‘पसायदानाच्या प्रेरणेतून योगदान देता येऊ शकले’; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

‘पसायदानाच्या प्रेरणेतून योगदान देता येऊ शकले’; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
पुणे : 12 जुलै 2025 : ” ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाची प्रेरणा घेतल्यानेच भारतासह 20 देशात स्वखर्चाने निरपेक्ष भावनेने विश्वजोडो अभियान राबवून मानवधर्माचा प्रसार करत जिथे रसिक तिथे एकपात्री सबकुछ मधुसूदन कार्यक्रम करुन अगणितांना निखळ आनंद देता आला. तसेच हा उपक्रम वयाच्या सत्तरीतही अविरतपणे चालू ठेवला आहे.हा ज्ञानेश्वर माऊलींचाच आशीर्वाद आहे ” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,कलावंत आणि साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
वर्ल्ड क्वीन बीज,साहित्य गौरव आणि पलिंगो भाषा संस्थान या संस्थांनी डाॅ.घाणेकर यांच्या ज्योतिष, हौशी पत्रकारीता, संपादन तसेच हस्ताक्षर मनोविश्लेषण या विविध क्षेत्रातील दैदीप्यमान योगदानास 50 वर्ष पूर्ण झाली, यानिमित्त डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ‘पसायदान ‘ पुरस्काराने जाहिररित्या सन्मानित केले ; या प्रसंगी डाॅ.घाणेकर बोलत होते.
सदर पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाईक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नागरिक आघाडी शहराध्यक्ष श्रीनिवास तेलंग, भारतीय विचारधारा संस्थेच्या संस्थापक, अध्यक्ष भारती महाडिक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. निमंत्रक मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी प्रास्ताविक आणि मानपत्र वाचन केले . निमंत्रक कवयित्री ऋचा कर्वे यांनी सूत्रसंचालन केले तर साहित्यिक भावना गुप्ता यांनी आभार मानले. डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी विशेषांक तसेच डाॅ.घाणेकर लिखित दत्तायन,हसायन आणि हास्यचित्रायन या पुस्तकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक- अध्यक्ष प्रिया दामले, वसुधा फौंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष वसुधा नाईक आदि मान्यवर उपस्थित होते. निमंत्रितांच्या काव्यसंमेलनात अजया मुळीक, दीपाराणी गोसावी, मनीषा सराफ, किरण जोशी नंदकिशोर गावडे,बाबा ठाकूर, ॲड.संध्या गोळे, ज्योती सरदेसाई, विजय शेडगे आदि मान्यवरांनी प्रास्ताविक कविता सादर केल्या. भावना गुप्ता यांनी आभार मानले.