेलं आहे. आपल्यावरील पाश्चात्य संस्कृतीचा पगडा याला कारणीभूत आहे. आपल्या मनातील भावना प्रगट करण्याचं मिठी एक माध्यम आहे. आपण जर दु :खी असलो, विमनस्क असलो आणि आपल्या जवळच्या व्यक्तीनं आपल्याला मिठीत घेतलं तर, मनाला दिलासा मिळतो. असं म्हणतात मिठी मारल्यानंतर माणसाचं टेंशन गायब होतं. त्याचं रक्ताभिसरण सुधारतं. तसंच तो सकारात्मक राहतो.
काही महिन्यांपूर्वी घडलेली एक घटना आठवली. लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजूस आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात अडकलेले ते एकाच कुटुंबातील पाचजण. जीवाच्या आकांतानं त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. आपला जीव वाचावा म्हणून. समोर साक्षात मृत्यू उभा. त्या एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेतच काळानं त्यांना मगर मिठी घातली. पाचही जण बुडाले त्या पाण्यात. ही जीवघेणी, दु:खात बुडालेली मिठी.
रामभरत भेट, राधाकृष्ण यांच्या निर्मळ प्रेमातून साकारलेली मिठी, कृष्ण सुदाम्याची निर्व्याज प्रेम भरली मिठी अजरामर आहे. शिवरायांना अफजलखानानं मारलेली मिठी आणि त्यानंतर वाघनखे खुपसून त्याचा झालेला वध सर्वश्रुत आहे. शिवरायांच्या पराक्रमाची ही मिठी द्योतक आहे. लहान मूल रडत असताना त्याला कुणी मिठीत घेतलं तर ते शांत होतं. ही मायेची मिठी. खूप आनंददायी. अनेक दिवसांनंतर, किंवा काही वर्षांनंतर आपल्या मित्र, मैत्रिणी आपल्याला भेटताच आपण जी घट्ट मिठी मारतो ती आनंदाची. आपलेपणाची ऊब त्या मिठीत निश्चितच जाणवते.
मिठी घट्ट होताना त्यात आनंद, दु:ख, कौतुक, आश्चर्य विरह, हास्य अशा अनेक विध भावनांचा आविष्कार दिसतो. प्रणयातुर युगुलाच्या मिलनोत्सुक मिठीप्रमाणे इतर प्रसंगी सहजपणे मारलेली मिठी किती बोलकी असते. ‘शब्देविण संवादु अशी असते. जेंव्हा विठूनामाच्या गजरात दंग झालेले वारकरी एकमेकांना मिठीत घेतात तेंव्हा तिथं भक्तीचे मळेच फुलतात. आजच्या सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी, स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला विषय ‘मिठी घट्ट होताना’ खूप वेगळा पण; विचार करायला लावणारा आहे. स्पर्धेला शिलेदारांनी प्रतिसाद चांगला दिला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. रचनेचा फाफटपसारा हा अतिशोक्तीचा भाग आहे. खरे तर मतितार्थ शोधून तो कलाटणीत उतरावला तर दर्जेदार त्रिवेणीचे दावेदार आपणास असाल असा आम्हास विश्वास वाटतो. पुढील सर्व साप्ताहिक स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा…!!!
वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



