‘पहिला अध्याय आयुष्याचा, स्वच्छंदी शैशवाचा’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू काव्य' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘पहिला अध्याय आयुष्याचा, स्वच्छंदी शैशवाचा’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी एका अभंगात म्हंटले आहे की, “लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा..!” लहानपणाचा मोह होत नाही असा जगात एकही व्यक्ती नसेल. हातातून वाळूचे कण निसटून जावेत तसा हा शैशवाचा विलक्षण निखळ आनंदाचा काळ हातून कधी निसटून जातो कळतच नाही. आणि मग पुढे येणाऱ्या मोठेपणा बद्दल महाराज लिहितात की.. “ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार”. तर हे शैशव म्हणजे मानवी आयुष्याची पहिलीच ओवीमाळ..निर्मळ, निरागस आनंद घेणारा आणि इतरांनाही देणारा काळ. श्रीमंती आणि भौतिक संसाधने उपलब्ध असो की नसो जे असेल त्यातला आनंद लुटायचा काळ.
आगपेटीच्या रिकाम्या डब्यांची रेल्वेगाडी..ज्वारीच्या ताटाच्या आतील पांढऱ्या भागाची बैलगाडी, याच ताटाचा समोरचा भाग दुमडून त्याची मोटरगाडी , दोन पायात घेऊन त्यावर मागे बसलेले सवंगडी ..तोंडाचाच पोंगा..आणि मनमर्जीतील निखळ दंगा.. टाकावू टायर आणि एखाद्या काठीचा दांडू करून दिवसभर हुंदडणे, लोखंडी गोल रिंगचा (घुनपट) फिरवणे, फाटक्या तुटक्या चिंध्यांचा चेंडू करून खेळणे, तुटक्या बांगड्यांच्या काचांचा कल्पकतेने वापर करणे, नद्या नाल्यातील गुळगुळीत खडे गोळा करून खेळणे.. आंब्याच्या कोया, काजूच्या बिया, चिंचोके यांचा बिनबोभाट डाव मांडणे, पावसाळ्यात नारळाच्या कवटीच्या (बेलटे) खडावा करणे, भातुकलीच्या खेळात तर खापरांची भांडी कुंडी, चिंध्यांची बाहुला बाहुली, दगडाच्या चूलीवर हवा तो सैपाक. पदार्थांची नावे तोंडाने उच्चारणे आणि आंबट, गोड, तिखट, चवीचे हावभाव चेहर्यावर मिरवणे, कोणत्याही टाकावू वस्तूंचा खेळणी म्हणून असा काही वापर व्हायचा की, महागड्या प्लास्टिक अथवा स्टीलच्या खेळण्यांची कधीच उणीव भासत नव्हती.
शौक तर जगावेगळे, खेळ तर आगळेवेगळे, लपाछपी विटीदांडू, ओणवे वाकून त्याच्यावरून उड्या मारू, पडणे झडणे, गुडघे फुटणे, मातीचाच मलम लावणे, रद्दीच्या पेपरचा पतंग उडवणे, उनाडक्या अल्लड अवखळ, नद्यासारखे वाहणे खळखळ, वार्यासारखे फिरणे झरझर, झाडाझुडपावर चढणे सरसर, तोडणे मोडणे लाख खटपट, हुल्लडबाजी बापरे बाप, सार्या गल्लीच्या डोक्याला ताप,
खोड्या कुरघोड्या किती अमाप, रूसणे फुगणे वारेमाप, चिडणे रडणे अतोनात, मन मात्र निर्मळ साफ, सारे गुन्हे व्हायचे माफ..!! असे हे रम्य बालपण.
आज शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकरीता आ. राहुल दादांनी असेच चित्र देऊन सर्वांना बालपणात डोकावण्याची संधी दिली. शाळेला जाता जाताही मुलामुलींच्या घोळक्याला सुचलेली अफलातून कल्पना किती रम्य आहे याचेच दर्शन होते. नारळाच्या वाळलेल्या फांदीची किती सुंदर गाडी झाली! त्यावर एकजण आरामात बसला आहे. तर दुसऱ्या एका फांदीला वाॅटर बॅग, टिफीन लटकावून दोघांनी तीची मालवाहू गाडी बनवली.. चित्र खूपच बोलके. बाललीला डोळ्यासमोर उभे करणारे.. शिवाय त्यातूनच बालबुद्धीच्या युक्तीची झलक दर्शवणारे, सृजनाचे दर्शन घडवणारे, कल्पक बुद्धीचातुर्याचा नमुना पेश करणारे… कदाचित यातच दडलेले असतात भावी शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, अभियंते, अभिनेते, डाॅक्टर्स,शिक्षक आणि खूप कांही.
हायकू लेखनासाठी तुलनेत सोपा विषय. तरीही कल्पकता दिसणे अपेक्षित होते. ज्यात लपलेला अद्भूत क्षण की जो भविष्यवेधी झलक असेल. चित्र कोणतेही असो सूक्ष्म निरीक्षणातूनच उच्च दर्जाचे हायकू साकारले जातात. भरीची एकाक्षरे शक्यतो टाळणे आणि कलात्मकता साधण्याचा प्रयत्न करणे. सर्व हायकूकारांना मनापासून शुभेच्छा.. तसेच समूहाचे नियम सूचना काटेकोरपणे पाळले जावे हीच विनंती वजा सूचना.
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/ कवी/ लेखक
©सहप्रशासक परिक्षक मराठीचे शिलेदार समूह



