अलिबाग कारागृहात माणुसकीचा रक्षाबंधन सोहळा; १२० कैदी बांधवांना बांधली राखी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग कारागृहात माणुसकीचा रक्षाबंधन सोहळा; १२० कैदी बांधवांना बांधली राखी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग : उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग कारागृहामध्ये कैदी बांधवांसोबत रक्षाबंधनाचा एक भावनिक, प्रेरणादायी आणि माणुसकीचा संदेश देणारा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत जवळपास १२० कैदी बांधवांना राखी बांधून बंधुभाव, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रेमाची आणि माणुसकीची भावना पोहोचावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये कैदी बांधवांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राखीच्या पवित्र धाग्याने जुळलेले हे भावनिक नाते उपस्थित सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरले.या प्रसंगी आधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह श्री. विशाल बांदल साहेब , तसेच उपस्थित मान्यवर व कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही राखी बांधून रक्षाबंधनाचा सण आगळ्यावेगळ्या आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कैदी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कार्यक्रमातील भावनिक वातावरणाने उपस्थितांची मने जिंकली.
या उपक्रमासाठी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. उज्ज्वला चंदनशिव/चव्हाण यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे आणि सामाजिक कार्याच्या सातत्यपूर्ण प्रेरणेमुळे हा कार्यक्रम अत्यंत सुंदर, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. त्यांच्या मार्गदर्शनातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत माणुसकीचा संदेश पोहोचविण्याचा संस्थेचा संकल्प या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेची टीम सक्रियपणे सहभागी झाली होती.
यामध्ये समन्वयक ममता म्हात्रे, उत्कर्षा गुरव, अफसाना शहा, नेहा गायकवाड, सुरेंद्र घरत, ब्लॉसम पार्लर मालक सपना खाडे, माधुरी माने, श्रद्धा देवकर, श्रुतिका कदम आणि प्रिया मयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.“राखीचा एक छोटासा धागा मनामनांतील अंतर मिटवून प्रेम, विश्वास आणि माणुसकीची नाती अधिक घट्ट करतो,” असा सुंदर संदेश या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधन उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला असून, हा दिवस उपस्थित सर्वांच्या कायम स्मरणात राहील असा ठरला.



