0
4
8
2
9
7
स्पर्शगंध
कळले ना…असे आजही भलतेच विपरीत झाले
सुसाट सुटला वारा,अन् क्षणात नभं हरवून गेले..
ती होती अगदीच आतुर,आस लावून मनास,
बरसतील धारा करून जातील गंधित या तनास..
मिटवित अंतर व्याकुळल्या ऋतुचक्रास ओढ लागलीय,
कळतेय व्यथा त्या दूर नभीला,विरहातील प्रित जागलीय..
मिठीत घेत अलगत बरसणारी टिपूर अमृतधारा,
स्पर्शगंध मिलनाचा साऱ्या सृष्टीत दरवळणारा..
भेगाळल्या जखमांवर तू हळुवार मलम लावणार,
भरून निघतील घाव तेही, तुझ्या स्पर्शात गाणार..
सरीवर सर ती धावणारी त्यात दोघेही रिक्त होणार,
कधी खवळून ,तर कधी रिमझिम प्रित तुझी बरसणार..
आज तुझं भरून येणं पाहता सुखावत होते रे ती,
मिलन घडी स्पर्शगंधाची येता मिटणार विरह वेदना ही..पण कळले ना ऐन मोक्याला,हा वारा झाला फितूर,
गिळून हुंदका हरवून गेले नभ ती तशीच आतुर..!
ती तशीच आतुर..!
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
0
4
8
2
9
7



