
नागपूर-विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
२९ जुलै रोजी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा व कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर
आवश्यक ती खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे सर्व तालुका दंडाधिकाऱ्यांना आदेश
नागपूर, (दि. २८ जुलै): विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. उद्या दि. २९ जुलै रोजी भारतीय हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा व कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटीचे आदेश निर्गमित केले आहेत. नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
*विदर्भासाठी इशारा*
दिनांक ३० जुलै रोजी नागपूरला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून प्रशासनाने गावपातळीवर खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या २४ तासांत विदर्भात सर्वाधिक १३९ मिमी पावसाची नोंद भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे झाली. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे १०३.४ मिमी पाऊस झाला. या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.
हवामान विभागानुसार २९ जुलै रोजी नागपूर, भंडारा, वर्धा, या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर यवतमाळसह अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ३० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यास रेड अलर्ट असून भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. ३१ जुलै रोजी अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
*नागरिकांसाठी सूचना*
मेघगर्जना सुरू असताना उघड्यावर न थांबणे, झाडाखाली आश्रय न घेणे, नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहणे तसेच वीज पडण्याच्या शक्यतेमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



