अभिमान महाराष्ट्राचा
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर

अभिमान महाराष्ट्राचा
दिनांक १ मे १९६० हा दिवस म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या स्वाभिमानाचा जन्मदिवस. हा नुसता सुट्टीचा दिवस नाही. हा दिवस आहे रक्ताने, घामाने आणि बलिदानाने लिहिलेल्या इतिहासाचा. म्हणूच आम्हास आहे अभिमान आमच्या महाराष्ट्राचा मराठी भाषिकांचा. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र व्हावा ही मराठी माणसाची रास्त अपेक्षा होती. पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विरोध झाला. मुंबई गुजरातला द्यावी की स्वतंत्र ठेवावी, यावरून वाद पेटला. दि. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी फ्लोरा फाउंटनजवळ मोर्चावर गोळीबार झाला. १०६ हुतात्म्यांनी मुंबईसह महाराष्ट्रासाठी प्राण दिले. सेनापती बापट, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी या नेत्यांनी चळवळ जिवंत ठेवली. शेवटी १ मे १९६० रोजी मुंबईसह मराठी भाषिकांचा महाराष्ट्र राज्य अधिकृतपणे अस्तित्वात आले.
महाराष्ट्र म्हणजे फक्त ३६ जिल्ह्यांचा भूभाग नाही. हा शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा आहे. ज्ञानेश्वर-तुकारामांच्या अभंगांचा गाभा आहे. महात्मा फुलेंच्या समतेचा विचार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ आहे. लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेचा प्रतिध्वनी आहे. सावरकरांच्या तेजस्वी राष्ट्रवादाचा हुंकार आहे. सह्याद्रीच्या कड्यांपासून कोकणच्या सागरापर्यंत, विदर्भाच्या काळ्या मातीपासून खानदेशाच्या केळीच्या बागांपर्यंत हा प्रदेश कष्टकऱ्यांच्या घामाने न्हालेला आहे. वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाने भारलेला आहे. शेतकऱ्याच्या नांगराने नांगरलेला आहे.
आज महाराष्ट्र दिन म्हणजे फक्त ध्वजारोहण नाही. हा दिवस आहे आत्मपरीक्षणाचा. भाषा, संस्कृती, परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे. उद्योग, शिक्षण, शेती, विज्ञान या सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राने देशाला दिशा द्यावी. हाच एकमेव उद्देश आहे. १०६ हुतात्म्यांचे बलिदान फुकट जाऊ नये यासाठी महाराष्ट्र स्वाभिमानाने आणि स्वावलंबनाने उभा राहिला पाहिजे. महाराष्ट्र दिन हा आपल्याला सांगतो एकजूट असेल तर काहीही अशक्य नाही. मुंबई मिळवली, राज्य मिळवलं, आता जग जिंकायचं आहे. पण ते जिंकताना आपली माती, आपली भाषा, आपला बाणा विसरायचा नाही.कारण महाराष्ट्र म्हणजे नुसतं राज्य नाही तो एक विचार आहे. तो विचार जिवंत ठेवणे हीच १ मे या दिवसाची खरी शपथ आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!!
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह
=========



