मन, मस्तिष्क आणि मस्तकाची खरी गरज पुस्तक”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“मन, मस्तिष्क आणि मस्तकाची खरी गरज पुस्तक”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. ते ज्याने घेतले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’. समजा तुमच्याकडे काही पैसे असतील तर त्यापैकी अर्ध्या पैशातून पुस्तके विकत घ्या. त्यातून मिळालेले ज्ञान तुम्हाला भाकरी मिळवून देईल. किती उदात्त विचार आहे ना! ‘आपल्या हातात पुस्तक असेल तर मस्तक जागेवर राहते’. अन्न ही शरीराची गरज आहे तशीच ज्ञान ही मेंदूची गरज आहे. अगदी लहानपणापासूनच हलके फुलके वाचन करण्याची आवड निर्माण झाली, तर पुढे त्याचे व्यासंगात रूपांतर होते. तरूण मन, मेंदूला अशी काही दिशा मिळते की जीवनातली दशा संपून जाते
‘ज्या व्यक्तीसोबत पुस्तक आहे तो कधीही एकटा नसतो’. शिवाय निर्भय असतो. कारण आपण जसजसे मोठमोठ्या साहित्यिकांचे चरित्र ग्रंथ, प्रवास वर्णन, कथा कादंबरी, वाचत राहू तसतसे आपल्या ज्ञानाची कक्षा रूंदावत जाते. जगातल्या कोणत्याही समस्येचे समाधान ज्ञानातच दडलेले आहे. त्यासाठी अमाप वाचन असणे आवश्यक आहे. समजा एखाद्या व्यक्तीकडे अमाप पैसा आहे मात्र त्याचा विनियोग करण्याची बुद्धी त्याच्याकडे नसेल तर सारे काही व्यर्थ आहे. दुसरी गोष्ट धनवानाला मोजकेच मान देतील. मात्र विद्वानाला सारे जग सन्मान देईल. दररोज एक पान, एक अध्याय तरी कोणत्याही पुस्तकाचे वाचन करावे. ज्याने आपले अनुभव विश्व समृद्ध होते.
काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरीता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र या पार्श्वभूमीवर खरेच खूप बोलके आहे. एका विशाल वृक्षाखाली बसलेला एक व्यक्ती, दूरवर उदयाचली येणारा सूर्यनारायण, गगनात उंच भरारी घेणारा पक्षी, आणि बाजूलाच एक ग्रंथ… ज्यातून निघालेली एक प्रकाश शलाका जी ज्ञानाचे प्रतिक आहे. तर तो व्यक्ति उपासकाचे प्रतिक आहे. पक्षी प्रगतीचे प्रतिक आहे. वृक्ष समृद्धीचे प्रतिक आहे. एकंदरीत एक पुस्तक मानवी जीवनात किती अमूलाग्र बदल घडवू शकते याचा समग्र सार या चित्रात दडलेला आहे. म्हणून तर म्हणतात ग्रंथ हेच खरे गुरू.! पुस्तक हाच खरा मित्र.!!
मस्तक जागी
मन मस्तिष्क गती
पुस्तक हाती
समूहातील हायकू रचनांचे अवलोकन करता अतिशय अर्थपूर्ण हायकू वाचता आले. हायकू लेखन एक अद्भूत कला आहे. जी तुमच्यातल्या कल्पक प्रतिभेला आव्हान देत असते. एखादी पंधरा वीस ओळीची कविता लिहिणे वेगळे आणि सतरा अक्षरांचा हायकू लिहिणे वेगळे. अतीसूक्ष्म निरिक्षण दृष्टी आणि अचंबित करणारा कल्पनाविलास यांचा सुरेख संगम साधणे म्हणजे परिणामकारक हायकू निर्मिती करणे. सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा. आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनापासून आभार.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



