“पंढरीची वारी” मराठी मनाची यथार्थ ओळख..!!
पांडुरंग मुंजाळ वसमत जि.हिंगोली

“पंढरीची वारी” मराठी मनाची यथार्थ ओळख..!!
संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज अशी थोर संताची भूमी म्हणून आपल्या महाराष्ट्राला ओळखले जाते. ‘पंढरीची वारी’ ही एक नुसती वारी नसून हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. विटेवरचा सावळा विठूराया हे आपलं आराध्य दैवत आहे. त्या संदर्भात पंढरीच्या वारी बदलची भाव-भावना संतांनी आपल्या अभंगातून प्रगट केली आहे. वारीला नुसते जावेसे वाटणे म्हणजे हेच कार्य खऱ्या अर्थाने मराठी मनाचे ऐश्वर्य आहे. महाराष्ट्राचे भावनिक पारमार्थिक भक्तिमय थोरवी आहे, मराठी मनाची श्रीमंती आहे .
आषाढी कार्तिकीचा सोहळा ।
चला जाऊ पाहू डोळा ।।
मानवी जीवनाचा विचार केला तर मानवी जीवन हे एका वर्तुळात बंदिस्त आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा सुखाच्या मागे सातत्याने धावत असतो, त्याचे कारण केवळ परमसुख असे आहे आणि ते मिळवण्यासाठी म्हणजेच मानवी देहाला दुःखाच्या निवृत्तीसाठी सातत्याने धडपड ही करावीच लागते. पण प्रत्येक मानवी देहाला हे सुख प्राप्त होते असे नाही, कारण मानवी जीवनातील खरे सुख, खरा आनंद, चैतन्य, उत्साह हा त्याग आणि समर्पण या भावनेतूनच प्राप्त होत असतो. आणि या परमसुखाचा आनंद घ्यायचा असेल, तर जीवनात येवून एकदा का होईना पंढरपूर वारीचा अनुभव घ्यायला हवा. तो आनंद, ते चैतन्य, ती अफलातून भक्ती, ते सुख केवळ आणि केवळ वारीतूनच प्राप्त होते असे संत नामदेव महाराज आपल्या अभंगातून सांगतात.
सुखालागीं जरी करिसी तळमळ ।
तरी तूं पंढरीसी जाय एकवेळ ।।
तेथें अवघाची सुखरूप होसी।
जन्मोजन्मीचें श्रम विसरसी ।।
संत नामदेव महाराज आपल्या अभंगातून सर्व जीवात्म्याला, वारकऱ्यांना संबोधित करतात की, आपण सुखाच्या मागे धावण्यासाठी, आपल्या संसारासाठी तू जेवढी तळमळ करतोस, केवढी धडपड करतो आहे; पण तुझ्या हातामध्ये कधी सुख आले आहे का ? पण आपल्या हातात कधी सुख सामावलेले नाही त्यासाठी एकदा तू पंढरपूरला त्या वारीमध्ये जा, म्हणजे तुला पुन्हा आयुष्यात सुख शोधण्याची गरज भासणार नाही. ‘तू तनाने व मनाने एवढा सुखरूप होशील, एवढा चैतन्यमय होशील, एवढा आनंदमय होशील तुझ्या जन्मोजन्मीचे सर्व श्रम विसरून जाशील आणि तुझ्या हातामध्ये सुख आणि केवळ सुख आबादीत राहील याचा महिमा केवळ पंढरपूर वारीला गेल्यावरच तुझ्या लक्षात येईल’, असे प्रतिपादन संत नामदेव महाराज आपल्या अभंगात साजीवांशी करतात. पण आपण संसारात फार गुरफटून गेलो आहोत, म्हणून आपल्याला विसर पडला आहे.
मानवी देह हा फार पवित्र देह आहे, पण याचा विसर प्रत्येक मानवी जीवाला पडला आहे. साक्षात पांडुरंग माझ्यात वास करतो आहे. तरी सुद्धा मला कळत नाही. मानव जातीची ही लाजिरवाणी गोष्ट आहे म्हणून पुढे नामदेव महाराज असे सांगतात की,
आषाढी कार्तिकी विसरू नका मज ।
सांगतसें गुज पांडुरंग ।।
पतितपावन मी तो आहे खरा।
तुमचेनि बरा दिसतसें ।।
आषाढी असो, कार्तिकी असो त्या पंढरपूरच्या काळ्या विठूरायाला कधी विसरू नका असे चक्क पांडुरंग सांगतो आहे. मज सातत्याने विटेवरचा विठ्ठल गुच करतो आहे. मला वारंवार बोलतो आहे मी खऱ्या अर्थाने पतित पावन जरी असलो, पण तुमच्याशिवाय मी कसा बरा दिसेल म्हणून संत एकनाथ महाराजांना प्रत्यक्ष पांडुरंग बोलतो आहे की, ‘मला न विसरता तुम्ही तुमचे काम करत राहा’, मी नक्की तुमचा भाग्योदय केल्याशिवाय राहणार नाही. पण, त्यासाठी शुद्ध अंत:करणारने पांडुरंगाचे एकरूप होणे, त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन होणे मग तुम्ही किती वाईट असाल त्याचा मी स्वीकार करेल. वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. आपण तर प्रत्यक्ष पांडुरंगाला भेटण्यासाठी वारीमध्ये आहोत ही भावना वारीचा अमृत अनुभव देते.
तुम्ही जातां गांवा हुरहुर माझे जीवा।
भेटेल केधवां मजलागीं ।।
धांवोनियां देव गळां घाली मिठी।
स्फुंदस्फुंदून गोष्टी बोलतसे ।।
तिहीं त्रिभुवनीं मज नाहीं कोणी।
म्हणे चक्रपाणी नामयासी।।
वारीमध्ये चालणारा वारकरी, दिंडीमध्ये नाचणारा टाळकरी, पंढरपूर मध्ये दाखल झालेले माळकरी, भक्तीमध्ये ओतप्रोत झालेला विणेकरी, अभंगाच्या प्रत्येक ठोक्याला थाप देणारा मृदंगधारी, पेरणी करून शेतीच्या कामाची नियोजन करून वारीमध्ये सुद्धा आभाळाकडे पाहणारा शेतकरी या सर्वांच्या मनाची भक्ती पाहता विठ्ठला आता तुझा विरह सहन होत नाही. सारखा माझ्या मनाला तुला भेटण्याची हुरहूर लागली आहे. तुला भेटण्याची आस लागली आहे, म्हणून माझ्या मनामध्ये सातत्याने एकच प्रश्न रेंगाळतो आहे. ‘केशवा कधी भेटशील मला’? या आर्त भावनेतून साक्षात विठ्ठल, विटेवरचा पांडुरंग धावत येऊन मला मिठी मारतो आहे आणि माझ्या कानामध्ये सांगतो आहे. “हे…. हे वारकऱ्यांनो या त्रिभुनामध्ये या चराचरामध्ये या जगामध्ये तुमच्याशिवाय मला कोणीच नाही, मी तुमच्यातलाच अंश झालो आहे ही भावना वारीमध्येच विकसित होते”. संत नामदेव महाराजांना जसा विठ्ठल प्रत्यक्ष बोलतो आहे अगदी प्रत्यक्ष रुपाने, अगदी मित्रांसारखा अगदी सखा त्याचप्रमाणे वारीमधल्या प्रत्येक वारकऱ्याला आठरा पगड जातीच्या समाजाला माझा विठ्ठल गुज करतो आहे. हा वारीतला अनुभव परमेश्वर भेटीची ओढ पांडुरंगा प्रती असलेलं, प्रेम विठ्ठला प्रती निर्माण झालेली भक्ती संसार तापातून मुक्त होऊन परमार्थिक पाऊल वाटेवरचा अनुभव प्रत्यक्ष पांडुरंगाला भेटण्यासाठी मनाची झालेली घालमेल वारीमध्ये अनुभवास येते
जाईन गे माय । तया पंढरपुरा ।
भेटेल माहेरा । आपुलिया ।।
“चोखा डोंगा परी, भाव नोहे डोंगा..”. पंढरीच्या वारीची ही उद्दात भावना सांगत असतांना, ‘संत चोखामेळा’ आपल्या अभंगात सांगतात की, हा चोखा दिसायला जरी डोंगा असला, दिसायला जरी वाकडा असला तरी त्याच्या अंतःकरणातील शुद्धता, पवित्रता, चेहऱ्यावरील तेज, चैतन्य, उत्साह हा आतून सुंदर रूपाने साकार झाला आहे. तुम्हा आम्हाला या भक्तीची ओढ लागावी आणि पांडुरंगा प्रती पंढरपुराप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा हा उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हाव हा या पंढरपूरच्या वारीचा महिमा अनुभवास मिळतो आहे. आणि परमेश्वरा प्रती भगवंता प्रती असलेला भक्तीचा भाव विकसित व्हावा हाच या मागचा एकमेव उद्देश आहे. थोडक्यात काय तर, एखाद्या सासरवासीन मुलीला लागलेली माहेरची ओढ, आपल्या माहेराप्रती असलेला जिव्हाळा, अगदी तोच प्रेमभाव आम्हा सर्वांसाठी माहेररूपी असलेलं पंढरपूर कायम स्मरणात राहण्यासाठी व त्या सावळ्या विठ्ठलाला भेटण्यासाठीचा प्रवास हा वारीमध्ये होतो हे मात्र निश्चित…!!
“आज म्या देखिली पंढरी, नाचताती वारकरी..”
पांडुरंग मुंजाळ
वसमत जि.हिंगोली
=========



