कवी वेणुप्रशांत यांच्या युध्द न संपणारे संग्रहावर चर्चेचे आयोजन
शहर प्रतिनिधी रजत डेकाटे, उमरेड
कवी वेणुप्रशांत यांच्या युध्द न संपणारे संग्रहावर चर्चेचे आयोजन
मानवी मूल्ये रसातळाला गेल्याचे चित्रण या संग्रहात – प्रमोदकुमार अणेराव
शहर प्रतिनिधी रजत डेकाटे, उमरेड
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर/ उमरेड( दि २ डिसे): स्थानिक उमरेड येथील विचार मंथन समूहाव्दारे आयोजित कवी वेणुप्रशांत (डॉ. प्रशांत राऊत) यांच्या युध्द न संपणारे या कवितासंग्रहावर साने गुरूजी ज्येष्ठ नागरिक मंडळ सभागृहात ग्रंथचर्चेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अध्यक्षस्थानी श्री. शरद आटे तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. सुरेश झुरमुरे आणि भाष्यकार म्हणून भंडारा येथील साहित्यिक श्री प्रमोदकुमार अणेराव मंचावर उपस्थित होते.
अणेराव यांनी कवितासंग्रहातील आशयाचे बहुआयामी पदर उलगडून सांगीतले. संवेदनशील कविला अस्वस्थ वर्तमान लिहिते करतो. जगातील सर्व प्रकारच्या युध्दावर कवीने परखड भाष्य केले आहे. नव्वदोत्तर कवीच्या पीढीचा हा कवी प्रतिनिधी आहे. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आणि उत्तर आधुनिकतेचे मानवी जीवनावर झालेल्या परिणामाचे चित्रण या संग्रहात आहे असे अणेराव म्हणाले. वेणुप्रशांत यांच्या कवितांचे वाचन करताना साहिर लुधियानवी यांच्या कवितांची आठवण होते म्हणत साहिरच्या कवितांचा उल्लेख अणेराव यांनी विवेचनात केला. याप्रसंगी कवी वेणुप्रशांत यांनी त्यांच्या संग्रहाची चर्चेसाठी दखल घेतल्याबद्दल विचार मंथन समूहाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
युध्द न संपणारे या संग्रहातील दिर्घकवितेचे अभिवाचन श्री संजय बन्सल यांनी केले. भाष्यकारांचा परिचय अॅड. शितल झाडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला जाणकार वाचकरसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विचार मंथनच्या सदस्यांनी खूप परिश्रम घेतले.



