साधू वासवानी शाळेस बुद्धिबळ सुवर्ण पुरस्कार
जागतिक बुद्धिबळ संघटनेचा शतकपूर्ती सोहळा
साधू वासवानी शाळेस बुद्धिबळ सुवर्ण पुरस्कार
जागतिक बुद्धिबळ संघटनेचा शतकपूर्ती सोहळा
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे दि. 27(प्रतिनिधी) मोशी येथील साधू वासवानी इंटरनॅशनल शाळेस जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या एज्युकेशन कमिशन कडून (फिडे) शालेय बुद्धिबळ क्रीडा सुवर्ण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण जगभरातून २२ शाळांनी ह्या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवले होते. त्यातून साधू वासवानी शाळेची निवड गौरवास्पद ठरली. महाराष्ट्रात हा पुरस्कार सर्वप्रथम मिळवण्याचा मान साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल, मोशी यांनी मिळवला आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिन या निमित्ताने साधू वासवानी शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमात निमंत्रित बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी यांनी पुरस्काराची घोषणा करून पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान केले. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या एज्युकेशन कमिशनचे जर्मनीतले सदस्य बोरीस ब्र्हुन,भारताचे ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे, फिडेच्या सोशल कमिशनचे अध्यक्ष स्वित्झर्लंडचे श्री आंद्रे व्हॉग्टलीन, संघटनेचे सचिव लॅटव्हियाचे लासमा कोकोरेव्हिका आणि जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या भारतीय मिडीया प्रतिनिधी नंदिनी सारीपल्ली हे मान्यवर जागतिक पातळीवरील प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधी मंडळाच्या हस्ते मुख्याध्यापिका आरती पाटील, शाळेचे बुद्धिबळ प्रशिक्षक केशव अरगडे आणि बुध्दीबळपटू विद्यार्थी यांना पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
जर्मन भाषिक संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत विद्यार्थ्यांनी खास जर्मन भाषेतील स्वागत गीत गाऊन केले. शाळेच्या संगीत शिक्षकांनी सादर केलेले भारतीय शास्त्रीय संगीत ऐकून विदेशी मान्यवर अतिथी मंत्रमुग्ध झाले. योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.
शाळेच्या समन्वयक रोशन जॉर्ज यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुख्याध्यापिका पाटील यांनी जागतिक बुद्धीबळ संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले. कमिशनचे अध्यक्ष आंद्रे व्हॉग्टलीन यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेने बुद्धिबळासाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा आणि राबविण्यात येत असलेल्या क्रीडा उपक्रमाचे कौतुक केले. ग्रॅंड मास्टर अभिजित कुंटेसह इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून बुध्दीबळ सुवर्ण पुरस्काराबद्दल शाळेचे अभिनंदन केले.
जागतिक बुध्दीबळ संघटनेच्या वतीने जगातील विविध शाळांना आजपर्यंत १३ सुवर्ण, ६ रजत आणि ३ कांस्य पुरस्कार प्रदान केले असून चैन्नई येथील ‘वेल्लमल स्कूल’ या शाळेला मिळालेल्या पुरस्कारानंतर भारताचे नऊ निष्णात ग्रॅंडमास्टर्स तयार झाले आहेत,अशी माहिती यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आली. या जागतिक संघटनेस यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त स्वित्झर्लंड येथे नुकतेच प्रकाशित झालेले पोस्ट टिकिट, पाकिट आणि भेटकार्ड साधु वासवानी शाळेला भेट देण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे सर्व क्रीडा शिक्षक, विषय व वर्ग शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
–