नेपाळमधील महाप्रलय
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

नेपाळमधील महाप्रलय
तिबेटमधून आलेल्या भीषण पुराच्या लोंढ्याने मध्य नेपाळमध्ये हाहाकार माजला.भोळे कोशी नदीला आलेल्या महापुरात मानवहानी, वित्तहानी, निसर्गहानी झाली. तिबेटमध्ये स्थानिक वेळेनुसार 8.37 मिनिटांनी दिनांक 26 ऑगस्टला भूकंप झाला, त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत महापूर आला. तिबेटमधून उगम पावणारी भोळे कोशी नदी पुढे त्रिशूल नदीला मिळते. त्रिशूली नदी नारायणी नदी-गंडक नदी प्रणालीचा भाग आहे. त्यामुळे नेपाळमधील पुराचा परिणाम बिहार आणि उत्तर प्रदेशातही पोहचला.हिमालयात हिमनद्याजवळ बर्फ आणि दगडांनी अडवलेले तलाव तयार होतात. अशा तलावांचा नैसर्गिक अडथळा फुटला, तर काही वेळातच मोठ्या प्रमाणात पाणी खाली येते. मोटे कोशीच्या महापुरामागे अशाच हिमनदीतील तलावाचा अचानक विसर्ग झाला. उंच पर्वतांवरील बर्फ किंवा हिमखंड तुटून खाली आले. त्याचवेळी मोठया प्रमाणात बर्फ वितळला असेल तर हे पाणी थेट नदीत जाते. नदीत आधीच असलेल्या पाण्यात मोठया प्रमाणात वितळलेले पाणी मिसळल्याने प्रवाह काही मिनिटांत धोकादायक पातळीवर जातो.
या महापुरातील काही भावूक क्षण:
1) डोळ्यासमोर घर वाहून जात होते, जीव वाचवण्यासाठी सगळे जण सैरावैरा धावत होते. कुणी डोंगर चढत होते कुणी जंगलाचा आसरा घेत होते. पाण्याचा रौद्र प्रवाह आणि चिखलाच्या लोंढयाने सारे काही गिळंकृत केले. मात्र अशा परिस्थितीत मृत्यू समोर असतानाही नेपाळमधील अनेकांनी हार मानली नाही. चिखलाने माखलेले शरीर, थकलेला चेहरा आणि त्यातून बाहेर येण्याची आस 97 वर्षीय गुणा माया बोहरा यांचा बचाव करतानाचा हा क्षण.
2) दोलखा येथील ‘तुळशी बहादूर भंडारी’ यांनीही मृत्यू जवळून पाहिला. चिखल आणि पाण्याच्या लोंढ्याने डोळ्यासमोर घरे पत्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळत होती. या प्रवाहाने त्यांना डोंगराच्या बाजूला फेकले गेले आणि जीव वाचला.
3) मुख्याध्यापकामुळे सोळाशे मुलाचे प्राण वाचले. नेपाळमधील नुवाकोट जिल्हयात आलेल्या महापुरातून ‘राजेंद्र दावडी’ यांनी प्रसंगावधान राखून 1643 विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले. शाळेत असताना महापुराची माहीती मिळताच त्यानी शाळा रिकामी केली. दावडी हे त्रिशुली खोर्यातील त्रिभुवन. त्रिशुली माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आणि इंग्रजीचे शिक्षक आहेत. दिनांक 26/8/2026 सकाळी त्याच्या एका मित्राने फोन करुन जवळचे गाव नदीच्या पुरात वाहून गेल्याची माहिती दिली आणि त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले. त्यानंतर एका पालकाने शाळेत धाव घेऊन पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याचे सांगितल्यावर वेगाने हालचाली झाल्यात. दावडी यांनी शिक्षकांना सर्व मुलांना वर्गाबाहेर काढण्याचा सुचना दिल्या. त्यांनी तातडीने स्कूल बस चालकांनाही संपर्क करून माघारी फिरण्यास सांगितले. यावेळी संपर्क होऊ न शकलेली एक बस पूल ओलांडत होती. सर्व मुले उंचावरील सुरक्षित ठिकाणी धावू लागली. एका विद्यार्थिनीला भीतीमुळे त्रास होऊ लागल्याने तिला दुचाकीवरून डोंगराकडे नेण्यात आले. दावडी स्वतः मुलांच्या मागे राहून त्यांना सुरक्षित स्थळी पोहचवित होते. अखेर सर्व मुलांनी पिंपळाच्या झाडाखाली आश्रय घेतला. काही वेळातच आलेल्या महापुराने शाळा उध्वस्त झाली. दावडी यांच्या सावधानतेमुळे सर्व 1643 विद्यार्थ्यांचे प्राण वाचलेत शाळेतील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत पण यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
4) साडी ठरली आयुष्याची दोरी! नेपाळ- तिबेट सीमेवर प्रचंड पाऊस कोसळत होता.रस्त्यावरून महापुराचे पाणी वाहत होते. काही क्षणातच बसमध्ये अडकलेल्या 21 यात्रेकरुसमोर जगण्याचा एकच मार्ग उरला रस्ता सोडून जिवाच्या आकांताने डोंगर चढणे मात्र चिखलाने निसरडया झालेल्या मार्गावरून जाणेही अशक्य होते.तेव्हा ‘पुंगोडी’ नावाच्या महिलेने धाडस करून बसमधून बाहेर पडली. डोंगरावर सुरक्षित जागी गेली. अंगावरील साडी काढली आणि तिच्या आधाराने इतरांनी डोंगर चढला.ही साडी सर्वासाठी आयुष्याची दोरी बनली. बहुतांश लोकांचे वय पन्नाशीपार होते.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
=========



