संवादशून्यातील हरवलेला ‘शून्य’ शोधू या ना..!!; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण

संवादशून्यातील हरवरेला ‘शून्य’ शोधू या ना..!!; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
प्रिय बंधूराया, ‘अरे आयुष्याच्या उत्तरार्धात पोहचले मी, गेल्यावर्षी तुझे भाऊजीही सोडून गेलेत मला’. तसं तर माझा मुलगा खूप चांगला आहे. तो आणि सूनबाई दोघेही त्यांची कर्तव्य निभावतात, मन जपतात माझे. सुखी आहे मी माझ्या घरी, तरीही आजचा हा पत्रप्रपंच……! काय रे? किती वर्षे झालेत आईला जाऊन? आठवते का तुला? मला आठवतं…तब्बल ३६ वर्षे झालीत. आईच्या दशक्रियाविधी पासून आजवर आपण दोघांनी एकमेकांचं तोंडही पाहिले नाही. तसं तर लहानपणापासून बिनबापाची लेकरं होतो आपण. गरज होती एकमेकांची पण एक छोट्याशा गैरसमजामुळे संवादशून्य झालोत.
कारण तरी काय होतं तर.. आईची पाच तोळ्याची सोन्याची माळ… मी कुठे म्हटलं, की मी चुकली नसेल? असेलही माझी चूक.. पण कधी प्रयत्न केला का आपण नातं सांधण्याचा? किती सुखदुःखाचे प्रसंग आलेत या कालावधीत पण आपल्यातला संवादपूल का बरं नाही जोडला गेला? मला वाटत होतं सारं काही विसरून तू तुझ्या भाऊजींच्या अंत्यविधीला तरी येशील..! जाऊ दे….मी नाही जात भूतकाळात, त्यांनीच तुला घडवलं हे सत्यही मी नाही पुन्हा उगाळत बसत.
खरंतर आज माझ्या पत्रप्रपंचाचे कारण आहे…माझी शेवटची “माहेरची साडी.” एक विनंती तुला आपल्यातल्या संवाद शून्यातला शून्य किमान त्या वेळीतरी दूर कर आणि माझी शेवटची बोळवण तूच कर…तरच माझ्या मृत आत्म्यास शांती लाभेल. बस एवढेच…. तुझी बहीण
मराठी सारस्वत दादा ताई…. पटतंय ना…किती हो आपण संवादशून्य झालोय..अबोला,राग, तिरस्कार, गर्व, मीपणा, उद्दामपणा…माणसाच्या नसानसात एवढा भिनलाय की तो भौतिक सुख म्हणजेच सारं काही हेच समजायला लागला. पूर्वी अंतसमयी खांदा हवा म्हणून किमान चार लोकांसोबत तरी संवादसेतू जपणारे लोक शववाहिनी आल्यापासून अजून घमंडी झालेत आणि सोबत कमालीचे संवादशून्य. एकदम लहानशी गोष्ट असते, पण आपल्यातला इगो कधीच आपल्याला नम्र होऊ देत नाही.. मग ताणतात दोघे इतकं की अगदी तुटेपर्यंत.
एखादी गोष्ट मनात ठेवून वादविवाद करत बसण्यापेक्षा, तुमच्या मनाची फिर्याद संवांदातून मांडू शकता ना? आपल्या शास्रांमध्ये देखील ऋषीमुनींनी, साधुसंतांनी संवादच साधलेला आढळतो.मीच महान हा अहं बाजूला ठेवून संवाद साधून आपण कोणाचेतरी आदर्श बनू शकतो ना?गर्वाने,अहंकाराने ताठरलेल्या व्यक्ती कधीच पुढे जात नाहीत,विनम्रता दाखवून पुढे चालत राहावे. पद, प्रतिष्ठा मिळूनही नम्र राहणाऱ्यांना आणखीनच मिळत राहते.तेव्हा संवादशून्य राहून गैरसमज करू नका,एखाद्या व्यक्तीला चुकीचे किंवा वाईट समजण्याआधी थोडे थांबून त्या व्यक्तीला सर्व अँगलने पहा..’अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ तेव्हा दृष्टी बदला.
‘संवादशून्य’ या आगळ्यावेगळ्या विषयाला आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी न्याय दिला आणि अनेक कवी कवयित्रींनी आपापल्या पद्धतीने संवादशून्य हा विषय खूप छान पद्धतीने रंगवला..मोबाईलमुळे..सोशल मिडीयामुळे होणारा संवादशून्य..सा-या वास्तवदर्शी रचना खूपच सुंदर..तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन व पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, कवयित्री
लेखिका, कार्यकारी संपादक
©मराठीचे शिलेदार समूह





