अशा या किर्तीवंत मूर्तीसमोर फक्त नतमस्तक व्हावे…!!
सौ.संध्या मनोज पाटील

अशा या किर्तीवंत मूर्तीसमोर फक्त नतमस्तक व्हावे…!!
दिनांक ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगरीत २२ पुस्तकांचे प्रकाशन शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले. माझाही पहिला वहिला काव्यसंग्रह ‘काव्यसाधना’ प्रकाशित झाला. तो क्षण आनंद द्विगुणित करणाराच ठरला. मानपत्र फ्रेम तर अहाहा.. किती सुंदर ..सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, विषेशांक…सर्वच खूप अप्रतिम आणि सुप्रतिम. खरेतर ८ मे रोजी माझे पती मनोज सरांचे ऑडिट येणार होते, त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त टेंशन त्यांनाच आले. हा विषय मी आदरणीय राहुल दादांसोबत व आदरणीय विष्णू दादांसोबत ही बोलले होते. पण गुरुकृपा झाली की ऑडिट पुढच्या तारखेवर गेले आणि त्या सुवर्ण सोहळ्याचा आम्ही व माझ्या बहिणी मनापासून आनंद घेऊ शकलो.
पहिल्या सत्रात आदरणीय राहुल सरांची उपस्थिती नसताना सर्व माननीय शिलेदारांनी आपापल्या पद्धतीने कार्यक्रमाची जबाबदारी घेत रंगत वाढविली होती. आ.पद्माताईचीही भेट झाली ताईंबद्दल तर मी काय बोलावे..जे अनुभवले ते शब्दबद्ध करणे कठीणच..परमेश्वर खूप फुरसतमध्ये घडवितो अशा किर्तीवंत मूर्ती..ज्यांच्या कार्यासमोर आपण फक्त नतमस्तक व्हावे एवढेच आपल्या हाती..! सर्वात जास्त आनंद तर प्रिय सविताताई ,प्रिय स्वातीताई, प्रिय तारकाताई यांना भेटून झाला. परंतु एक खंत मनात की आ.वैशालीताईजी व वृंदाताईसो यांची भेट नाही झाली. आपली अनुपस्थिती खरेच सर्वानाच जाणवली. प्रिय वर्षाताईंना बघून, भेटून त्यांच्या धैर्यालाही फक्त आणि फक्त सलामच .. आ.अनिताताई, सिंधूताई, भावनाताई, शर्मिलाताई, आ.अरविंद दादा, संग्रामदादा, गायकवाड दादा,सर्वांशी बोलणे झाले. सर्वच एकमेकांच्या भेटीला आतुर होते त्यामुळे खेळीमेळीने वावरत होते. त्यात खरी कसोटी आदरणीय विष्णूदादांची, आ.प्रशांतजी सर व सविताताईची…सविता ताईंची तब्बेत खराब होती पण कार्यक्रमाची धुरा सांभाळीत कर्तव्यपूर्तीत स्वतःला झोकून दिले होते.
आ.विष्णू दादांकडे बघूनच माझा श्वास वाढत होता. जिकडे तिकडे व्यवस्था बघणे, नाष्टा करून घ्या, फेटे बांधून घ्या. सर्वांकडेच त्यांचे लक्ष होते शिवाय दादांकडॆच आमच्या सारख्यांची पुस्तके पोहचली होती. त्यांना गिफ्ट पेपर लावून सेट बनवून व इतर सर्व बॉक्स हॉलला घेऊन येणे..किती ही धावपळ.. एक मिनिट उसंत नव्हती..पण थकवा मात्र कुठेही जाणवू दिला नाही..दादासाहेब,आपल्या कार्यास व ऊर्जेस नतमस्तक मी. काव्यवाचनाचा मात्र माझा पहिलाच अनुभव …११ वी नंतर थेट ७ तारखेलाच व्यासपीठावर माईक हाती घेतला….तो ही अनुभव अविस्मरणीयच माझ्यासाठी. त्याचेही श्रेय आ.राहुलदादा व आ.विष्णुदादांनाच जाते. आ.राहुल दादांनी तर छोटी हर्षिताचे उदाहरण दिले की छकुली जर एवढं कडक ‘बिनधास्त’ बोलू शकते. तर तुम्ही ही बोलूच शकणार हवं तर वाचून बोला ..तेव्हा कुठे मी स्पर्धेत सहभागी होण्यास तयार झाले. मी दोन शब्दही बोलू शकणार नाही असेच मला वाटायचे. परंतु एवढ्या व्यस्तेतूनही दादांचे प्रोत्साहन देणे थांबले नव्हते..दादांबद्दलचा आदर शब्दात व्यक्त करणे शक्यच नाही.
दुसऱ्या सत्रात मात्र शिलेदारांच्या सरसेनापतींचे आगमन झाले आणि सर्व वातावरणच खुलून गेले. आधीच मेघराजाने हजेरी लावून कविमनांना हर्षोल्हासात चिंब भिजविले होते. त्यात दादांचे आगमनाने संपूर्ण हॉलमध्ये नवचैतन्यच पसरले आणि कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यास चार चांद लावून गेले. आदरणीय राहुलदादांचीही जणू तारेवरची कसरतच ..किती प्रवास, किती धावपळ…परंतु नंतर वेळ देत ,सर्वांना भेटत, चौकशी करीत एकरूप झालेत. अशा प्रकारे हा काव्यसृष्टीतला चैतन्यझरा सर्व कविमनांना भिजवून अंतर्मनापर्यंत गारवा देऊन गेला. शेवटी निरोप घेताना अंतःकरण जड झाले होते. निघावेसे वाटत नव्हते. उपस्थित सर्वच ताई दादांना भेटून खरेच खूप आनंद वाटला. आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवसाचे मला साक्षीदार होता आले हे माझे भाग्यच…!!
“निस्वार्थ नीती, प्रेमळ नाती
भाग्यवंतानाच, वाढते नियती..”
सौ.संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर गुजरात
=====





