Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

रुपेरी केसातील लाल गुलाब..!

अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि अहिल्यानगर

0 4 8 2 8 6

रुपेरी केसातील लाल गुलाब..!

‘प्रेमा, काय देऊ मी तुला? भाग्य दिलंस तू मला…’ सकाळच्या निवांत शांततेत अचानक स्वर दुमदुमले आणि मी क्षणभर थबकले. स्वयंपाकघरातल्या भांड्यांचा आवाज नव्हता, मोबाईलची ती रिंग नव्हती… मग हे गाणं कुठून? वळून पाहते तर माझ्या आयुष्याचा सोबतीच, मिश्कील हसू चेहऱ्यावर घेऊन, मोबाईल हातात धरून उभा. आज व्हॅलेंटाईन डे आहे ना…! त्यांचा निरागस स्वर. क्षणभर काळ थांबला. वर्षे सरली, ऋतू बदलले, केसांमध्ये रुपेरी रेषा उमटल्या; पण नजरेतील ओढ अजूनही तरुणच…!.

गुलाबांच्या पाकळ्या नकोत, भेटवस्तूंचा दिखावा नको, हातात हात आणि मनात विश्वास.. एवढंच पुरेसं आहे. मी हसत म्हटल, आपण साठी ओलांडली… आता हे शोभतं का?” ते शांतपणे म्हणाले, ‘प्रेमाला वय नसतं.!’ त्या एका वाक्यात आयुष्याचा सार दडलेला होता. आमच्या काळात ‘डे’ नव्हते; पण दिवस प्रेमाने भरलेले होते. तारीख ठरवून भावना व्यक्त करायची प्रथा नव्हती; पण प्रत्येक क्षणात जिव्हाळा ओसंडून वहायचा. उघडपणे I Love You..’ म्हणायची हिम्मत नव्हती. नजरेतून संवाद व्हायचा, गजऱ्यातून प्रेम व्यक्त व्हायचं, आणि सणासुदीला एखादं हसू दिवसभर फुलायचं.

माहेरी गेल्यावर गुपचूप पत्र लिहायचं. ‘प्रिय’ लिहावं का ‘प्राणप्रिय ‘तुझाच’ की ‘तुमचीच…!’ शब्द खोडताना हात थरथरायचे; पण प्रत्येक अक्षरात प्रेमाची नाजूक लाज असायची. आजच्या पिढीप्रमाणे आमच्या प्रेमाचा गाजावाजा नव्हता. ना रोज डे, ना प्रपोज डे, ना हग डे… पण सप्तपदीत घेतलेली सात वचने मनात कोरलेली होती. सुखात सोबत आणि दुःखात आधार.. हीच आमची प्रेमाची परिभाषा.

आजकाल फेब्रुवारी आला की वातावरणच गुलाबी होतं. कॉलेजच्या कट्ट्यावर, सोशल मीडियावर, अगदी लहानग्यांच्या हातातही गुलाब दिसतो. हसू येतं… थोडी काळजीही वाटते. कारण प्रेम हे केवळ क्षणिक आकर्षण नसतं. ते आयुष्याची जबाबदारी असतं. ते एकमेकांच्या अपूर्णतेला स्वीकारण्याचं धैर्य असतं. प्रेम साजरं करायलाच हवं पण ते दिवसापुरतं नव्हे, तर आयुष्यभरासाठी. आजही आमच्या नात्यात ना दिखावा आहे, ना दिखाऊपणा. फक्त काळजी आहे, माया आहे, आणि शब्दांपेक्षा अधिक बोलणारी शांत साथ आहे. म्हणूनच साठीतही आमचं प्रेम बहरलेलं आहे. हे केवळ आमचंच नाही; आमच्या पिढीचं वैशिष्ट्य आहे. दोघांत तिसरा कधी आला नाही… ना अहंकार, ना परकेपणा.. आणि मग मी त्यांच्याकडे पाहून हसत चारोळी म्हटली..

“लाजेच्या पाकळ्या गळून पडल्या आज
वयाच्या पल्याड उरला फक्त साज…,
चौदाचा दिवस नव्हे, आयुष्यभराची साथ,
तूच माझा श्वास, तूच माझं प्रेमसंपन्न नातं…”

त्यांनी माझा हात हातात घेतला… आम्ही दोघेही खळखळून हसलो… आणि शांतपणे एकमेकांना म्हटलं ‘हॅप्पी व्हॅलेंटाईन’ डे…! कारण आमच्यासाठी व्हॅलेंटाईन म्हणजे, तारीख नव्हे, तर आयुष्यभर चालणारी साथ…!!

अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि अहिल्यानगर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे