“लाडक्या महायुतीचा खटाखट विजय”; डॅा अनिल पावशेकर
स्तंभलेखक: डॉ अनिल पावशेकर
“लाडक्या महायुतीचा खटाखट विजय”; डॅा अनिल पावशेकर
अगं बाई अरेच्चा…!!
स्तंभलेखक: डॉ अनिल पावशेकर
अवघ्या भारतवर्षाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती आले असून भाजपा महायुतीच्या वादळात इंडी आघाडी जमीनदोस्त झाली आहे. हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्रातील जनतेने जातीपातीच्या भिंती तोडत जातीयवादी विरोधकांना आडवे केले आहे. दोन्ही राज्यांमध्ये जातीपातीच्या समुहाद्वारे राज्य, केंद्र सरकारला वेठीस धरण्याचा दुष्ट प्रयत्न जनतेने हाणून पाडला आहे. भाडोत्री आंदोलन जीवी असोत की अंधश्रद्धेचे मानवी बॅाम्ब असोत अथवा काकस्पर्श झालेले पोपट असोत, सुज्ञ जनतेने विवेकबुद्धीला स्मरत महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान केले आहे.
खरेतर लोकसभा निवडणूकांनी समस्त राजकीय पक्षांना डोळस निकाल दिला होता. यांत एनडीए ची पिछेहाट झाली होती तर म्रुतप्राय इंडी आघाडीला जीवदान मिळाले होते. भाजपने चारसौ पार च्या धक्क्यातून सावरत सरकार स्थापन केले तर इंडी आघाडीचा वारू अल्प यशाने बेभान झाला होता. ५४३ पैकी ९९ जागा जिंकलेला कॅांग्रेस पक्ष ९९ टक्के यश मिळाल्यासारखा उडत होता. तर एकंदरीत इंडी आघाडी उन्मत्त, उद्दाम होत गेली, जणुकाही स्वर्ग त्यांना दोन बोटे उरला होता. इंडी आघाडीने लोकसभेला जे फेक नॅरेटीव्ह सेट केले, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून जे थोडेफार यश मिळवले ते त्यांना पचले नाही. जनतेला इंडी आघाडीला मदत केल्याचा पश्चाताप झाला होता आणि त्याचा हिशोब जनतेने विधानसभेत चुकता केला आहे.
राहिली बाब महाराष्ट्राची तर तीन नापासांनी मिळून भाजप नावाच्या मेरीट विद्यार्थ्यांला गंडवले होते. मात्र अमर अकबर अॅंथनी उर्फ जॅान जानी जनार्दनच्या मविआने सत्ता मिळताच आपले खरे रूप दाखवून राज्यात बेबंदशाही माजवली. मग ते पालघर, करमुसे, कंगणा, नारायण राणे, अर्नव प्रकरण असो अथवा कोवीड महामारीतील घोटाळे असोत. एवढेच नव्हे तर नॅशनल हायवे असो अथवा विकास प्रकल्प असोत, मविआ सरकार स्थगिती सरकार म्हणून कुप्रसिद्ध झाले होते. अरेरावी, दडपशाही आणि भोंगळ कारभाराने राज्याचे तीनतेरा वाजले होते. अखेर एकनाथ शिंदेंनी वेगळी चूल मांडून भाजपशी हातमिळवणी करत मविआची अराजकता संपुष्टात आणली.
लोकसभेत झालेल्या चुकांतून धडा घेत महायुतीने विधानसभेत एकदिलाने लढण्याचा चंग बांधला होता. तसेही भाजपा शिंदेसेनेचे नाते बांहो में तेरे मस्ती के घेरे सारखे होते तर अजितदादांच्या एंट्री ने युती बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए असे होण्याची भीती होती. मात्र काळवेळेचे भान ठेवत तिन्ही पक्षांनी इंडीला गाडून विधानसभा सर करण्याचा संकल्प केला होता. अर्थातच अजितदादा आणि चक्की पिसिंगचा वादग्रस्त मुद्दा असला तरी त्यांनी आजन्म दुसर्यांचे घर फोडणार्यांना जी जन्माची अद्दल घडवली, त्यामुळे ते महायुतीत हवेहवेसे वाटत होते. पण विधानसभा एवढी सोपी अजिबात नव्हती. २०२४ पर्यंत महाराष्ट्रात शाफुआ नावाचा परवलीचा शब्द होता, त्याची जागा २०२४ ला आसंजा (आरक्षण, संविधान, जातनिहाय गणना) या शब्दाने घेतली होती आणि पुन्हा एकदा महायुतीला या संभ्रम, दुष्प्रचाराचा भोपळा फोडणे गरजेचे होते, जे त्यांनी सहजपणे केले.
जिथे महायुतीत सगळं अॅाल इज वेल होतं, तिथे इंडी आघाडीत मुख्यमंत्री पदावरून मोगलाई, बेदिली माजली होती. इंडी आघाडीत या मुद्द्यावर खाटा कुरकुरायला लागल्या होत्या आणि हम भी डुबेंगे सनम तुम को भी ले डुबेंगे सारखी परिस्थिती उद्भवली होती. इंडीच्या दिमतीला निर्भय बानो, काकस्पर्शी मिडिया, चाय बिस्किट पत्रकारांची फौज होती. यामुळेच महायुतीला काहीतरी गेमचेंजर प्लॅन हवा होता, जो त्यांनी लाडकी बहीण योजनेद्वारे अंमलात आणला. प्रारंभी इंडी आघाडीने या योजनेची येथेच्छ टिंगल टवाळी केली. लाडक्या बहिणींचा भरघोस प्रतिसाद पाहता इंडीने भ्रामक खटाखट योजना प्रस्तुत केली. मात्र लाडक्या बहिणींना लबाडाचं आवतन जेवल्या शिवाय खरं नाही हे चांगलंच ठावूक होतं.
विधानसभेचे रणमैदान सज्ज झाले होते, दोन्ही बाजूंनी दंडबैठका सुरु होत्या. पण निर्णायक वार करण्यासाठी महायुतीने अमोघ शस्त्राचा वापर करणे ठरवले होते आणि त्यासाठी निवड केली होती, आदित्यनाथ योगी यांची. लोकसभेला इंडीला झालेल्या एकगठ्ठा मतदानाचा तोड योगी यांनी हळुवारपणे काढला. त्यांचा बटेंगे तो कटेंगे या नार्याने हिंदूंच्या मनातील खदखद बाहेर पडली. योगींनी जळजळीत वास्तव मांडताच हिंदूंना आपल्या मतांची किंमत कळली. अभी नहीं तो कभी नहीं हे जाणत हिंदू मतदानासाठी पेटून उठला. भरीस भर म्हणून मोदींच्या एक है तो सेफ है घोषणेने हिंदू मन आश्वस्त झाले. लोकसभेची उतराई म्हणून यावेळी त्यांनी महायुतीला सुगीचे दिवस आणून दिले.
२३ नोव्हेंबर २०२४ हा दिवस महायुती साठी सोनियाचा दिनू ठरला. भाजपने दिडशेच्या दिशेने झेप घेतली तर शिंदेसेना, अजितदादांनी पन्नाशीला गवसणी घातली. इंडी त्रिकूटाला पन्नाशीत गारद करत जनतेने हिंदुत्वाच्या बाबन्नकशी सोन्यावर शिक्कामोर्तब केले. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही, साल्यांनो मी तुमच्या देवांचा बाप आहे, तसेच वक्फ बोर्ड प्रकरण आणि १७ मागण्या संदर्भात ममत्व दाखवत इंडीने हिंदुत्वाचा दु:स्वास केला, हिंदूंना डिवचले, खिजवले, खजील केले. यामुळेच हिंदूंनी खुन्नसपणे मतदान करत इंडीला सुपु्र्दे खाक केले. हिंदू देवीदेवतांचा अपमान करणाऱ्यांना उपरवाले की लाठी की आवाज नहीं होती, सिर्फ अहसास होता है याची जाणीव झाली असावी.
या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस मॅन ऑफ द मॅच ठरले. विरोधकांकडून सातत्याने होणारी टीका, जात आणि कुटुंबावर होणारे शिव्याशाप आरोप यांना एकटे देवेंद्रजी पुरून उरले. अकेला देवेंद्र काय करू शकतो याचे चोख प्रत्युत्तर दिले. मुंबई तोडण्याचा डाव असो की उद्योगधंदे गुजरातला नेण्याचा कांगावा, संविधान बदलने असो की आरक्षण प्रश्न असो देवेंद्रजींनी विरोधकांना चांगलाच धडा शिकवला आहे. थोडक्यात काय तर केंद्र राज्य सरकारच्या विकासामुख योजना, लाडकी बहीण योजना, मतदानाची वाढलेली टक्केवारी, राज्यात एकाच दिवशी मतदान घेणे, इंडीचे फेक नॅरेटीव्ह मोडून काढणे, हिंदुत्वाची पाठराखण करणे याशिवाय बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या घोषणांनी राज्यात महायुतीची त्सुनामी आली, महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार आले. २०१९ च्या दगाबाजीचा हिशोब जनतेने २०२४ ला व्याजासहीत पुर्ण केला. १०५ घरी बसवणार्यांच्या उरावर २३० बसवून देवेंद्रजींनी इंडी आघाडीला यहां के ‘हम है सिकंदर’ हे दाखवून दिले आहे.
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com