“भावनाशून्य मनाची आंदोलने….कधी हळवी कधी कठोर”; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

“भावनाशून्य मनाची आंदोलने….कधी हळवी कधी कठोर”; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
गुलाब : ( स्वगत ) होय, मी फुलांचा राजा. सगळेच माझं कौतुक करतात. रूप, गंधाने मोहून जातात. पण टचकन काटा रुतला की, हिरमुसले होऊन बोलतात, ‘या गुलाबाला नं काटेच खूप असतात.’ फार दुःखी होतो मी त्या क्षणी. माझे मलाच वाटते, किती भावनाशून्य मी ? जवळ आलेल्यांना बोचकारतो. त्यांना टोचून वेदना देतो. कधी कधी रक्त पण वाहवतो. पण खरं सांगू का…मी एवढा भावनाशून्य नव्हतोच कधी. नाजूक कळीपासून डोलणाऱ्या फुलापर्यंत मी अगदी हसतच राहायचो…येणाऱ्या जाणाऱ्यांना कौतुकाने न्याहाळायचो. त्यावेळी काटे पण नव्हते माझ्या अंगाखांद्यावर. मात्र माझ्या रूप, गुण, सौंदर्याला भुलून लोक फायदा घ्यायचे माझा. माझ्या चांगुलपणाला समजायचे कमकुवतपणा. आधी मी हे सर्व बघून दुःखी व्हायचो. आतल्या आत कुढायचो. कुणी कुणी नसायचं सोबतीला मला. मग मी ठरवले आपणही कठोर व्हायचे. जशास तसे वागायचे. मी हळुहळू आतून ताठर होत गेलो. अंगाखांद्यावर काटे मिरवू लागलो. तुमचं पण असंच असतं का अंतर्बाह्य बदलणं… भावनाशून्य होणं…?( काल्पनिक )
काय शिलेदार भावा-बहिणींनो कशी काय वाटली आमची स्टोरी…? ???? खरं सांगू का माणूस कधीच भावनाशून्य नसतो. दया, प्रेम, करुणा या आनंदमयी भावनांसोबतच कधी परिस्थितीनुरूप राग, द्वेष, मत्सर या भावनांचाही मानवी मनात उद्रेक होतो. जो माणसा-माणसांतील दुरावा वाढवतो आणि आपण म्हणतो, तो भावनाशून्य झाला. का बरे ओढवली ही परिस्थिती ? जग किती सुंदर ना…! भगवान महावीर यांनी दिलेल्या ‘जगा आणि जगू द्या’ या सिद्धांताप्रमाणे प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा इथे अधिकार आहे. आपल्या भारतीय संविधानातून तर तो आणखीनच अधोरेखित झाला आहे.
पण मानवी हव्यास आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा जीवनाच्या प्रत्येक अंगात झालेला अवाजवी शिरकाव माणसातील मन सुद्धा यंत्रवत करत आहे. म्हणूनच कदाचित दुर्दैवी घटना घडताना मदतीचा हात पुढे येण्याऐवजी चित्रीकरण ( Reel ) करुन समाज माध्यमावर टाकण्यात धन्यता वाटत आहे. एका Like च्या अंगठ्यासाठी तरुण-तरुणी जीव धोक्यात टाकत आहेत. नवश्रीमंती मिरविताना बेदरकारपणे गाड्या-मोटारी चालवून निष्पाप जीवांचे बळी जात आहेत. कोवळ्या कळ्या उमलण्या आधीच कुस्करल्या जात आहेत आणि आम्ही समाज म्हणून उघड्या डोळ्यांनी भावनाशून्य होऊन बघत आहोत.
कधी थांबणार हे सर्व ? कोणाची जबाबदारी ही ? फक्त शासनाची की पालक म्हणून समाज म्हणून आपलीही ? बघा करू या जरा उत्तर शोधण्याचा प्रयत्न…आज शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहात मुख्य प्रशासक माननीय राहुल दादा पाटील यांनी ‘भावनाशून्य’, हा विषय देऊन कवींच्या लेखनीला मनाची आंदोलने शब्दबद्ध करण्याची संधी दिली. सर्वांनी छानच लिहिलेले…. अभिनंदन….!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह