‘मुलीचे माहेर म्हणजे तिच्या अस्तित्वाची पहिली ओळख’; प्रशांत ठाकरे
शनिवारीय 'काव्यस्तंभ स्पर्धेचे' परीक्षण

‘मुलीचे माहेर म्हणजे तिच्या अस्तित्वाची पहिली ओळख’; प्रशांत ठाकरे
शनिवारीय ‘काव्यस्तंभ स्पर्धेचे’ परीक्षण
आज सात फेब्रुवारी, माझ्या लाडकी भाची अपूर्वाचा आज लग्न सोहळा. डबडबत्या अश्रूंनी तिच्या बिदाई प्रसंगी प्रकर्षाने उणीव जाणवत होती ती माझे स्वर्गीय मेहुणे आदरणीय रावसाहेब यांची. आज सारं काही होतं फक्त ते नव्हते… “दिल्या घरी सुखी रहा” हे शब्द मुलीच्या लग्नाच्या वेळी निरोप देताना आई-वडिलांच्या ओठांवर येतात. ते शब्द ऐकताना हास्य असते, पण त्या हास्यामागे डोळ्यांत साठलेले पाणी असते. प्रत्येक क्षणी त्यांची आठवण आणि उणीव…..शब्दात बांधू शकत नाही.विवाह म्हणजे केवळ घर बदलणं नसते तर ती आपल्या बालपणाच्या आठवणी, आईच्या पदराची सावली, वडिलांचा आधार, भावंडांचा लाड सगळे मनात घट्ट बांधून एका नव्या जगात पाऊल टाकत असते.
मुलीचे माहेर म्हणजे तिच्या अस्तित्वाची पहिली ओळख. तिथे तिने बोलायला शिकलं, चालायला शिकलं, रडायला आणि हसायला शिकले. पण लग्नानंतर सासर हेच तिचे नवे घर बनते नवी माणसं, नवे नाते, नवे नियम, नवी जबाबदारी. अशा वेळी“दिल्या घरी सुखी रहा”या वाक्यात केवळ शुभेच्छा नसतात, तर आयुष्यभराची प्रार्थना दडलेली असते. “जिथे जाशील, तिथे तुझं आकाश उजळलेलं असू दे.” हीच भावना “दिल्या घरी सुखी रहा” या चार शब्दांत सामावलेली असते. भावनेचा किनारा लाभलेले असे क्षण खूप काही सांगून जातात.
अशा क्षणांना शब्दबद्ध करण्यासाठी आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी व्यासपीठ दिल. शेवटी कवी मनच ते… कित्येकांनी या चार शब्दांना शब्दबद्ध करताना आपल्या आठवणी, विरह, अनुभव सारं काही पणाला लावलं… व सर्वच समूहात एकापेक्षा एक सुंदर रचनांची जुगलबंदी पहावयास मिळाली. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा… धन्यवाद…!!
प्रशांत ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
मुख्य परीक्षक/ लेखक/ समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



