राजकारण नासवणा-या ‘झाकणझुल्यांचा’ अस्त होणे गरजेचे: प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
राजकारण नासवणा-या ‘झाकणझुल्यांचा’ अस्त होणे गरजेचे: प्रशांत ठाकरे
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
राजकारणावरचे लेख वाचणे हा माझा आवडता छंद,असाच एक लेख मी वाचत होतो. त्यात स्वर्गीय अटलजी म्हणत होते, मी किडनीच्या आजाराने त्रस्त होतो, त्याकाळी भारतात त्यावर उपचार अशक्य होते व अमेरिकेत जाऊन उपचार घेणे इतपत माझी आर्थिक परिस्थिती नव्हती. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली भारताचे प्रतिनिधी मंडळ संयुक्तराष्ट्र संघात पाठवलं. त्यांचा दुहेरी हेतू होता… त्यानिमित्ताने तिथे माझ्यावर उपचारही झाले, मला पुनर्जन्म मिळाला, या प्रसंगाला मी राजकीय परिपक्वतेचे उदाहरण समजतो.
आज हे मी येथे यासाठी नमूद केलं की, सध्या भारताचं, पर्यायाने महाराष्ट्राचे राजकारण एवढं असंस्कृत झालेलं आहे की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना सुद्धा आपली लाज वाटत असेल. “गेल्या पाच वर्षात हे राजकारण नासवणाऱ्या अनेक झाकणझुल्यांचा राजकीय पटलावर उदय झाला आणि राजकारणातले बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलेलं समाजकारण कालबाह्य झाले”. स्वार्थाने पछाडलेल्या झाकणझुल्यांचा काही नेम नाही. ते सकाळी एका पार्टीचा नाश्ता करतात, दुपारी दुसऱ्याकडे जेवण, संध्याकाळी तिसऱ्याचा झेंडा मिरवतात, तर रात्री चौथ्याकडून दारू पितात. यांना निष्ठा काय समजणार ?? होय झाकणझुलेच आहेत हे… !!
‘झाकणझुल्या’ हा शब्द तसा मराठीच्या प्रांतात नवीन. कारण मराठी जिवंत भाषा आहे. प्रवाही आहे तेव्हा कालानुरूप ती विकसित होत आहे, तिच्या विकासाच्या प्रक्रियेत अशा काही नवीन शब्दांना स्थान मिळतंय. अर्थात झाकणझुल्या या शब्दाचा अर्थ आहे खोटे लपवणारा, थापा मारणारा, गोंधळ करणारा, आत्मप्रशंसक… या शब्दाला ग्रामीण बोलीचा साज आहे, एवढं मात्र निश्चित. याचा वापर मुख्यत्वे राजकीय पटलावर केला जातो. तो कधी चिमटा काढण्यासाठी, तर कधी दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी, कधी एखाद्याची जागा दाखवण्यासाठी तर कधी राजकीय बदला घेण्यासाठी. अशा बिनबुडाच्या अनेक झाकणझुल्यांना स्वतः राजकीय पटलावर खूप मोठे समजण्याची सवय असते, परंतु त्यांचे मोठेपण म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा असतो हे समजणे इतपत जनता निश्चितच खुळी नाही.
असो….आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी हा एक नवा शब्द, अर्थात नव आव्हान ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी सर्वांपुढे ठेवले. मी ज्ञात आहे…. प्रारंभी कित्येकांचा या शब्दामुळे थोडा गोंधळही झाला. परंतु आव्हानांना सामोरे जाणं ही खरी शिलेदारी शिकवण आहे. तेव्हा बहुतांशी कवी कवयित्रीनी थोडा अभ्यास करून या विषयाला पूर्णतः न्याय देण्याचा प्रयत्न केला अन् अनेक झाकणझुल्यांचा आपल्या कवितांमधून ‘पर्दाफाश’ केला. तेव्हा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आदरणीय राहुल सरांनी मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप आभार,धन्यवाद.
श्री.प्रशांत ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/ सहप्रशासक
©मराठीचे शिलेदार समूह



