स्वर्ग-नर्क ?
डॉ. अविनाश प. परांजपे वानाडोंगरी, नागपूर

स्वर्ग-नर्क ?
जगातील कुठल्याही धर्माच्या जनसामान्यांच्या मनात चीरकालापासून रुजलेल्या कल्पना म्हणजे स्वर्ग आणि नर्क, किंवा हेवन व हेल, अथवा जन्नत तसेच जहान्नुम. प्रत्येक धर्माच्या संकल्पनेनुसार ह्या गोष्टी मानवाच्या आजच्या आयुष्यातील कर्मावर अवलंबून आहेत. ईश्वराला आवडणार्या म्हणजेच पुण्य, पवित्र, किंवा पाक गोष्टी, कर्म या जन्मात माणसाने केल्यास त्यास मृत्यू नंतर स्वर्ग, हेवन,जन्नत मिळते. आणि ईश्वरास नावडत्या गोष्टी म्हणजेच पाप,अपवित्र, नापाक गोष्टी केल्यास त्या व्यक्तीस मृत्यूनंतर नर्क,हेल म्हणजेच जहान्नुम मध्ये जावे लागते. याचाच असाही एक अर्थ लक्षात येतो, की मरणांनंतर देखील जीवाला सुख दु:ख असते हे सर्वमान्य आहे. त्याच बरोबर हे ही कळून येते की, प्रत्येक धर्माच्या ग्रंथात स्वर्गाचे वर्णन अत्यंत सुंदर केलेले आढळते. ज्यात सर्व मानवी कल्पनात असलेली सुखे अगदी सहज उपलब्ध असतात. आणि नरकाची अशी भीतीदायक वर्णने लिहिलेली आहेत की, मनुष्य केवळ कल्पनेनेच दहशतीतीत जातो. पण याचा असा अर्थ मला समजला की, प्रत्येक धर्म हा मरणांनंतर देखील जीवाला सुख दु:ख असते असे मानतोच मानतो. मग तो कोणत्याही प्रकारचा का असेना, तर ते गैर कसे असेल? अर्थात पुण्यप्रद कर्मे, पवित्र कामे, किंवा पाक करतुते कोणती कोणती आहेत हे त्या त्या धर्माच्या श्रद्धेवर अवलंबून आहेत. पण निश्चितच ती सर्व कामे नक्कीच मानव कल्याणाचीच असणार.
यावर सगळ्या धर्ममार्तंडांच्या बरोबर चर्चा केली असता,हेच आढळले की प्रत्येक धर्माने आपआपल्या धर्माच्या लोकांना त्यांनी सन्मार्गावर चालावे म्हणूनच ही स्वर्गाची कल्पना आणि दुष्कर्म केल्यास होणार्या नर्कातील पाशवी शासन म्हणजेच शिक्षेची कल्पना मुद्दाम सजविल्या गेलीली असू शकते. आता मरणांनंतर देखील जीवाला सुख दु:ख असते म्हणजे काय? तर आपण आपले सदध्याचे शरीर सोडून जातो.परंतु मेडिकल सायन्सनुसार तर आपण सततच आपले सध्याचे शरीर सोडून जात असतो. सतत थोडे थोडे मरत असतो. कारण आपले शरीर म्हणजे केवळ एक अब्जावधी पेशींची संरचना आहे.
या सगळ्याचा अर्थ एकच आहे की पूर्वीच्या पेशी नष्ट होऊन नवीन पेशी त्यांची जागा घेतात. मग सांगा, आपले शरीर तेच राहते का? तर नाही. आपण आपल्या घराच्या एका एका जीर्ण होत चाललेल्या खोलीला पाडून टाकून नवी नवी खोली बांधत जातो, आणि जुन्या खोल्यांतील काढून ठेवलेले सामान पुन्हा नवीन बांधलेल्या खोल्यात ठेऊन वापर सुरू करतो. परंतु समजुती नुसार आपण नवीन घरात जात नाही. तसेच. आपण जुनी पेशी संरचना सोडून नवीन पेशी संरचनेत प्रवेश करतो. परंतु, असे करतांना नवीन पेशी जेव्हा जुन्या पेशींची जागा घेतात, तेव्हा जुन्या पेशींना चिकटलेले विषाणू, जिवाणू, जंतु , किटाणू हे त्या मरणार्या पेशींच्या कडून नवीन पेशींच्या कडे हस्तांतरित होतात की काय? का तोवर कोठे बाजूलाच दडून बसतात ? माहिती नाही. म्हणूनच आपला आजार, रोग हे देखील पेशी संरचना बदला नंतर पुढेही संक्रमित होतो. हयालाच अध्यात्मात आपली कर्मे ही मेल्यानंतर देखील पाठ सोडीत नाहीत असे म्हटल्या गेले असावे.
जर तुम्हाला एखाद्या वाईट कर्मामुळे, उदाहरणार्थ सतत गुटखा खाण्याने तोंडाचा कॅन्सर झाला तर कितीही पेशी संरचनांच्या बदलाने तो नष्ट होत नाही. जर तुम्ही म्हणजेच आधीच्या पेशी संरचनेत गुटखा खाण्याचे पाप केले असेल तर तुम्हाला या आजच्या पेशी संरचनेत त्याची फळे भोगावी लागतील. कॅन्सर च्या रूपाने. जर तुम्ही जुन्या जन्मात म्हणजे आधीच्या पेशी संरचनेत चोरी, खून, बलात्कार सारखे गुन्हेगारी कृत्य किवा पाप केले असेल तर तुम्हाला त्याच्या मृत्यू नंतर म्हणजेच जुनी संरचना नष्ट झाल्यानंतरही या आजच्या पेशी संरचनेत त्याची फळे भोगावी लागतील फाशी, तुरुंगवास सारखी. बाबांनो यालाच नर्क, हेल, डोजख किंवा जहन्नुम म्हणत असतील .
जर तुम्ही आपल्या थोड्या थोड्या मृत्यू पूर्वी म्हणजेच आधीच्या पेशी संरचनेत, व्यायाम, दुर्बलांना मदत, दया,सत्य, सचोटीचा व्यवसाय सारखे सत्कृत्य, पवित्र कर्म ,पाक करतुते केलेली असतील तर तुम्हाला आजच्या पेशी संरचनेत त्याची फळे म्हणून निरोगी सुदृढ शरीर, जनमानसात तुमच्या बद्दल आदर, सन्मान, धन दौलत, ज्ञान या गोष्टी मिळतील. यालाच स्वर्गसुख, हेवन , जन्नत म्हणतात असे मानावे लागेल. संपूर्ण ज्ञात विश्वात आपल्या धरणीमाता पृथ्वी शिवाय एकही इतका सुंदर आकर्षक, सुजलाम सुफलाम आणि सर्वगुण संपन्न ग्रह नाही. हा ग्रह चांगल्यास चांगली फळे आणि वांगल्यास वांगली फळे देण्यास समर्थ आहे. तत्पर आहे, खमका आहे.
परंतु दुर्दैवाने धर्मधुरिणांनी धर्मातील लोकांना काल्पनिक स्वर्ग, नर्क, हेवन, हेल, जन्नत, जहन्नुम यांच्या कपोल कल्पित कथांच्या माध्यमातून वेगळ्याच दुनियेची स्वप्ने दाखविलीत. ते सगळे खरे असते तर आपल्या चेल्यांना उपदेश करत बसण्या पेक्ष्या हे धर्मधुरीण, सर्वात आधी स्वत:च स्वर्गात पळण्यास गेले असते. म्हणूनच एक लक्ष्यात ठेवणे की, “ स्वर्ग यांहा , नर्क यांहा “. उपरवाला लेन देन का हिसाब बराबर रखता है!
डॉ. अविनाश प. परांजपे
वानाडोंगरी, नागपूर
=========



