“WhatsApp नोटीसवरून सुनावणी? नागरिकाचा ठाम विरोध!”
हिंगण्यात सहकारी संस्थेच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

“WhatsApp नोटीसवरून सुनावणी? नागरिकाचा ठाम विरोध!”
हिंगण्यात सहकारी संस्थेच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह
हिंगणा शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
हिंगणा: (दि २९) हिंगणा तालुक्यातील एका प्रकरणात सुनावणी प्रक्रियेवर मोठा वाद निर्माण झाला आहे. तक्रारदार गजानन ढाकुलकर यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून केवळ WhatsApp द्वारे पाठवण्यात आलेल्या नोटीसीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कोणतीही अधिकृत लेखी नोटीस किंवा पोस्टल सेवा न वापरता थेट WhatsApp द्वारे सुनावणीस बोलावणे ही प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या त्रुटीपूर्ण असून नियमबाह्य आहे.
तक्रारदाराने आपल्या अर्जात बेकायदेशीर जमीन व्यवहार, नियमबाह्य सदस्य नोंदणी, आर्थिक अनियमितता व फसवणुकीसारखे गंभीर आरोप केले आहेत. मात्र, कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट आमनेसामने सुनावणी घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे निष्पक्ष तपासावर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच, संबंधित व्यक्तींशी पूर्वी वाद झाल्यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेचा धोका असल्याचे सांगत त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. त्यांनी कार्यालयाकडे सखोल चौकशी, प्रत्यक्ष पाहणी आणि स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होण्यापूर्वी सुनावणी घेऊ नये, अन्यथा उच्च स्तरावर किंवा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे सहकारी संस्थांच्या सुनावणी प्रक्रियेबाबत पारदर्शकता आणि कायदेशीर पद्धतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



