दुधावरची साय–आई
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

दुधावरची साय–आई
“तुझ्या दुराव्याची सल ही मला बोचते,
मिठीत तुझ्या मज र्स्वगासम वाटते..”
दिनांक 07/08/2006 म्हणजेच 786 हा धार्मिक आकडा शुभ समजल्या जातो. पण हाच अंक आमच्या करीता डोंगराऐवढा दुःख घेऊन आला. कारण माझ्या आईने याच दिवशी जगाचा निरोप घेतला. तिला जाऊन आता वीस वर्ष झालीत, पण असा एकही दिवस नाही, की तिची आठवण येणार नाही अशी ती मायेची खाण, प्रेमळ मूर्ती. आम्ही तिची पाच लेकरं तर होतोच, पण घरी आमचे चार काका यांचे सुध्दा आईने लेकराप्रमाणे सांभाळ केला. माझ्या वडीलांना बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर येथे रेल्वेत क्लर्क म्हणून नोकरीत लागताच आपल्या चारही भावाना गोदिया जिल्ह्य़ातील बेरडीपार येथून शिक्षणासाठी आणलेत. त्यांचे शिक्षण, नोकरी व लग्न याकरीता लेकराप्रमाणे सांभाळ केला. बरेचदा दुपारच्या जेवणाकरीता मी शाळेतून घरी जेवायला येत असे. पण काकानां हमखास आई डबा दयायची. त्याचे कपडे धुणे, आपल्या सर्वच दिरात तिचा खूप जीव आणि त्याचं सुध्दा. सर्वात लहान काका माझ्यापेक्षा फक्त पाच वर्षांनी मोठे, माझी आई पोळ्या चौकोनी किंवा त्रिकोणी चविष्ट बनवायची तिच्या हातच्या पोळ्या सर्वाना आवडायच्या. म्हणजेच कणकीचा गोळा मोठा पोळी लाटताना त्याला आतुन छान तेल लावायची म्हणजे पोळी तव्यावर फुल्यावर त्यातून निघणारी ती वाफ आणि प्रत्येक पोळीचा पापुद्रा वेगळा व्हायचा आणि त्याची चव आहाहा….. कशाही सोबत खा एकदम स्वादिष्ट असायची.
आई घरी गॅस असून सुध्दा चुलीवर स्वयंपाक करायची. कारण गॅसवर मोठ मोठी गंज. ऐवढया संयुक्त कुटुंबाचा स्वयंपाक असायचा. डोळ्यात काड्याचा धुर जात असे मी काडया आण्याकरीता टालावर जायची सोबत लहान युवराज काका यायचे. सडा-सारवण, कपडे धुणे, झाडझुड, निवळणे पाखळणे आईलाचं करावी लागायची. पण तीने कधीच तक्रार केली नाही. सर्व कामे एकटीलाच करावी लागत असत. शिक्षणानुसार एका काकाला पेपरमील, दुसर्या काकानी फिटर केल्यामुळे प्लायवुड कंपनी, एका काकाना रेल्वेत परीक्षा दिली व निवड होऊन टि.सी. तर सर्वात लहान काकानी उच्च शिक्षण व बी.एड् असल्यामुळे ते मुंबईत प्राध्यापक म्हणून नोकरीवर लागलेत. प्रत्येक काकाचे लग्न आटोपताच त्यांना वेगळी बल्लारपूर येथेच रूम करून त्यांचा संसार आईबाबानी वेगळा थाटून दिला. माझी आई सातवा वर्ग शिकलेली असल्यामुळे आमचा स्काॅलरशिपचा अभ्यास घेत असे. आम्हा बहिण भांवडाना सुध्दा आईबाबानी चांगले संस्कार व शिक्षण दिलेत, त्यामुळेच आम्ही भांवडे आपापल्या नोकरी व संसारात आनंदी आहोत.
आई गेल्यावर फक्त आणि फक्त तिच्या आठवणी उरतात. मुलासाठी आई व आईसाठी मुले विश्वच तर असतात. खाली बसून जेवणारा मुलगा व बसून त्याला जेवू घालणारी आई सर्व गरीब श्रीमंत घरात हे चित्र पाहयाला मिळते मी भरविल्याशिवाय हा काही जेवणार नाही यांची जणू तिला
खात्री असते. दोन घास, दोन घास म्हणत कधी कधी तर हा घास बाबाचा, हा घास आईचा, ताईचा,भाऊचा काऊचा, चिऊचा करीत करीत वाटीभर भात कधीचाच केव्हा संपतो ते कळूही देत नाही. म्हणून जोपर्यंत आई आहे तो पर्यंत तिच्या मांडीजवळ बसा ती गेल्यावर फक्त राहतात त्या आठवणी व भिंतीवरील फोटो.
ती पोळ्यांची चव कायमची निघून गेली. हजारो माणसे मिळतील आयुष्यात आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळत नाही. “सात जन्मासाठी काही द्यायचं असेल ना देवा, तर हेच आईवडील मला दे” हीच प्रार्थना !
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
=========



