पर्यावरणपूरक दिवाळी : आनंद आणि निसर्गाचा सुंदर संगम
प्रतिमा नंदेश्वर ता. मूल, जि.चंद्रपूर

पर्यावरणपूरक दिवाळी : आनंद आणि निसर्गाचा सुंदर संगम
दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. नरकासुराच्या वधाचा, प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत परतण्याचा आणि लक्ष्मी पूजनाचा हा सण. घरोघरी दिवे लागतात, फराळाचा सुगंध दरवळतो, नवीन कपडे, भेटवस्तू आणि आनंदाचा उत्साह सगळीकडे पसरतो. पण गेल्या काही वर्षात आपल्या दिवाळीचं स्वरूप बदललं आहे. पणत्यांच्या जागी चायनीज लाइट्स आल्या, फुलांच्या माळांच्या जागी प्लास्टिकच्या माळा आल्या आणि साध्या फटाक्यांच्या जागी मोठमोठे आवाज करणारे बॉम्ब आले. या बदलामुळे आपला आनंद वाढला का? तर नाही, उलट प्रदूषण वाढलं, आजार वाढले, आणि निसर्ग ओरडायला लागला. म्हणूनच आज काळाची गरज आहे – पर्यावरणपूरक दिवाळीची. दिवाळीच्या रात्री आपण आकाशात लाखो रुपये उडवतो, पण त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं? फक्त धूर आणि आवाज. फटाक्यांमुळे हवेत सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड यांसारखे विषारी वायू मिसळतात. दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये हवा इतकी खराब होते की डोळे जळजळतात, श्वास घ्यायला त्रास होतो.
ध्वनी प्रदूषणामुळे लहान बाळं घाबरतात, वृद्ध माणसं अस्वस्थ होतात, आणि मुक्या प्राण्यांना तर खूपच त्रास होतो. कुत्रे, मांजरी, पक्षी फटाक्यांच्या आवाजाने घाबरून पळतात. अनेक पक्षी तर जीवाच्या भीतीने मरतात सुद्धा. आणि फटाके बनवणाऱ्या कारखान्यात काम करणारी लहान मुल? त्यांच बालपण या विषारी धुरात हरवतं. एक फटाका उडाल्याने कुणाच्या तरी आयुष्यातचा अंधार वाढतो. हे आपण विसरतो. म्हणून फटाके मुक्त दिवाळी हीच खरी दिवाळी. पूर्वी दिवाळीत मातीच्या पणत्या. अंगणात, गच्चीवर, दारात पणत्यांच्या रांगा लागायच्या. त्या पणत्यांच्या उजेडात घर अगदी स्वर्गासारखं वाटायचं. मातीची पणती ही पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. ती मातीतून येते आणि मातीतच मिसळते. तिला वीज लागत नाही, बॅटरी लागत नाही. तिचा मंद उबदार प्रकाश मनाला शांती देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक पणती विकत घेतली की एका कुंभार कुटुंबाच्या घरात दिवाळी साजरी होते.
आपण चायनीज साइट्स घेतो, तेव्हा पैसा परदेशात जातो. पण मातीची पणती घेतली की पैसा आपल्या माणसाकडे राहतो. हीच खरी आत्मनिर्भर दिवाळी, यंदा ठरवूया १०० पणत्या लावू पण एकही फटाका उडवायचा नाही. ‘सजावट निसर्गाकडून शिकू या’. दिवाळीची आरास म्हणजे दिवाळीचा आत्मा. पण आपण सजावटीसाठी प्लास्टिक वापरतो. प्लास्टिकच्या माळा, थर्माकोलची सजावट, प्लास्टिकचे आकाशकंदील – हे सगळं दिवाळीनंतर कचऱ्यात जातं आणि शेकडो वर्षे मातीत तसंच राहतं. ते जाळलं तर विषारी धूर निघतो. त्याऐवजी फुलांची सजावट झेंडू, जाई-जुई, गुलाब यांच्या माळा घराला सुगंधही येईल आणि सजावटही सुंदर दिसेल. दारात आंब्याच्या पानांचं तोरण लावले तर शुभही दिसेल आणि सुंदरही. मुलांना आकाशकंदील बनवायला दिला, तर त्यात मुलांची सर्जनशीलता वाढेल आणि कुटुंबातला आनंदही. रासायनिक रंगाऐवजी हळद, कुंकू, तांदळाचं पीठ, फुलांच्या पाकळ्या पासून नैसर्गिक रांगोळी काढूया. आपण दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देतो, त्या प्लास्टिकच्या असतील तर? त्या लवकर तुटतात. त्यापेक्षा एखाद छोटंस रोपटं, तुळस मनीप्लाट, जास्वंद, मातीची पणती, हस्तकलेची वस्तू, पुस्तक, ड्रायफ्रुडस, हाताने बणवलेला घरचा फराळ, शुभेच्छा पत्र अशा वस्तू दिल्या की जसे की रोपटे वाढत जाईल तसेच रोपटे देणारी ती व्यक्ती तुमच्या आठवणीत सदैव राहिल.
गरजेपुरताच फराळ बनवूया. उरलेलं अन्न गरजू लोकांना, कामवाल्या मावशींना, रस्त्यावरच्या मुलांना देऊया. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हीच खरी दिवाळीची भेट. पर्यावरण वाचवणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ती आपलीही आहे. एका घराने बदल केला तर काही होणार नाही, पण लाखो घरांनी बदल केला तर क्रांती होईल. आपल्या मुलांना शिकवू या – दिवाळी म्हणजे फटाके नाही, दिवाळी म्हणजे दिवे आहे. दिवाळी म्हणजे प्रदूषण नाही, दिवाळी म्हणजे प्रसन्नता आहे. चला, यंदाची दिवाळी वेगळी साजरी करूया.
फटाक्यांचा आवाज नाही, पणत्यांचा प्रकाश असेल, प्लास्टिकची माळ नाही, फुलांचा सुगंध असेल, प्रदूषणाचा धूर नाही, प्रेमाचा दरवळ असेल. निसर्गाला जपूया, पर्यावरणाला वाचवूया आणि खरी, मनापासूनची दिवाळी साजरी करूया. फटाकेमुक्त, प्रदूषणमुक्त, आनंदयुक्त दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
(लेखिका या ज्येष्ठ कवयित्री आहेत)
===========

