
0
5
6
8
0
0
रंग
किती कसं शोधू तुला, कुठे गेला श्रीरंग
वसंत फुलला तरीही, फिकेच सारे रंग ..
मोहवेना मज तो, मनास नाद गुलजार..
सूरही सापडेना, झरेना मेघ मल्हार..
रासरंगात कान्हाच्या, रंगल्या गवळणी
अबोल क्षण सारे, मूक घुंगरू पैंजणी..
सुने सुने गोकुळ माझे, घुमेना ती बासरी
विरह व्याकूळ राधिका, धावे यमुनातिरी..
तुजविण रे कान्हा, सुने सुने जग हे वाटे
विरह असा असह्य, टोचती हृदयांतरी काटे
तूच ध्यास, तूच श्वास, तूच उरला अंतरी
रंगात तुझ्या झाली दंग, राधा ही बावरी..
कितीही असतील रंग तरी, रंग तुझा वेगळा
भरून गेला रंग जीवनी, श्रीहरी तो सावळा..
कृष्णमय जग राधेचे, सूर बासरीचे वाजू दे
तव प्रितीच्या रंगात पुन्हा, या वेडीला भिजू दे..
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, जि.पुणे
=======
0
5
6
8
0
0


