हृदयाचा करार की संस्कारांचा वारसा?
व्हॅलेंटाईनच्या सात दिवसांपलीकडचं 'शाश्वत' प्रेम!

हृदयाचा करार की संस्कारांचा वारसा?
व्हॅलेंटाईनच्या सात दिवसांपलीकडचं ‘शाश्वत’ प्रेम!
फेब्रुवारीचा महिना उजाडला की, निसर्गही जणू शृंगाराचा नवा साज चढवू लागतो. पानगळ संपून फांदीवर पालवीचे कोवळे कोंब फुटू लागतात आणि हवेत एक अनामिक, गुलाबी गारवा दरवळू लागतो. या ऋतूला आपण ‘प्रेमाचा ऋतू’ म्हणतो. बाजारात लाल गुलाबांची गर्दी होते, सोशल मीडियाच्या भिंती रंगीबेरंगी ‘हार्ट्स’ने भरून जातात आणि ‘व्हॅलेंटाईन’च्या नावाखाली तरुण मनांमध्ये एक वेगळीच धुंदी निर्माण होते. पण या झगमगाटात, परफ्युमच्या वासात आणि कॅफेमधील गोंगाटात आपण प्रेमाची मूळ, सात्विक आणि शाश्वत व्याख्या कुठे तरी विसरत चाललो आहोत का? हा प्रश्न आज गंभीरपणे समोर उभा आहे.
आजचं प्रेम हे बऱ्याचदा कॅलेंडरच्या त्या सात दिवसांच्या चौकटीत बंदिस्त झालं आहे. ‘रोज डे’ पासून सुरू होणारा हा प्रवास ‘व्हॅलेंटाईन डे’ला एका मोठ्या सेलिब्रेशनने संपतो. पण ज्या प्रेमाची सुरुवात एका गुलाबाच्या फुलाने होते, त्याचा शेवट त्याच फुलासारखा कोमेजून का होतो? आजची तरुण पिढी प्रेमाला केवळ एक ‘हृदयाचा करार’ समजू लागली आहे का? जिथे अटी आहेत, जिथे प्रदर्शन आहे आणि जिथे केवळ क्षणिक आकर्षणाचं मृगजळ आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या प्रेमाला ‘भक्ती’ मानलं, ज्या नात्याला ‘संस्कारांचा वारसा’ समजलं, त्यातील गांभीर्य आजच्या डिजिटल युगातील ‘लाईक्स’ आणि ‘कमेंट्स’च्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं आहे.
खरे तर, प्रेम ही संकल्पना उथळ प्रदर्शनाची नसून ती अंतर्मनाच्या खोल तळाशी जपलेल्या विश्वासाची आहे. पण दुर्दैवाने, आज आधुनिकतेच्या नावाखाली उंबरठ्याची मर्यादा ओलांडणं म्हणजेच ‘स्वातंत्र्य’ मानलं जात आहे. ज्या बापाने रक्ताचं पाणी करून घराचं छप्पर सावरलं, त्याच्या कष्टाचा सुगंध विसरून परक्या माणसाच्या शब्दांतील साखरेला आपण ‘प्रेम’ समजू लागलो आहोत. हा लेख केवळ व्हॅलेंटाईनच्या विरोधातला सूर नाही, तर तो प्रेमाला पुन्हा एकदा त्याच्या ‘पावित्र्याची’ आणि ‘जबाबदारीची’ आठवण करून देणारा एक आरसा आहे. आपण हे विसरता कामा नये की, हृदयाचा कोणताही करार हा घराण्याच्या संस्कारांहून मोठा नसतो.
प्रेमाच्या या गुलाबी सप्ताहात, आकर्षणाच्या वादळात वाहून जाण्यापेक्षा, वास्तवाच्या जमिनीवर पाय रोवून उभं राहण्याची आज नितांत गरज आहे. चला तर मग, या ‘व्हॅलेंटाईन’च्या पडद्याआड दडलेल्या काही जळजळीत सत्यांचा आणि शाश्वत प्रेमाच्या खऱ्या अर्थाचा वेध घेऊया…
हृदयाचा करार विरुद्ध आकर्षणाचं मृगजळ:
आजचं प्रेम हे बऱ्याचदा एखाद्या ‘इन्स्टंट’ करारासारखं झालं आहे. दोन भेटी आणि काही मेसेजेस झाले की, त्याला थेट ‘हृदयाचं देणं’ मानलं जातं. पण तरुण मनांनी हे ओळखायला हवं की, ही काळजाची ओढ आहे की केवळ वयानुसार येणाऱ्या ‘आकर्षणाचं मृगजळ’? आकर्षण हे रूपावर आणि सुविधेवर असतं, जे विजेच्या लखलखाटासारखं क्षणिक असतं. “तू माझ्या अटी पाळल्यास, मी तुझ्यावर प्रेम करेन,” असा हा व्यवहार जिथे असतो, तिथे नातं टिकत नाही. व्हॅलेंटाईनच्या दिवसांत दिसणारा उत्साह बऱ्याचदा याच आकर्षणाच्या मागे धावणारा असतो. मृगजळ जसं हरणाला तहानेने व्याकुळ करतं, तसंच हे आकर्षण मुलींना घराच्या सुरक्षित उंबरठ्यावरून बाहेर खेचून संकटाच्या खाईत लोटतं.
खरं प्रेम हे ‘मिळवण्याची’ नाही, तर ‘जपण्याची’ रीत आहे. आकर्षणाचे हे चष्मे उतरवून जेव्हा आपण जोडीदाराला त्याच्या दोषांसह स्वीकारतो, तेव्हाच नात्याला शाश्वततेचा गंध येतो. सात दिवसांच्या या धुंदीपेक्षा आयुष्याचं वास्तव खूप वेगळं असतं, हे वेळीच समजून घेणं म्हणजेच विवेक आहे.
संस्कारांचा वारसा आणि प्रेमाची जबाबदारी:
प्रेम म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधील खाजगी संवाद नसून, ती आपण आपल्या घराण्यातून घेतलेल्या ‘संस्कारांच्या वारशाची’ कसोटी असते. ज्या बापाने आपल्या हाताला फोड येईपर्यंत कष्ट करून लेकीच्या पायात कधी काटा टोचू दिला नाही, ज्या आईने स्वतःच्या स्वप्नांची होळी करून मुलीचं भविष्य उजळलं, त्या पालकांच्या विश्वासाचा पाया म्हणजे तुमचं चारित्र्य असतं.
आज ‘व्हॅलेंटाईन’च्या नावाखाली अनेकदा स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. पण खरं स्वातंत्र्य हे उंबरठा ओलांडण्यात नसून, उंबरठ्याची प्रतिष्ठा जपण्यात असतं. संस्कार हे प्रेमाच्या आड येणारे दगड नसून, ते तुमच्या आयुष्याचं रक्षण करणारं ‘सुरक्षा कवच’ आहेत. ज्या प्रेमात आपल्या आई-वडिलांची मान खाली जाईल अशी कोणताही कृती असेल, तर ते प्रेम नसून ती एक प्रकारची कृतघ्नता आहे.
तुमचं प्रेम असं असावं ज्याचा तुमच्या बापाला अभिमान वाटेल. जो तुमच्या संस्कारांचा आदर करत नाही, तो तुमच्यावर खरं प्रेम कधीच करू शकणार नाही. कारण ज्याला तुमच्या घराण्याच्या इभ्रतीची किंमत नाही, त्याला तुमच्या आयुष्याची काय किंमत असणार? प्रेमात पडणं ही नैसर्गिक भावना असली, तरी त्या प्रेमाला संस्कारांची आणि जबाबदारीची जोड देणं हेच खऱ्या सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे.
सात दिवसांचा उत्सव विरुद्ध आयुष्याची सोबत:
’व्हॅलेंटाईन’चा आठवडा हा एखाद्या उत्सवासारखा येतो आणि निघून जातो. या सात दिवसांत गुलाबाचा सुगंध असतो, चॉकलेटचा गोडवा असतो आणि वचनांची खैरात असते. पण लेखणीच्या टोकावरचं वास्तव असं आहे की, आयुष्य हे काही या सात दिवसांच्या सप्तरंगांतून बनलेलं नसतं. गुलाब सुकल्यावर आणि चॉकलेटचा कागद कचऱ्यात गेल्यावर जे उरतं, ते असतं ‘वास्तव’.
शाश्वत प्रेम हे ‘टेडी डे’ला दिलेल्या खेळण्यात नसतं, तर उतारवयात जेव्हा शरीर साथ देत नाही, तेव्हा एकमेकांचा आधार बनण्यात असतं. आजची पिढी सात दिवसांच्या या ‘इव्हेंट’मध्ये इतकी गुंतली आहे की, त्यांना ‘सोबत’ (Companionship) या शब्दाचा विसर पडला आहे. संकटं जेव्हा आयुष्याचा उंबरठा ओलांडून आत येतात, तेव्हा गुलाबाच्या पाकळ्या कामी येत नाहीत, तर कामी येतो तो एकमेकांवरचा ‘अढळ विश्वास’.
ज्याला तुमच्या डोळ्यांतलं पाणी वाचता येत नाही, तो तुमच्या हातात गुलाबाचं फूल देऊन काय करणार? सात दिवसांच्या या झगमगाटात वाहून जाण्यापेक्षा, असा जोडीदार निवडा जो आयुष्याच्या उन्हात तुमची सावली होईल आणि थंडीत उबदार श्वास होईल. प्रेम हे प्रदर्शनाचं शास्त्र नसून ते एकमेकांच्या अस्तित्वाला पूर्णत्व देणारं एक ‘शाश्वत सत्य’ आहे.
मुलींसाठी विवेकाचा आवाज: बापाचा विश्वास की क्षणाचं आकर्षण?
मुलींनो, तारुण्याच्या या उंबरठ्यावर असताना जेव्हा एखादा गोड शब्द आपल्या कानावर पडतो, तेव्हा तो शब्द ‘प्रेम’ आहे की केवळ एक ‘भूलभुलैया’, हे ओळखण्यासाठी आपल्या मनातल्या ‘विवेकाचा आवाज’ एकदा नक्की ऐका. ज्या बापाने आपल्याला खांद्यावर बसवून जग दाखवलं, त्याच्या ताठ असलेल्या मानेवर आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे कायमची ‘अदब’ येऊ नये, इतकी जाणीव नक्की ठेवा.
व्हॅलेंटाईनच्या या मोहात पडण्यापूर्वी एक क्षण डोळे मिटून आपल्या घराची परिस्थिती आठवा. आपल्या शिक्षणासाठी, आपल्या कपड्यांसाठी आणि आपल्या आनंदासाठी ज्या आई-वडिलांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, त्यांच्या विश्वासापेक्षा एखादं गुलाबाचं फूल कधीच मोठं असू शकत नाही. जो माणूस आपल्याला आपल्या आई-वडिलांशी खोटं बोलायला लावतो किंवा त्यांच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतो, तो आपल्यावर प्रेम करत नाही; तर तो आपल्या आयुष्याशी खेळत असतो.
खरं प्रेम आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देतं, आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला बळ देतं. आपलं ‘व्हॅलेंटाईन’ निवडताना असा जोडीदार निवडा, जो आपल्या बापाच्या कष्टाचा आणि आपल्या संस्कारांचा सन्मान करेल. लक्षात ठेवा, घराण्याची इभ्रत ही एखाद्या काचेच्या पात्रासारखी असते, तिला एकदा तडा गेला की ती पुन्हा सांधता येत नाही. त्यामुळे, हृदयाच्या करारापेक्षा संस्कारांच्या वारशाला महत्त्व देणं, हेच तुमचं खरं शहाणपण ठरेल.
शेवटी, प्रेम हे नाकारण्यासाठी नसतं, तर ते ‘सांभाळण्यासाठी’ असतं. व्हॅलेंटाईनचा हा आठवडा येतो आणि जातो, पण आयुष्याचा प्रवास मात्र संस्कारांच्या शिदोरीवरच पार पाडायचा असतो. आपण आधुनिक व्हावं, जगातलं नवं ज्ञान आत्मसात करावं, पण आपल्या मुळांशी असलेलं नातं तोडू नये. ज्या प्रेमात आपल्या कुळाचा सन्मान जपला जातो आणि ज्या नात्यात पालकांचा आशीर्वाद पाठीशी असतो, तेच प्रेम खऱ्या अर्थाने ‘शाश्वत’ ठरतं.
’हृदयाचा करार’ करताना त्यात प्रामाणिकपणा असू द्या, पण तो करार करताना ‘संस्कारांचा वारसा’ गहाण ठेवू नका. गुलाबाच्या पाकळीसारखं नाजूक असणारं हे तारुण्य विवेकाच्या कुंपणात सुरक्षित ठेवा. जेव्हा आपण स्वतःच्या अस्तित्वाचा आणि घराण्याच्या प्रतिष्ठेचा आदर करता, तेव्हाच आपल्याला समोरच्याकडूनही तोच आदर मिळतो.
चला तर मग, या ‘व्हॅलेंटाईन’ला एक नवा संकल्प करूया.. आपलं प्रेम असं असेल, ज्याने कुणाचं मन दुखावलं जाणार नाही आणि कुणा बापाची मान खाली झुकणार नाही. बापाच्या कष्टाचा सुगंध आणि जोडीदाराच्या विश्वासाचा आनंद जेव्हा एकत्र येतो, तेव्हाच आयुष्याचं खरं ‘नंदनवन’ फुलतं!
प्रा. डॉ. गोविंद पांडुरंग चौधरी (देव)
उपप्राचार्य तथा सहा. प्राध्यापक
पानसरे महाविद्यालय, अर्जापूर
जि. नांदेड.



