‘मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती कृतज्ञतेचे मनोगत; सीमादेवी बेडसे
प्रसिद्ध कवयित्री सीमादेवी यांचे मनोगत

‘मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती कृतज्ञतेचे मनोगत; सीमादेवी बेडसे
आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अविस्मरणीय ठरला. सकाळी मोबाईल पाहिला आणि आदरणीय दादांचा “तुमचा फोटो पाठवा” हा संदेश दिसला. तो संदेश वाचताच मन आनंदाने भरून आले. कारण यापूर्वीही माझ्या एका सर्वोत्कृष्ट चारोळीच्या निमित्ताने दादांनी फोटो पाठवण्यास सांगितले होते; परंतु त्या दिवशी घरी पाहुणे आल्यामुळे दिवसभर मोबाईल पाहण्याची संधीच मिळाली नाही. संध्याकाळी संदेश पाहिल्यानंतर तातडीने फोटो पाठवला खरा, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्या क्षणी मनाला खूप खंत वाटली. नियम सर्वांसाठी सारखेच असतात आणि वेळ निघून गेल्यानंतर संधी परत मिळत नाही, हे वास्तव स्वीकारावे लागले. त्या दिवसापासून मनात एक हुरहूर कायम होती.
मात्र आज पुन्हा दादांचा संदेश पाहिला आणि क्षणाचाही विलंब न करता फोटो पाठवला. त्यानंतर माझ्या “आपलं स्थान” या चारोळीला सर्वोत्कृष्ट सन्मान मिळाल्याची आनंदवार्ता मिळाली आणि मन अक्षरशः भारावून गेले.
“आपलं स्थान” हा विषय समोर आल्यानंतर मनात अनेक विचार उमटले. जगात अनेक प्रकारची स्थाने असतात—पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे, निसर्गरम्य स्थळे; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे असते ते माणसांच्या मनातील स्थान. आपल्या आयुष्यात काही व्यक्तींना आपण विशेष मान,आदर आणि प्रेमाचे स्थान देतो. कधी कधी आपल्याला वाटते की जसे आपल्या मनात त्यांचे स्थान आहे,तसेच त्यांच्या मनातही आपले स्थान आहे.पण काही वेळा वास्तव वेगळे असते.
या भावनेतून, विचारमंथनातून ही चारोळी सहज उमलली आणि शब्दरूपाने समूहात उतरली. माझ्या या भावनांना परीक्षकांनी समजून घेतले, त्यांचे मूल्य जाणले आणि माझ्या रचनेला सर्वोत्कृष्ट सन्मानाने गौरविले, यासाठी मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे.
या सन्मानासाठी आदरणीय राहुल सर, पल्लवी ताई, सखी सविता तसेच सर्व मान्यवर परीक्षकांचे आणि सन्माननीय दादांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. आपल्या प्रोत्साहनामुळेच आम्हा नवोदितांना लेखनाची प्रेरणा मिळते आणि अधिक चांगले लिहिण्याची उर्मी निर्माण होते. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार!
श्रीमती सिमादेवी बेडसे चाळीसगाव
सदस्या मराठीचे शिलेदार समूह



