
0
5
6
8
0
4
आयुष्य
आयुष्य कधी फुलांचा, कधी काट्यांचा हार,
हसत स्वीकारणाऱ्याचाच होतो खरा सत्कार.
वादळांना भिडल्यावरच क्षितिज जवळ येतं,
जिद्दीच्या एका ठिणगीने नशीबही उजळतं.
जळल्याशिवाय सोन्याला तेज कधी लाभत नाही,
झिजल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही.
घामाच्या प्रत्येक थेंबाला इतिहासाची साथ असते,
मेहनतीच्या पावलांशीच विजयाची वाट असते.
पडणं म्हणजे शेवट नव्हे, नवी उमेद जागवणं,
अश्रूंना सामर्थ्यात बदलून पुन्हा उभं राहणं.
ज्याने स्वतःला जिंकलं, त्याने जग जिंकलं सारं,
कर्तृत्वाच्या प्रकाशापुढे फिकं पडतं अंधारं.
आयुष्य हे देणं आहे, व्यर्थ ते घालवू नको,
स्वप्नांच्या आकाशाला कधी सीमा मानू नको.
जिद्द, धैर्य, विश्वास—हेच खरे सोबती ठरतात,
अशीच माणसं गेल्यावरही मनामनांत जगतात.
अंकुश सालपे, जिल्हा नागपूर
0
5
6
8
0
4


