Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसाहित्यगंध

“अरेच्चा.. मी शिक्षक आहे की डाटा ऑपरेटर”; स्वाती मराडे

शिक्षकांची आर्त हाक 'फक्त शिकवू द्या हो'

0 4 8 2 9 3

“अरेच्चा.. मी शिक्षक आहे की डाटा ऑपरेटर”; स्वाती मराडे

शिक्षकांची आर्त हाक ‘फक्त शिकवू द्या हो’

किती छान स्वप्न होतं माझं ‘शिक्षक’ होण्याचं. ते स्वप्न सत्यातही उतरले अन् २००० साली शिक्षक म्हणून शाळेत रूजूही झाले. त्या शालेय वर्षात विद्यार्थी आणि मी आमची चांगलीच गट्टी जमली. त्यावेळी शाळेला मुख्याध्यापक होते. ते शाळेचा कार्यालयीन भार सांभाळत होते. अभ्यासक्रम ट्रेनिंग झाले ते उन्हाळा सुट्टीत. त्यानंतर वर्षभरात केवळ एकच शिक्षक मिटींग करावी लागली. त्यामुळे शिकवण्यात कधी कुठला व्यत्यय आलाच नाही. त्यानंतर ‘सर्व शिक्षण मोहिम अभियान’ सुरू झाले नि विविध प्रशिक्षणांचा माराच सुरू झाला. उन्हाळा सुट्टीत तर प्रशिक्षण होतेच, पण दर महिन्याला कोणते ना कोणते प्रशिक्षण. यात शाळेतील निम्मे शिक्षक प्रशिक्षणाला व निम्मेच शाळेत. जास्तीचे विद्यार्थी म्हटलं की केवळ सांभाळणं आलं नि शिकवणं हळूहळू दूर जाऊ लागलं. त्याचवेळी सर्व शिक्षण मोहिम अंतर्गत अनेक द्विशिक्षकी शाळा सुरू झाल्या. शिपाई ते हेडमास्तर असा कामाचा बोजा सांभाळत दोन वर्गांचं शिकवणं गुरूजींच्या माथ्यावर आलं. इथंही गुरूजी रेकाॅर्डमध्ये गुंतत गेला.

त्यावेळी आमच्या शाळेत येणारे एक साहेब वार्षिक तपासणीसाठी आले की म्हणायचे ‘एक ते छप्पन रजिस्टर काढा.’ मनातल्या मनात मी मात्र ‘एके छप्पन’ असं म्हणायचे (आणि ताणा आता बंदूक काही चुकले असेलतर..) सर्व शिक्षा अभियान अंतर्गत येत असलेलं अनुदान त्यासाठीचे आठ दहा रजिस्टरमधील रेकाॅर्ड म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी रूपयाचा मसाला’ अशीच गत. विविध समित्या व त्यांच्या मिटींग, त्यांची अभिलेखे.. गुरूजींची मूळ हेतूपासून दर जाण्याची.. मोबाईल युग येण्याआधीची ही केवळ सुरूवात होती.

मोबाईल युग आल्यानंतर वेगळीच तऱ्हा सुरू झाली. बऱ्याच मिटींग, प्रशिक्षणं ऑनलाईन झाली. त्यासाठी विविध लिंक आल्या. नवनवीन पोर्टल सुरू झाली. प्रत्येक पोर्टलवर माहिती भरणं खरंतर खूप जिकीरीचे काम झाले. खेड्यापाड्यात नेटवर्क न मिळणे, वेबसाईट लोडवर असणे आणि सगळं काही नवीनच असल्याने काही चुकणार तर नाही ना याची धास्ती.. यामुळे शिकवावे कधी आणि ऑनलाईन काम करावे कधी? या कात्रीत शिक्षक सापडला.

माहिती पोर्टलवर भरायची असली तरी त्याआधी ती माहिती रजिस्टर स्वरूपात करावी लागतेच आहे. या सर्व कामातही शिक्षक सरावला. पण वरचेवर कामाचा ताण वाढतच आहे. आता दिवसागणिक विविध उपक्रम येत आहेत ते राबवायचे त्यांचे फोटो काढायचे, त्यांची ठराविक साईजमध्ये पीडीएफ करायची व पुन्हा पोर्टलवर अपलोड करायची.. काढा फोटो, करा अपलोड व मिळवा सर्टिफिकेट.. फोटो.. फोटो.. फोटो.. शिक्षक जणू इव्हेंट मॅनेजरच झाला आहे. पोर्टल व लिंक कमी होत्या की काय म्हणून नवनवीन शैक्षणिक ॲपची भर पडतेच आहे. कधी कधी वाटतं.. अरेच्चा मी शिक्षक आहे की डाटा ऑपरेटर.. सगळाच भडिमार. कधीतरी आतला शिक्षक खूप वैतागतो. ही कामे नकोत म्हणून मोर्चा काढतो नि आर्त विनवणी करतो.. मला फक्त शिकवू द्या हो…!

पण ही आर्त सादही क्षीण झालीय. ऐकून घेणारंच कुणी नसेल तर सांगायचं तरी कुणाला. मनातल्या मनात त्याचा मूक आक्रोश चालू आहे.. हल्ली तर कामाचा डोंगर संपविण्यासाठी आटापिटा करून आजचे काम आजच संपवू व उद्याचा दिवस केवळ अध्यापनासाठी वापरू असे नित्य तो ठरवतो आहे. पण त्याआधीच नवीन काम येऊन पडलेले असतेच असते. म्हणजे कालचे काम कालच केले तरी अध्यापनास वेळ काढायला जीव मेटाकुटीला येतोय. तो स्वतःलाच विचारतो आहे. मी शिक्षकच आहे ना? मग खरंच तू शिकवत आहेस का? मुलांना शिकण्याच्या संधी निर्माण करत आहेस ना? उत्तर आठवून पुन्हा पुन्हा त्याला सांगावंसं वाटतंय मला फक्त शिकवू द्या.. !

शालेय कामांच्या यादीसोबत असणारी अशैक्षणिक कामे वेगळीच. जी अनेकवेळा शिक्षकांवर लादली जातात. नाईलाजाने ती केली जातात. पण मग शिकणं, शिकवणं यासाठी वेळ आणायचा तरी कुठून? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे मनोमन वाटतं. म्हणूनच तो सांगू पाहतोय.. ‘फक्त शिकवू द्या हो.. ज्ञानाचे मळे पिकवू द्या हो..’ कळेल का कुणाला त्याची ही तळमळ?

स्वाती मराडे आटोळे
इंदापूर, जि.पुणे
मुख्य सहसंपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध’

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे