Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

आयुष्याची शिदोरी: मायेचा ओलावा

संजय गरबड मराठे उल्हासनगर 4, जि.ठाणे

0 5 4 7 4 5

आयुष्याची शिदोरी: मायेचा ओलावा

संजय गरबड मराठे
उल्हासनगर , जि.ठाणे

‘माणसाकडून माणुसकीकडे’ जाणारा एक अक्षय रस्ता

माणसाचे संपूर्ण आयुष्य ही एक अशी संचित पुंजी आहे, जिचा हिशोब तो स्वतःपेक्षा समाज आणि काळ अधिक चोखपणे मांडत असतो. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे केवळ श्वासांची ये-जा नसून, तो संवेदनेचा आणि कर्तृत्वाचा एक प्रदीर्घ आलेख आहे. वास्तवात, माणूस जिवंत असेपर्यंत समाजाच्या दृष्टीने त्याची किंमत त्याच्या पदावर, संपत्तीवर किंवा बाह्य प्रभावावर ठरविली जाते. समाजाचा सन्मान हा वारीच्या पावसासारखा असतो; जो कधी स्तुतीच्या रूपाने धो-धो बरसतो, तर कधी निंदेच्या ढगांआड एका क्षणात गडप होतो. म्हणूनच कुणी आपली प्रशंसा केली म्हणून हुरळून जाण्याचे कारण नाही आणि कुणी निंदा केली म्हणून खचून जाण्याचे प्रयोजन नाही. नाव, कीर्ती आणि सन्मान हे सर्व सामाजिक मानसिकतेचे क्षणभंगुर खेळ आहेत. समाजाच्या हातात केवळ आपल्या नावावर एखादे लेबल लावण्याचे मर्यादित अधिकार असतात, पण त्या नावामागे दडलेल्या ‘माणसाचा’ खरा गाभा मात्र केवळ त्याच्या निखळ आचरणातूनच सिद्ध होत असतो.

माणूस म्हणून जन्माला येणे हा निसर्गाचा एक अपरिहार्य चमत्कार असेल, पण ‘माणुसकी’ अंगी बाणवणे ही एक जाणीवपूर्वक केलेली कठोर साधना आहे. ही साधना सुरू होते ती आपल्या घरापासून आणि आई-वडिलांच्या डोळ्यांत दिसणाऱ्या त्या निस्वार्थी प्रेमापासून. ज्या हातांनी आपल्याला चालायला शिकवले, ज्या हृदयाने आपल्या प्रत्येक रडण्याला प्रतिसाद दिला, त्या नात्यांमधील ओलावा जेव्हा आपण जगाला वाटायला लागतो, तेव्हाच माणुसकीचा खरा अंकुर फुटतो. हा नश्वर देह निसर्गनियमानुसार एके दिवशी मातीत मिसळणारच आहे, परंतु या देहाच्या चौकटीत राहून जेव्हा एखादी व्यक्ती माणुसकीचा उदात्त आविष्कार घडवते, तेव्हा ती सामान्यत्वाच्या मर्यादा ओलांडून चिरंतनत्वाकडे प्रवास करू लागते. स्वतःच्या सुखाच्या परिघाबाहेर पडून जेव्हा आपण दुसऱ्याच्या डोळ्यांतील साचलेले अश्रू पुसतो किंवा स्वार्थाच्या भिंती पाडून परमार्थाचा भक्कम पाया रचतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘माणसाकडून माणुसकीकडे’ जाणारा एक अक्षय रस्ता तयार होतो.

हा रस्ता डांबर किंवा सिमेंटचा नसून तो विश्वास, माया, करुणा आणि त्यागाच्या अत्तराने माखलेला असतो. कधी कधी ही माणुसकी एखाद्या अनोळखी व्यक्तीला दिलेल्या हसण्यात असते, तर कधी कठीण प्रसंगी कोणाच्या तरी खांद्यावर ठेवलेल्या मायेच्या हातामध्ये असते. शब्दात न मावणारी ही माया जेव्हा कृतीतून प्रकटते, तेव्हा ईश्वराचा अंश त्या मानवी रूपात प्रत्यक्ष उभा ठाकतो.

एखादे सुगंधी अत्तर सांडले की.सत्याची कुपी रिकामी होते. पण, त्या जागेवर त्याचा गंध कित्येक काळ रेंगाळत राहतो. माणसाचे अस्तित्वही अगदी तसेच असायला हवे. आपण आयुष्याच्या ज्या वाटेवरून प्रवास करतो, तिथल्या काट्याकुट्यांतून चालताना जर आपण मागे कृतज्ञतेचा आणि प्रेमाचा सुगंध सोडू शकलो, तरच आपले जगणे सार्थ ठरते. मृत्यूनंतर देह पंचतत्त्वात विलीन होईलही, पण त्या व्यक्तीने जपलेली मूल्ये आणि दिलेली ऊब लोकांच्या आठवणींत सदैव जिवंत राहते. ज्यांनी केवळ स्वतःच्या भौतिक सुखाचे प्रासाद उभे केले, त्यांची नावे काळाच्या ओघात विस्मृतीच्या गर्तेत गाडली जातात. मात्र, ज्यांनी अगतिक हातांना आधार दिला आणि इतरांच्या अंधाऱ्या आयुष्यात आशेची खिडकी उघडली, त्यांचे अस्तित्व इतिहासाच्या पानांवर नाही, तर जनसामान्यांच्या काळजात कोरले जाते. हाच तो माणुसकीचा सुगंधित मार्ग आहे, जो मृत्यूच्या सीमारेषेलाही ओलांडून पुढे जातो.

आजच्या स्पर्धात्मक आणि यांत्रिक युगात आपण इतके धावत आहोत की, वाटेत एखादा माणुसकीचा झरा लागला तर तिथे दोन क्षण थांबून आपली तहान भागवण्याची उसंतही आपल्याला नाही. आपण यशाची उंच शिखरे पादाक्रांत करण्यासाठी एवढे आंधळे झालो आहोत की, खाली पायथ्याशी आपला हात धरून वर येऊ पाहणाऱ्या सोबत्याला आपण पारखे झालो आहोत. घराची भिंत मोठी करताना शेजाऱ्याच्या अंगणात जाणारा प्रेमाचा ओलावा आपण सिमेंटने बंद करून टाकला आहे. पण लक्षात ठेवा, आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आपण थकलेल्या पावलांनी मागे वळून पाहू, तेव्हा ही पदवी, हे दागिने किंवा हे रिकामे बंगले आपल्या सोबत नसणार आहेत. त्या क्षणी फक्त एकच गोष्ट मनात उरेल, ती म्हणजे आपण कोणाच्या तरी आयुष्यात आणलेला आनंदाचा क्षण!

वैश्विक सत्य हेच आहे की, आपण काय मिळवले यावर आपली महानता ठरत नाही, तर आपण काय आणि किती दिले, यावर आपले मोठेपण सिद्ध होते. काळ हा निष्ठुर पण सर्वात मोठा परीक्षक आहे. काळाच्या प्रवाहाने मोठमोठी साम्राज्ये आणि अहंकार धुळीला मिळवले, पण माणुसकीचे छोटेसे निस्वार्थी कार्य आजही सुवर्ण अक्षरांनी तळपते आहे. आपण आज जे सत्कर्म पेरतो, तेच उद्याच्या पिढीला आशेच्या आणि सद्भावनेच्या सुगंधाच्या स्वरूपात लाभते.

अंतिमतः सन्मान आणि निंदा ही समाजाची तात्पुरती देणी आहेत; ती आज आहेत, उद्या नसतील. मात्र, आपण जगलेली माणुसकी ही आपली स्वतःची अशी कमाई आहे, जी काळाच्या अंतापर्यंत शाश्वत राहते. माणूस जगातून जातो तेव्हा लोक त्याचे वैभव विसरतात, पण त्याने दिलेला आधार कधीच विसरत नाहीत. एखाद्या भुकेलेल्याला दिलेली भाकरी किंवा एखाद्या निराधार वृद्धाच्या डोळ्यांत निर्माण केलेला विश्वास हाच आपल्या जगण्याचा खरा ‘इन्कम टॅक्स’ असतो, जो मृत्यूनंतरही आपल्याला पावतो.

आयुष्याच्या मावळतीला जेव्हा आपण मागे वळून पाहतो, तेव्हा जगाने किती टाळ्या वाजवल्या यापेक्षा, आपल्यामुळे किती कोमेजलेली मने पुन्हा प्रफुल्लित झाली, हेच खरे यश ठरते. “देहाची ही नश्वर यात्रा संपेल, पण आपण तयार केलेला माणुसकीचा हा रस्ता, आपल्या पश्चातही कित्येकांना वाट दाखवत दरवळत राहील”. आपली खरी ओळख ही आपल्या नावात नसून, आपल्या पश्चात मागे उरणाऱ्या त्या ‘कृतज्ञतेच्या सुगंधात’ असते. जगणे असे असावे की, मृत्यूने देह नेला तरी माणुसकीचा दरवळ या मातीत कायमचा विरून जावा!

संजय गरबड मराठे
उल्हासनगर 4, जि.ठाणे
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 4 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे