किरण मेश्राम ‘मन की बात’ प्रश्नमंजुषेत राष्ट्रीय स्तरावर
नागपूर शहर प्रतिनिधी
किरण मेश्राम ‘मन की बात’ प्रश्नमंजुषेत राष्ट्रीय स्तरावर
कामठीच्या किरणताई मेश्राम यांची ‘मन की बात’ प्रश्नमंजुषेत राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर : (दि ११) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ अंतर्गत आयोजित प्रश्नमंजुषेत नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील किरणताई पुष्पराज मेश्राम यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी विचारण्यात आलेल्या १० पैकी १० प्रश्नांची अचूक उत्तरे देत संपूर्ण भारतातून निवडल्या गेलेल्या पहिल्या ३० सर्वोत्तम सहभागींमध्ये स्थान मिळवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मन की बात’ हे भाषण ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजया दशमीच्या दिवशी सुरू झाले असून आजपर्यंत या कार्यक्रमाचे १२९ भाग प्रसारित झाले आहेत. प्रत्येक भागानंतर ‘नमो ॲप’वर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रश्नमंजुषेत देशभरातील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. या उपक्रमाचा उद्देश राष्ट्रउभारणीसाठी कार्य करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हा आहे. या प्रश्नमंजुषेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना ‘मन की बात @100 – इग्नाइटिंग कलेक्टिव्ह गुडनेस’ हे ब्लूकाफ्ट फाउंडेशन द्वारा संकलित पुस्तक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते. हे पुस्तक पंतप्रधान मोदी यांच्या विचारसरणी, मूल्ये आणि ‘मन की बात’ द्वारे निर्माण झालेल्या सकारात्मक जन चळवळीचे दर्शन घडवते.
किरण मेश्राम यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टी नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेले प्रशस्तीपत्र व ‘मन की बात’ पुस्तक त्यांना प्रदान करण्यात आले. अशी माहिती पत्रकार परिषदेत किरणताई मेश्राम आणि पुष्पराज मेश्राम यांनी दिली. कामठी परिसरातून राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत असून, ही कामगिरी इतर नागरिकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पुष्पराज मेश्राम त्यांची पत्नी किरण मेश्राम, मीनाक्षी मेश्राम, आणि वैहिनी शिल्पा मांडवकर तसेच मुले निषाद मेश्राम व अभिज्ञ मेश्राम यांची उपस्थिती होती.



