
माशाळकर सर आले
“माशाळकर सर आले…!”
इतकं ऐकताच चेहरे सारे खुलतात,
माझी चिमुकली लेकरं धावत येऊन
प्रेमाने माझ्या भोवती जमतात.
माझी शाळा म्हणजे माझं पंढरपूर,
विद्यार्थी माझे विठ्ठल-रुक्मिणी.
पहिल्या पायरीला माथा टेकवून,
रोज सुरू होते माझी ज्ञानभक्ती.
पाचवीचा तास आला की म्हणतात,
“सर, आधी जेवण करतो…”
मी हसून म्हणतो,
“हो रे, आधी पोटभर जेवा;
तुम्ही जेवल्यावरच मी शिकवतो.”
आमचा पवन तर भारीच!
एक दिवस खुर्चीवर जाऊन बसला.
मी विचारलं, “अरे, खुर्चीवर का बसलास?”
तो निरागसपणे म्हणाला,
“सर, खुर्चीवर कोणीच नव्हतं ना… म्हणून!”
त्या निष्पाप उत्तरावर
सगळा वर्ग हसून गेला,
आणि माझं मनही
त्या निरागस प्रेमात हरवून गेलं.
पीएच.डी.ची पदवी माझ्याकडे असेल,
पण माझा खरा सन्मान हा नाही;
“माशाळकर सर आले!”
या आनंदाच्या हाकेपेक्षा
मोठं पारितोषिक जगात दुसरं नाही.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
उमरगा, जि. धाराशिव


