Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

अनुभवांचा गंध

संजय गरबड मराठे उल्हासनगर, जिल्हा ठाणे

0 5 3 6 2 4

अनुभवांचा गंध

“जीवन म्हणजे केवळ श्वास घेणे नव्हे, तर घेतलेल्या प्रत्येक श्वासाला अनुभवांचा गंध देणे होय.” हे सूत्र मानवी अस्तित्वाचे मर्म अधोरेखित करते. माणसाचे आयुष्य ही एक अशी दीर्घ कविता आहे, जिच्या प्रत्येक कडव्यात एक नवीन वळण, एक नवीन लय दडलेली असते. हे आयुष्य म्हणजे महामार्गासारखी सरळ रेषा नसून, ते एका वळणावळणाच्या घाटवाटेसारखे आहे; जिथे प्रत्येक वळण आपल्याला एका नवीन वास्तवाची ओळख करून देते. आयुष्याची वाटचाल करताना आपण भविष्याची स्वप्ने पाहतो, पण खरी शाळा अनुभवांच्या वळणावरच भरते. कवयत्री बहिणाबाई चौधरी यांनी संसाराचे सार सांगताना म्हटले आहे,

“अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तव्हा मिळते भाकर!”

ज्याप्रमाणे चटका सोसल्याशिवाय अन्नाची गोडी कळत नाही, त्याचप्रमाणे संघर्षाचे वळण ओलांडल्याशिवाय सुखाची चव कळत नाही. बालपणाच्या निरागस विश्वातून बाहेर पडून जेव्हा माणूस तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा राहतो, तेव्हा त्याच्यासमोर स्वप्नांचे अथांग आकाश असते. मात्र, जेव्हा वास्तवाच्या धडका बसू लागतात, तेव्हा ‘अनुभव’ नावाचे पुस्तक खऱ्या अर्थाने उघडले जाते. मिर्झा गालिबच्या शब्दांत सांगायचे तर,

“बे-दम किए देते हैं ये रफ़्तार-ए-ज़माना,
रुकती है कहीं राह, न थमती है कहीं उम्र.”

अर्थात, काळाचा वेग आणि आयुष्याची वळणे आपल्याला कधी थकवतात, तर कधी अधिक प्रगल्भ करतात. आयुष्यात काही वळणे ‘अपेक्षित’ असतात, शिक्षण, करिअर, संसार. पण खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा आयुष्य ‘अनपेक्षित’ वळण घेते. अचानक आलेले आर्थिक संकट, प्रिय व्यक्तीचा विरह किंवा एखादी मोठी हार माणसाला मुळापासून हादरवून टाकते. अशा वेळी कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेतील ओळी आपल्याला उभारी देतात,

“मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!”

लक्षात ठेवावे की, रस्त्याला वळण आले म्हणजे रस्ता संपला असे होत नाही, तर तिथे फक्त वेग कमी करून वळायचे असते. संकटे आपल्याला संपवण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यातील सुप्त शक्ती बाहेर काढण्यासाठी येतात.
“मंज़िलें उन्हीं को मिलती हैं, जिनके सपनों में जान होती है,
पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है,” या उक्तीप्रमाणे वळणावरचा संयमच आपल्याला ध्येयाकडे नेतो. ज्याप्रमाणे घाट उतरताना गाडीचा ताबा सुटू नये म्हणून ‘ब्रेक’ महत्त्वाचा असतो, तसेच आयुष्यात भावनांच्या भरात वाहून न जाता ‘संयमाचा’ ब्रेक लावणे गरजेचे असते. कोणाची साथ सुटते, तर कोणाचे शब्द बोचू लागतात; अशा वेळी विवेकाचा प्रकाश मार्ग दाखवतो. कवी विंदा करंदीकर म्हणतात,

“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे.”

समाजात वावरताना मिळणारा प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट. आपल्या विचारांची प्रगल्भता वाढवत असतो. गालिबने एका ठिकाणी मार्मिक टिप्पणी केली आहे, “उम्र भर ग़ालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ़ करता रहा.” स्वतःच्या चुका सुधारून, संयमाने वळणे पार करणाराच या प्रवासाचा खरा आनंद लुटू शकतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. नदी जेव्हा वळण घेते, तेव्हाच ती नवनवीन प्रदेश सुजलाम सुफलाम करते. “जो बदलाला घाबरतो, तो साचलेल्या पाण्यासारखा होतो आणि जो वळणे स्वीकारतो, तो प्रवाहासारखा जिवंत राहतो”. जुने पूर्वग्रह आणि कालबाह्य विचार सोडल्याशिवाय नव्या वळणावरचे सौंदर्य पाहता येत नाही.

“वक्त बदलता है, फिर बदलेगा,
सारा जहाँ अपना होगा,”

या विश्वासानेच प्रगतीची दारे उघडतात. शेवटी, आयुष्य हे आपण कुठे पोहोचलो यापेक्षा ‘कसे चाललो’, यावर अधिक अवलंबून आहे. सुरेश भटांच्या गझलेतील या ओळी,
“इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते,”
जगण्यातील संघर्षाची जाणीव करून देतात. पण या संघर्षालाच जो अनुभवाचा ‘गंध’ देतो, तोच खरा ‘माणूस’ म्हणून घडतो. “आयुष्याच्या वळणावर भेटणारे अनुभव हे आपल्या आत्म्याचे दागिने आहेत”. पाय थकले तरी, मन थकू देऊ नका. समोर येणाऱ्या प्रत्येक वळणाचे स्वागत करा. मग ते वळण फुलांच्या ताटव्याकडे नेणारे असो वा काट्यांच्या वाटेवरचे; कारण प्रत्येक अनुभवाच्या पाऊलखुणेतूनच ‘माणूस’ घडत असतो. वळण आले की थांबू नका, फक्त दिशा बदला आणि जिद्दीने पुढे चालत राहा! कारण,

“हौसले के तरकश में, कोशिश का वो तीर ज़िंदा रखो,
हार जाओ चाहे ज़िन्दगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद ज़िंदा रखो.”

‘वळण हे अंताचे लक्षण नाही, तर एका नवीन प्रारंभाची सुवर्णसंधी आहे’.

संजय गरबड मराठे
उल्हासनगर, जिल्हा ठाणे
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 2 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे