“कुठे लुप्त झाली.. ? ती “आनंदी ” अंगत पंगत”; शर्मिला देशमुख
आम्ही बालकवी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“कुठे लुप्त झाली.. ? ती “आनंदी ” अंगत पंगत”; शर्मिला देशमुख
आम्ही बालकवी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
उन्हाळ्याची असो की दिवाळीची सुट्टी आम्हा सर्वांना मामाच्या गावी जाण्याची ओढ लागायची .आठ दिवस आधीच बॅग भरून आम्ही मुले तयार असायचो .मामा कधी येणार ?त्यांची वाट डोळ्यात प्राण आणून बघायचो. प्रवासात पळणारी झाडे पाहताना नेहमी प्रश्न पडायचा की, जवळची झाडे मागे पळतात आणि दूर पाहिले की ते विरुद्ध दिशेला पळताना दिसतात,असे कसे? बस मध्ये खिडकी जवळ बसण्याची तर मजा न्यारीच. अशी मजा पहाता पहाता आम्ही मामाच्या गावी जाऊन पोहोचायचो. एकदा का मामाच्या गावी पोहोचलो की मग आमच्या इतके *आनंदी* आम्हीच!!!
आज या प्रसंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे आज राहुल दादांनी बालकाव्य स्पर्धेसाठी दिलेला “अंगत पंगत ” हा विषय .लहानपणी मामाच्या गावी गेले की अंगणात सगळे एकत्र जेवणासाठी बसायचे पूर्ण गल्ली जणू एकच घर बनायचे. सर्वांनी एकत्र जेवण करायचे .आम्हा मुलांना तर ही अंगत पंगत म्हणजे मोठी पर्वणीच होती .कितीतरी वेळ दंगा मस्ती करायची मग जेवायला सगळे एकत्र बसायचे त्यावेळी अंगत पंगत करून खाल्लेल्या जेवणाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. बऱ्याच वेळा वाटते तो काळ वापस यावा. असे वाटण्याचे कारण म्हणजे आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत कशाची सुट्टी आणि कशाचे मामाचे गाव? कशाची रंगत अन् कसली अंगत पंगत?? आपण आपल्या संस्कृती बरोबर एकमेकांबद्दलचा आदरभाव , प्रेम ,माया ,वात्सल्य, आपलेपण, या जाणिवाच विसरलो आहोत असे वाटते.. मोठ्या घरातील छोट्या कुटुंबात चार माणसे पण चार वेगवेगळ्या वेळांना जेवतात आणि सोबत असतो मोबाईल. अंगती पंगती नंतर सर्वांची बसणारी सभा, चर्चा , गप्पागोष्टी ,हसी मजाक, आजी आजोबांच्या गोष्टी , गुढात्मक कथा या सर्वांना आजची पिढी जणू मुकली आहे. हे मागील अनुभव जर आज मुलांना सांगितले तर त्यांच्या डोळ्यात कमतरतेचे भाव आणि चेहऱ्यावर आनंद दिसतो ,जणू काही ते आपण सांगतानाच त्यांची अंगत पंगत मनात सजवत असतात. जणू स्वप्नात ते अंगत पंगत करून जेवणाचा आनंद घेत असतात.राहुल दादा नेहमीच वेगळ्या विषयाची निवड स्पर्धेसाठी करतात आणि विषय वाचून मला वाटले की, पूर्वीची अंगत पंगत राहुल दादांना परत प्रत्येकाच्या घरात सजवण्याची इच्छा तर नसेल ना? बालकांना मनसोक्त आनंद पुन्हा मिळवून देण्याची प्रेरणा तर ते आपल्याला देत नाहीत ना?
चला आपण मराठीचे शिलेदार तरी किमान आपल्या मुलांना अंगत पंगत चा आनंद देऊ या. लवकरच येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत मुलांसोबत अंगत पंगतीचा आनंद आपणही घेऊ या . आपली संस्कृती जपू या. आनंद देऊ अन् घेऊ या ..मोठ्यांच्या छत्रछायेची आशीर्वादाची सावली आपल्या मुलांवर पाडू या. मग आहात ना तयार अंगत पंगत रंगवायला?
असो ..नेहमी भरगच्च काव्य फुलांनी सजणाऱ्या बालमनाच्या समूहात आज शुकशुकाट दिसून आला. मन खिन्न झाले ,परीक्षण लिहावे कशावर? हा यक्ष प्रश्न होता.. मागील बालकाव्याच्या परीक्षणाच्या वेळेस बावीस कविता होत्या हे अभिमानाने सांगणारी ,आज मी पाच-सहा कवितांवर व्यक्त होत आहे, ही खेदाची बाब. ज्या शिलेदारांनी अंगत पंगत रंगवली त्यांनी मात्र ती मस्तच रंगवली.
हे बालमनाच्या शिलेदारांनो जीवन जगून घ्या ,बालमनाच्या कोमल भावनांना मुक्त वाट द्या, राहिलेले बालपण पुन्हा जगून घ्या, लुप्त झालेल्या कल्पनांना आकाशी भरारी द्या आणि दिसू द्या आम्ही आजही बालकच आहोत …..मनाने. सर्व शिलेदारांना बालकाव्य लेखनासाठी भरभरून शुभेच्छा. मला परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल राहुल दादांचे मनस्वी आभार. बस इतकेच….!!!
शर्मिला देशमुख -घुमरे,बीड
सहप्रशासक/ संकलक/ परिक्षक
मराठीचे शिलेदार समूह