0
4
8
2
9
0
एकजीव
कळत नकळत असे
जीव जीवात गुंतले
परस्परात होते जणू
अनंत जन्म गुंफले…
माझ्याच जणू कायेची
तू बनली होतीस छाया
सांगू तरी किती तुझी
सखे तरल होती माया..
होतीस अशी एकजीव
दोन ह्रदय एकच स्पंदन
पोटात माझ्या दुखताच
ओठात तुझ्या स्फुंदन…
मागे मागे फिरत होतीस
सतत सावली सारखी
माझ्या व्यथा जाणणारी
होतीस खरीखुरी पारखी…
सुख दुःख माझे जे काही
तेच तुझेही झाले होते
तुझ्या रूपानेच घराला
खरे घरपण आले होते…
अगदीच अनपेक्षितपणे
तो प्रसंग असा घडला
नजर लागली सुखाला
काळ अवचित नडला…
आता देहाने दुरावलो
तरी मनाने तुझ्यातच
एका क्षणी होशील तूही
सखे विलिन माझ्यातच..
तुझ्या भोवती माझा
असेल वास निरंतर
तुझ्या श्वास निःश्वासात
जाणवेल तुला चिरंतर…
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
0
4
8
2
9
0



