‘संपाचे काय झाले.. पूर्ततेचे आश्वासन की शाब्दिक बोळवण !’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रकाव्य स्पर्धेचे परीक्षण
‘संपाचे काय झाले.. पूर्ततेचे आश्वासन की शाब्दिक बोळवण !’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रकाव्य स्पर्धेचे परीक्षण
‘आम्ही, आई बाबांना निरोप देतो सर तुमचा; आमच्यासाठी लढताय तुम्ही..!!’ या शिर्षकाची बातमी मराठीचे शिलेदार समूहाच्या बिनधास्त न्यूज पोर्टलवर सर्वांनी वाचली असेलच. या बातमीतील ‘आम्ही शिक्षक बुधवारी सामूहिक रजा घेऊन मोर्चा काढत आहोत- तुमच्या शिक्षणासाठी..!’ अगदी हाच मजकूर आम्ही शिक्षकांनी वर्गातील मुलांना सांगितला. पण अचानक संध्याकाळी व्हाटस ॲपवर आम्हालाच निरोप आला. पुणे जिल्ह्यातील पावसाचा यलो अलर्ट व पंतप्रधान साहेबांचा दौरा यामुळे मोर्चास परवानगी नाकारली आहे. सर्वांनी शाळेत जायचं आहे. झालं… पुन्हा शालेय ग्रुप वर शाळा असल्याचा निरोप धाडला. पण दुसऱ्या दिवशी सगळ्यांकडूनच विचारणा होऊ लागली.. संपाचे काय झाले? शाळेचा दिवस संपला पण आम्हालाही उत्सुकता लागलेली इतर जिल्ह्यांमध्ये.. संपाचे काय झाले? हेच अधोरेखित झाले बळवंत डावकरे दादांच्या रचनेतून.
*वज्रमूठ ही एकजुटीची*
*निघाला आक्रोश मोर्चा*
*सांगा संपाचे काय झाले?*
*झाली का सहेतुक चर्चा?*
उत्सुकतेपोटी शोध घेतला. इतर सर्वच जिल्ह्यांत सर्व शिक्षक संघटनेतील सर्व शिक्षक एकीची वज्रमूठ वळून जिल्ह्याच्या ठिकाणी आलेले. यावेळी एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे जि. प. शाळा टिकवण्यासाठी व न्याय्य मागण्या असतील तर सर्व शिक्षक एक होऊन लढतात. ही एकी पाहून शासनाने दखल घेतली आणि मुंबईत मिटींगसाठी मंत्र्यांनी आश्वस्त केले.मनात अशीही शंका आली, ती म्हणजे केवळ चर्चेचे गाजर दाखवून आश्वस्त केले की काय? का केवळ शाब्दिक बोळवण झाली ? हीच शंका मांडणारी इंदू मुडे ताईंची ही रचना
*आवेदन देवून मागण्यांचे*
*सर्वच मोर्चेकर घरी गेले*
*कोणास ठाऊक शासन दरबारी*
*संपाचे काय झाले?*
संपाचे काय झाले.. हे तर येणारा काळच सांगेल. परंतु सद्यस्थितीत होणारी शिक्षणाची हेळसांड थांबावी हे मनोमन वाटते. शासनाकडून येणारी नवनवीन परिपत्रके, उदंड उपक्रम, शाळाबाह्य कामे, ऑनलाईन कामे यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांची होणारी घुसमट देखील विष्णू संकपाळ दादांनी अधोरेखित केली.
*शाळाबाह्य जबाबदारीत*
*घुसमटताहेत गुरू शिष्य*
*कळेना संपाचे काय झाले?*
*कसे घडेल बाल भविष्य…!*
खरेतर गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेसाठी आलेले शिक्षक मोर्चेकऱ्यांचे चित्र पाहून जणू भावनिक प्रश्नच आला.. ‘संपाचे काय झाले?’ हा चित्र चारोळी विषय होऊन. वैचारिक लेखणीने मनाची पकड घेतली. बी. एस. गायकवाड दादा व सरला टाले ताईंनी एकापेक्षा एक सरस रचनांची बरसात केली. सर्वांच्याच रचना वेगळेपण घेऊन आल्या. अरे हे तर अगदीच बरोबर आहे.. असेच प्रत्येक रचना वाचताना जाणवले. असेच वैचारिक, मार्मिक व भावस्पर्शी लेखन व्हावे या शुभेच्छा व सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार ????
स्वाती मराडे इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक सहप्रशासक लेखिका
मराठीचे शिलेदार समूह